आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद - धनवेंना निलंबित करून त्यांची चौकशी करा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राहुरी येथील वादग्रस्त गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्याविरोधात महिला शिक्षकांनी गंभीर आअरोप केले असून विविध संघटनांनी त्यांच्याविरोधातील तक्रारींचा पाढाच वाचला आहे. त्यांना निलंबित करून चौकशी करावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे.

एप्रिल २०१३ मध्ये इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशनचे (इब्टा) राजेंद्र विधाते यांनी धनवे यांच्या विरोधात जिल्हा परिषदेकडे तक्रार करून आंदोलनाचा इशारा दिला होता. राहुरी तालुक्यातील एका शिक्षिकेने काही दिवसांपूर्वी धनवे यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार पोलिस ठाण्यात दिली. त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे.
तथापि, त्यांच्यावर अजूनतरी कोणतीही प्रशासकीय कारवाई झाली नसल्याने विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन धनवे यांच्या तक्रारींची फाईल तयार केली आहे. ही फाईल पत्रकारांना देऊन धनवे यांच्या कृष्णकृत्यांबरोबरच त्यांच्या काळात झालेल्या अनियमिततेवरही बोट ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य महिला शिक्षक संघटना, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, इब्टा आदी संघटनांनी धनवे यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. शिक्षिकेचा विनयभंग, गैरव्यवहार, शिक्षकांवरील वाढते दडपण, शिक्षकांना मानिसक त्रास देणे आदी बाबींकडे या संघटनांनी लक्ष वेधले आहे. महिला शिक्षकांना होणाऱ्या त्रासाला वाचा फोडण्यासाठी व जिल्हा परिषदेची बदनामी टाळण्यासाठी धनवे यांची चौकशी करून निलंबन करण्याची मागणीही केली आहे.

सर्व शिक्षा अभियानांतर्गत २०१२-२०१३ या वर्षात तालुक्यातील विद्यार्थिनी आणि अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश वाटण्यासाठी प्रत्येकी ४०० रुपयांचे अनुदान शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर जमा करण्यात आले. ज्या शाळांनी गणवेश खरेदी केले, त्या सर्व शाळांची बिले पुणे येथील पायल कलेक्शन व जिजाई टेलरिंग फर्म (राहुरी) यांच्या नावाने काढले आहेत. या प्रक्रियेत सर्वच शाळांचे कापड मागणी अर्ज एकाच दिवशी तालुक्यात कसे संकलित झाले? कमी कालावधीत गणवेश कसे शिवले? विद्यार्थ्यांची मापे संबंधित फर्म सादर करू शकेल का? असे अनेक सवाल शिक्षक संघटनांनी उपस्थित केले आहेत. धनवे यांना अद्यापि निलंिबत न केल्याने शिक्षकांनी आता जिल्हा परिषद प्रशासनावर ताशेरे आेढायला सुरुवात केली आहे.

काय आहेत आरोप
शिक्षक संघटनांनी दिलेल्या फायलीत महिलांशी असभ्य वर्तन, शिक्षकांना खोट्या गुुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या, गणवेश घोटाळा, आरटीई अधिनियमातील कलमांचा भंग, ठरावीक एजंटांकडून शालेय ग्रंथालयासाठी पुस्तके खरेदी करणे, अक्षम्य दुर्लक्षामुळे शाळा बंद पडणे, नियमबाह्य बदल्या, विवरण पत्रे ठरावीक सल्लागाराकडूनच भरून घेण्याची सक्ती करणे, साधन व्यक्तीचे नियमबाह्य समायोजन यासह सतरा आरोप शिक्षक संघटनांनी केले आहेत.

शिक्षक नेते दुखावल्याने आरोप
मी दोन वर्षांपासून राहुरीत कार्यरत असून कोणत्याही शिक्षिकेने शिक्षणाधिकाऱ्यांकडे माझ्या विरोधात लेखी तक्रार केलेली नाही. माझ्याविरोधात जो गुन्हा दाखल झाला, ती बाब न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबत मी काही बोलणार नाही. गणवेश खरेदीचा विषय माझ्याकडे नाही. काही शिक्षक नेत्यांच्या शाळेत मी इन्स्पेक्शन केल्याने ते दुखावले गेले. त्याचे रेकॉर्ड माझ्याकडे आहे. यापूर्वी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध झाले नाहीत. माझ्यावर केलेले आरोप खोटे असून त्यात कोणतेही तथ्य नाही. जाणीवपूर्वक मला बदनाम करून मानसिक त्रास देण्यासाठी हे प्रकार केले जात आहेत.'' बाळासाहेब धनवे, गटशिक्षणाधिकारी.

अन्यथा आयोगाकडे तक्रार
धनवेंविरोधात महिलेने केलेले आरोप गंभीर असूनही कारवाईस विलंब होतोय. आम्ही महिला आयोगाकडे तक्रार करणार असून प्रसंगी आंदोलनाचीही भूमिका घेऊ. शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्याला निलंबित करा.'' मंदाकिनी जगधने, जिल्हाध्यक्ष, महिला शिक्षक संघटना.

अहवाल आल्यानंतर कारवाई
गट शिक्षणाधिकारी धनवे यांच्याविरोधातील तक्रारींची चौकशी करण्यात येणार आहे. लवकरात लवकर चौकशीचा अहवाल मागवला असून अहवाल आल्यानंतर नियमनानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.'' अशोक कडूस, जिल्हा शिक्षणाधिकारी.