आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आयटी पार्क'ला 'लिलावा'चा कोलदांडा, भूखंडांच्या व्यवहारांत हितसंबंध गुंतलेल्यांची आडकाठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरच्या एमआयडीसीमधील आयटी पार्कमधील गाळ्यांचा दर निश्चित झाला असताना तो आयटी उद्योजकांना मान्य असताना आता पुन्हा या गाळ्यांच्या लिलावाची मागणी करून काही भूखंडांच्या व्यवहारांत हितसंबंध गुंतलेल्यांनी हे पार्क सुरू होण्यात कोलदांडा घातला आहे.

नगर शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकणाऱ्या आयटी पार्कसाठी 'दिव्य मराठी'या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करत आहे. हे आयटी पार्क सुरू होण्यासाठी नवउद्योजकांनी पुढाकार घेऊनही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे ते सुरू झालेले नाही. आता या गाळ्यांसाठी २१ हजार १०० रुपये प्रतिचौरस मीटरप्रमाणे दर निश्चित करण्यात आल्याचे पत्र एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी नुकतेच पाठवल्याची माहिती समजली. हे दर मान्य असल्याचे पत्र देण्याचे आवाहनही त्यात करण्यात आले होते. वास्तविक पाहता हे दर अधिक असतानाही केवळ आयटी पार्क सुरू करण्याच्या जिद्दीने नवउद्योजकांनी ते मान्य असल्याचे पत्र पाठवले. आता गाळ्यांचे वितरण होऊन आयटी पार्क सुरू होण्याची शक्यता दिसताच भूखंडांच्या खरेदी-विक्रीत रस असलेल्या काही उद्योजकांनी या गाळ्यांचा लिलाव करण्याची मागणी करून आयटी पार्क सुरू होण्यात अडथळा निर्माण केला आहे.

आयटी पार्कबाबत उदासीनता
उद्योजकमहाराष्ट्र मेकॅनिकल इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष हरजितसिंग वधवा यांच्या प्रयत्नांमुळे नगरच्या एमआयडीसीमधील आयटी पार्कचे भाग्य गेल्या वर्षी जानेवारीत उजळलेे. कारण त्यांच्या प्रत्नांमुळे त्यातील ४४ पैकी ३४ गाळ्यांसाठी आयटी क्षेत्रातील उद्योजकांचे प्रस्ताव आले. हे पार्क सुरू होऊन त्यामुळे शहरातील एक हजार तरुणांना रोजगार मिळण्याचा आशावाद व्यक्त होत असताना गेल्या वर्षभरात गाडे पुढे सरकले नाही. या उद्योगासाठी अद्ययावत तंत्रज्ञान कुशल मनुष्यबळ नगरमध्ये उपलब्ध आहे. आयटीबरोबरच इतर सहाय्यक उद्योगही यानिमित्ताने उभे राहतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचा विश्वास उद्योजकांना होता. त्यामुळे त्यांनी एकत्र होऊन प्रयत्न केले. पण अधिकाऱ्यांना हे पार्क सुरू करण्यात रस नाही. नगर शहराचा विकास होऊ नये, अशीच त्यांंची भूमिका असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

"आयटी'ची वाट लावण्याचा डाव
लिलावामुळेत्या गाळ्यांत दुसरे व्यवसाय करणारे घुसतील त्यामुळे आयटी उद्योगाचे मोठे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. कारण त्यांचे दर लिलावामुळे खूप जास्त होतील. ते आयटी उद्योजकांना परवडणारच नाहीत. अधिकाऱ्यांनी आपले भूखंड वाटपाचे पाप दडवण्यासाठी या मागणीला छुपे समर्थन देऊ केल्याची टीका होत आहे. पाच वर्षांपूर्वी भूखंड वाटप होऊनही तेथे एकही आयटी उद्योग उभा राहिलेला नाही. आयटी पार्कचीही अशीच वाट लावण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप आयटी उद्योजक करत आहेत.

आयटी उद्योजकांवर अन्याय
एमआयडीसीच्याअधिकाऱ्यांनी एका बिल्डरला मात्र फक्त साडेपाचशे रुपये प्रतिचौरस फूट दराने संपूर्ण इमारत भाड्याने दिली होती, हे विशेष. अाता २१ हजार १०० रुपये प्रति चौरस मीटर असा दर निश्चित करण्यात आला. तो मान्य करूनही पुन्हा त्यात कोलदांडा घालण्यात आल्याने आयटी उद्योजक हैराण झाले आहेत. गेली १५ वर्षे ही इमारत पडून होती. त्यावेळी गाळ्यांचा लिलाव करण्याची मागणी करणाऱ्यांनी काहीच केले नाही. आता ते सुरू होऊ नये, यासाठी कारस्थान रचण्यात आल्याचा उद्योजकांचा आरोप आहे.

चौदा वर्षांपासून बंद असलेल्या आयटी पार्कमधील ४४ पैकी ३४ गाळ्यांसाठी उद्योजकांचे प्रस्ताव मान्य झालेले असताना आता पुन्हा या गाळ्यांच्या लिलावाची मागणी करून त्यात ते सुरू होण्यात खोडा घालण्यात आला आहे.

अधिकारी, काही उद्योजक विरोधात
आयटीपार्कची इमारत धूळ खात असताना आयटी उद्योगांसाठी राखीव असलेल्या १५ एकर भूखंडांचेही वितरण इतर उद्योगांसाठी करण्यात आले. यात एमआयडीसीच्या अिधकाऱ्यांचा सहभाग आहे. आयटी उद्योग सुरू झाल्यास ते जादा जागा मागतील आपले भांडे फुटेल, या भीतीने भूखंड मिळवलेले उद्योजक त्यांना मदत करणारे अधिकारी अडथळे निर्माण करत असल्याची माहिती समजली.

आता जनतेनेच पुढाकार घ्यावा
उद्योगविकासाबाबत नगर शहरात किती उदासीनता आहे, याचे हे आयटी पार्क उदाहरण आहे. नगरच्या उद्योजकांनाही आयटी उद्योग येथे येण्यात रस नाही. राजकीय नेतृत्वालाही असे प्रश्न जाणून घेऊन सोडवण्यात रस नाही. हेच लोक नगर शहराच्या विकासाचे शत्रू आहेत. याबाबत नगरच्या जनतेनेच रस्त्यावर येऊन जाब विचारायला हवा.''
संजयगाडेकर, आयटीउद्योजक.