आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खड्डय़ांमुळे नगरकरांची हाडे खिळखिळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पावसामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची वाट लागली आहे. प्रमुख रस्त्यांवर 5 ते 6 इंच खोल शेकडो खड्डे पडले आहेत. त्यामुळे नगरकरांचे मणके, कंबर, मान आणि पाठीचे दुखणे वाढले आहे. वाहनांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. वाहनांचे पार्टस् खराब होत असल्याने नगरकरांना तोही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. केवळ रस्त्यांच्या पॅचिंगसाठी महापालिकेने गेल्या पाच वर्षांत तब्बल एक कोटींची उधळपट्टी केली, तरीदेखील रस्त्यांची स्थिती अजून‘जैसे थे’ आहे. जून व जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे अनेक रस्ते खड्डयांत हरवले, तरी मनपा प्रशासन ढिम्मच आहे..

हे होतात आजार
खड्डयांमुळे मणक्यांचा त्रास

कंबरेची गादी सरकून कंबरदुखी

माकडहाड सरकल्यास पाठदुखी

हाडे फॅ्रर होण्याची शक्यता

वृध्दांना पाठदुखीचा त्रास

वाहनांचे नुकसान(खर्च)

टायर, ट्यूब (400 ते 500)

हँडल बॉलसेट (दुरूस्ती नाही)

सस्पेन्शन (500 ते 600)

चाकाचे बेअरिंग (दुरूस्ती नाही)

चिमटा आऊट (300 ते 400)

शॉकअँबसॉर्बर (400 ते 500)

‘एमआरआय’साठी गर्दी
खड्डयांमुळे लहान-मोठय़ा अपघातांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. खड्डयांमुळे अनेकांना मणक्यांचे आजार जडले आहेत. त्यासाठी एमआरआय तपासणी करावी लागते. शहरात केवळ तीनच ठिकाणी एमआरआय सेंटर आहेत. आणखी दोन एमआरआय सेंटर लवकरच सुरू होणार आहेत. रस्ते चांगले झाले, तर ‘एमआरआय’साठी होणारी गर्दी आपोआपच कमी होईल.’’ डॉ. रणजित सत्रे, संचालक, सिटीकेअर हॉस्पिटल


ग्राहक नाराज होतात
खड्डयांमुळे दुचाकीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे वाहनचालकांना पुन्हा पुन्हा वाहन दुरूस्तीसाठी आणावे लागते. एकदा दुरूस्त झालेली गाडी खड्डयांमुळे पुन्हा खराब झाल्याने ग्राहकांना काय उत्तर द्यावे, ते समजत नाही. अशावेळी ग्राहक नाराज होतात. परंतु रस्त्यांवर खड्डेच एवढे आहेत, त्याला आम्ही काय करणार? गाड्यांचे नुकसान होणारच.. बालाजी लखापती, श्रीबालाजी हिरो होंडा सर्व्हिस पॉईंट

मनपा प्रशासन ढिम्मच..
रस्त्यांवरील खड्डयांवर आतापर्यंत झालेली एक कोटी रुपयांची उधळपट्टी ‘दिव्य मराठी’ने 14 जुलैच्या अंकात प्रसिध्द केली होती. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या मनपाच्या बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली. त्यावेळी शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी म्हणाले होते, की सर्व खड्डे कॉम्प्रेसरद्वारे स्वच्छ करून ते तांत्रिक पध्दतीने बुजवण्यात येतील. पण खड्डे चक्क दगड-मातीनेच भरण्यात आले. त्यामुळे बुजवलेले खड्डे पंधरा दिवसांतच पुन्हा उखडले आहेत.


काय म्हणतात नागरिक

रस्त्यांची स्थिती कधीच बदलत नाही..
रस्त्यांवरील खड्डे पाहून शहरातील डॉक्टर महापालिकेला कमिशन देतात की काय, अशी शंका येते. खड्डयांमुळे प्रत्येक घरातील एका माणसाला तरी मणक्याचे आजार झाले आहेत. उपचारासाठी त्यांना डॉक्टरकडे जाण्याशिवाय पर्याय नसतो. सत्ता कोणाचीही असो, शहरातील रस्त्यांची स्थिती कधीच बदलत नाही. त्याचा त्रास मात्र आम्हाला सहन करावा लागतो.’’ बाळकृष्ण जाधव, ज्येष्ठ नागरिक

विश्वास कोणावर ठेवायचा?
सर्वच रस्ते खड्डयांनी माखले आहेत. एक खड्डा चुकवायला गेले, तर दुसरा खड्डा समोर येतो. त्यामुळे रस्त्यावरून चालताना कसरत करावी लागते. लहान-मोठे अपघात तर नेहमीचेच झाले आहेत. मनपा अधिकारी व पदाधिकारी रस्त्यांची पाहणी करून दुरूस्तीची आश्वासने देतात. प्रत्यक्षात मात्र होत काहीच नाही. त्यामुळे विश्वास ठेवायचा तरी कोणावर असा प्रश्न पडतो.’’
ज्योत्स्ना भणगे, शिक्षिका

मनपाने तातडीने निर्णय घ्यावा
दररोज सायकलवरून महाविद्यालयात यावे लागते. रस्त्यांवरील खड्डयांमुळे सायकल कशी चालवायची असा प्रश्न पडतो. भर रस्त्यात मोठे खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने ते दिसतही नाहीत. मोठे वाहन जवळून गेले, तर खड्डयातील पाणी थेट अंगावर उडते. त्यामुळे मनपाने खड्डयांच्या बाबतीत तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.’’
ऋतुजा नलावडे, विद्यार्थिनी