आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँक निवडणूक : तडजोडीच्या नावाखाली परस्परांवर कुरघोडी, सहा संचालकांची निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तेच्या राजकारणात पारंपरिक विरोधक असणारे बाळासाहेब थोरात राधाकृष्ण विखे यांच्यात राखीव सात जागांवर शुक्रवारी दुपारपर्यंत तडजोड झाल्याचे निश्चित मानले जात होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या उपस्थितीत विखे थोरात यांच्यात सुमारे दोन तास खलबत झाले.
मात्र, तडजोडीच्या नावाखाली परस्परांवर कुरघोडी करण्याचाच प्रयत्न झाल्याचे अर्ज माघारीच्या शेवटच्या मुदतीनंतर स्पष्ट झाले. एका जागेवर समाधान मानत तडजोड करत असल्याचे भासवून विखे यांनीच विरोधकांना कात्रजच्या घाट दाखवल्याची चर्चा आहे. बिनविरोधसाठी निश्चित करण्यात आलेल्या सातही जागांवर आता निवडणूक होणार आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी यंदा पहिल्यांदाच विक्रमी २२२ अर्ज आले. त्याचवेळी निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले. बँकेवर सध्या थोरात गटाची सत्ता आहे. तत्पूर्वी विखे गटाची सत्ता होती. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दोन दिवसांत राजकीय घडामोडींना वेग आला. तत्पूर्वी आमदार शिवाजी कर्डिले माजी आमदार चंद्रशेखर घुले हे सेवा सोसायटी मतदारसंघातून त्यांच्या तालुक्यातून बिनविरोध निवडले गेले होते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या निवडणुकीतील प्रत्येक घडामोडीत लक्ष घातले असून गुरुवारी त्यांच्या उपस्थितीत बारामतीला बैठक झाली. बैठकीत थोरात गटाला साथ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
शेतीपूरक, बिगरशेती राखीव अशा पैकी थोरात गटाला राष्ट्रवादीला जागा देण्याचे निश्चित झाले. या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पुढील रणनिती आखण्यास सुरुवात केली.

स्वतंत्र पॅनेल तयार करून निवडणूक लढवण्याऐवजी जागांची निवड बिनविरोध करण्यासाठी विखे यांनी पुढाकार घेतला. नमती बाजू घेत त्यांनी हा निरोप पाठवून तडजोड करण्याचा प्रस्ताव ठेवला. यावर राष्ट्रवादीचे पिचड, थोरात यांच्याशी त्यांची जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड यांच्या लालटाकी येथील शासकीय निवासस्थानी तडजोडीसाठी खलबते झाली. विखे यांनी आणखी नमती भूमिका घेत केवळ एका जागेच्या बदल्यात तडजोड मान्य केली. राष्ट्रवादीला तीन, थोरात गटाला विखे गटाला एक जागा देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार अजित पवार यांच्याशी विखे यांचे मोबाइलवरून बोलणेही करून देण्यात आले.
अर्ज माघारीला सव्वा तास असेपर्यंत तिन्ही नेत्यांची चर्चा सुरू होती. ठरल्याप्रमाणे अर्ज माघारी घेण्याच्या सूचना आपापल्या उमेदवारांना देण्यात आल्या. त्यानुसार काहींनी अर्ज मागे घेतले. मात्र, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून माघार घेण्यास थोरात गटाच्या उमेदवाराने ऐनवेळी नकार दिला. एका जागेवर समाधान मानून तडजोड स्वीकारली असतानाही मनधरणी करण्याची वेळ आल्याने विखे गट संतापला. तडतोड झालेल्या जागेवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत विखे यांनी त्यांच्या उमेदवारांना अर्ज कायम ठेवण्याचे फर्मान सोडले.

शेतीपूरक संस्था, बिगरशेती संस्था, महिला राखीव दोन, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास प्रवर्ग भटक्या जमाती विमुक्त जाती, तसेच विशेष मागास प्रवर्ग या मतदारसंघातील सात संचालक पदांसाठीची ही तडजोड होती. राष्ट्रवादी थोरात गटाची भक्कम फळी भेदण्यासाठी विखेंनीच तडजोडीची खेळी करून ऐनवेळी धक्का दिला.

पालकमंत्री शिंदे यांना निवडणूक झेपलीच नाही

जिल्हा बँकेसंदर्भात निर्णय घेऊन भाजपची भूमिका ठरवण्याचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे सोपवले होते. मात्र, बँकेची निवडणूक त्यांना शेवटपर्यंत झेपलीच नाही. विखेंनी मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांना लक्ष घालण्याचे साकडे घातले. त्यानंतर फडणवीस यांनी जिल्ह्यातील एक आमदार एका माजी आमदारावर ही धुरा सोपवली. मात्र, त्यांनाही पक्षीय पातळीवर ही निवडणूक हाताळणे जमले नाही. शेवटी मुख्यमंत्र्यांनीच सूत्रे हाती घेत विखे यांच्या बाजूने कौल दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शेवटी अर्धा तास धावपळ

अर्जमागे घेण्यासाठी दुपारी तीनपर्यंत अंतिम मुदत होती. अर्ज माघारीसाठी उमेदवारांना साकडे घालण्याची लगबग शेवटच्या टप्प्यात सुरू होती. श्रीगोंदे विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातून बाळासाहेब नाहाटा यांना अर्ज माघारीसाठी गळ घालण्यात येत होती. अर्ज माघार घेण्यास शेवटची दोन मिनिटे उरली असताना आठ ते दहा उमेदवारांनी माघार घेतली.
तडजोडीच्या सात मतदारसंघातील उमेदवारांची शेवटच्या अर्ध्या तासात चांगलीच धावपळ झाली. अर्ज माघारीच्या मानसिकतेने गेलेल्या अनेक उमेदवारांना ऐनवेळी थांबवण्यात आले. तत्पूर्वीच अर्ज माघारी घेतलेल्यांना बराच मनस्ताप सहन करावा लागला.

पांडुरंग अभंग यांची विकेट

तडजोडीत ठरल्याप्रमाणे माजी अध्यक्ष राष्ट्रवादीचे उमेदवार पांडुरंग अभंग यांनी इतर मागासवर्गीय मतदारसंघातून एक वाजता अर्ज मागे घेतला. ही जागा विखे गटाला सोडण्याचे निश्चित झाल्याने अभंग यांनी माघार घेतली. याच मतदारसंघात थोरात गटाच्या सुरेश करपे यांनी माघार घेण्यास नकार दिल्याने तडजोड फिस्कटली. तडजोड फिस्कटल्याचे समजताच अभंग यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे धाव घेऊन अर्ज कायम ठेवण्याची विनंती केली.
मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी दिगंबर हौसारे यांनी मागे घेतलेला अर्ज परत कायम ठेवता येणार नसल्याचे स्पष्ट केले. विखे-थोरातांच्या खेळीत अभंग यांना बाहेर पडावे लागले.

अधिकारी, कर्मचाऱ्यांची शेवटच्या क्षणी तारांबळ

वेळसंपून गेल्यानंतरही अर्ज माघारीसाठी मागे घेतलेला अर्ज परत घ्या म्हणणाऱ्यांची संख्या वाढली होती. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी दिगंबर हौसारे अन्य कर्मचाऱ्यांची शेवटच्या क्षणी मोठी तारांबळ उडाली. त्यातच राष्ट्रवादीचे सिद्धार्थ मुरकुटे यांनी आक्षेप नोंदवत वेळ संपल्याने काम आवरण्यास सांगितले. मुरकुटे हे अधिकाऱ्यांसमवेत पत्रकारांनाही अंतिम झालेल्या उमेदवारांच्या याद्या तातडीने ताब्यात घेण्यास सांगत होते. या गदारोळात अखेर निवडणूक निर्णय अधिकारी हौसारे यांनीही कामकाज आवरते घेतले.

बिनविरोध उमेदवार
शिवाजी कर्डिले (नगर)
उदय शेळके (पारनेर)
अण्णासाहेब म्हस्के (राहाता)
चंद्रशेखर घुले (शेवगाव)
राजीव राजळे (पाथर्डी)
अरुण तनपुरे (राहुरी)
कल्पक हतवळ‌णे

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे मधुकर पिचड, आमदार अरुण जगताप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यात बंद खोलीत चर्चा सुरु असताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात तेथे आले.

रिंगणातील उमेदवार

सेवा सोसायटी मतदारसंघ : अकोले - सीताराम गायकर, शिवाजी रामभाऊ धुमाळ, संगमनेर - रामदास काशिनाथ वाघ, रंगनाथ दशरथ खुळे, श्रीरामपूर - इंद्रनाथ रावसाहेब थोरात, जयंत मुरलीधर ससाणे, नेवासे - यशवंतराव कंकरराव गडाख, भगवान एकनाथ गंगावणे, जामखेड - रामचंद्र बापूराव राळेभात, जगन्नाथ देवराम राळेभात, कर्जत - विक्रम विजयराव देशमुख, अंबादास शंकरराव पिसाळ, श्रीगोंदे - प्रेमराज दगडू भोईटे, बाबासाहेब सहादू भोस, कोपरगाव - अशोक शंकरराव काळे, बिपिन शंकरराव कोल्हे. शेतीपूरक संस्था मतदारसंघ : रावसाहेब मारुती शेळके, दादासाहेब अर्जुन सोनमाळी, बिगरशेती संस्था मतदारसंघ : अरुण बलभीम जगताप, सबाजी महादू गायकवाड. महिला राखीव मतदारसंघ : अश्विनी सुभाष केकाण, मीनाक्षी सुरेश साळुंके, चैताली आशुतोष काळे, सुरेखा भानुदास कोतकर, प्रियंका राहुल शिंदे. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ : वैभव मधुकर पिचड, अशोक यशवंतराव भांगरे, इतर मागासवर्गीय मतदार संघ : सुरेश मोहिनीराज करपे, बाबासाहेब सहादू भोस, अनिल माधव शिरसाठ. विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागासप्रवर्ग : बाजीराव खंडूजी खेमनर, बाजीराव गेणुजी खेमनर, शिवाजी चिमाजी शेलार, सुभाष रावबा गिते.
छाया: जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे मधुकर पिचड, कॉँग्रसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात शुक्रवारी बंद खोलीत चर्चा झाली.