आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यासाठी उपअभियंत्याच्या तोंडाला काळे फासले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - कोल्हार-कोपरगाव रस्ता व पुलाचे रखडलेले काम सुरू करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर मंगळवारी निदर्शने करण्यात आली. कार्यालयात अधीक्षक अभियंता उपस्थित नसल्याने चर्चेसाठी आलेल्या उपअभियंत्याच्या तोंडाला आंदोलकांनी काळे फासले. या कृत्याच्या निषेधार्थ बांधकाम विभागातील कर्मचार्‍यांनी आंदोलकांच्या अटकेची मागणी करून कामबंद आंदोलन सुरू केले.

कोल्हार-कोपरगाव रस्त्याच्या कामाला हिरवा कंदील मिळूनही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत समितीची बैठक आठ महिन्यांपासून न झाल्याने या रस्त्याचे काम रखडले आहे, याकडे ‘दिव्य मराठी’ने शुक्रवारी (26 जुलै) लक्ष वेधले होते. रस्त्याचे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी आता शिवसेना आक्रमक झाली आहे. पक्षाचे उत्तर जिल्हाप्रमुख खेवरे यांनी काम सुरू करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता.

पाच वर्षांपासून कोल्हार-कोपरगाव राज्यमार्गाच्या चौपदरीकरणाचे काम बंद आहे. कोल्हार येथील जुन्या पुलाची स्थिती धोकादायक आहे. अवजड वाहने गेली की पूल हलत असल्याने तो केव्हाही कोसळू शकतो. शिवाय पुलावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी शिवसेनेने केली होती. परंतु त्याची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली नाही, असा आंदोलकांचा आरोप आहे.

मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिस निरीक्षक अशोक ढेकणे यांनी त्यांना मज्जाव केला. नंतर आंदोलकांनी आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केले. आम्हाला आत जाऊन अधिकार्‍यांना जाब विचारायचा आहे, असे आंदोलकांचे म्हणणे होते, पण कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून पोलिसांनी त्यास नकार दिला. त्यावरून पोलिस व आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. नंतर सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता प्रभाकर भोईर आंदोलकांची भेट घेण्यासाठी आले. वरिष्ठ अधिकारी येईपर्यंत भोईर यांना हलू देणार नाही, अशी भूमिका खेवरे यांनी घेतली. पोलिसांनी त्याला विरोध केला, पण आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यानंतर खेवरे यांनी पोलिसांची नजर चुकवून भोईर यांच्या तोंडाला काळी शाई फासली. पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेतले.

खेवरे यांना अटक करण्यास आंदोलकांनी विरोध करून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु खेवरे यांनी खाली उतरून पोलिसांना त्यांचे काम करू द्या, असे आवाहन केल्यानंतर ते शांत झाले. रावसाहेब खेवरे, सर्जेराव धाडगे, सचिन कोते, गणेश सोमवंशी, देविदास सोनवणे, राहुल चोथे या सहाजणांना अटक करून इतर साठ-सत्तरजणांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

या घटनेचा महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनांनी निषेध करून चारपासून कामबंद आंदोलन सुरू केले. शासकीय कर्मचार्‍याच्या तोंडाला काळे फासणार्‍या आंदोलकांवर कारवाईच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली.

आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी उपअभियंता प्रभाकर भोईर आल्यानंतर काही वेळानंतर पोलिस प्रशासनाच्या परवानगीने खेवरे कार्यालयात गेले. त्यापाठोपाठ पोलिस निरीक्षक ढेकणेही आत गेले. बंद खोलीत खेवरे व ढेकणे यांच्यात पंधरा-वीस मिनिटे चर्चा झाली. खेवरे बाहेर आल्यानंतर त्यांनी भोईर यांच्या तोंडावर शाई फासली.

आंदोलकांकडे कोणत्याही प्रकारचे निवेदन नव्हते. आंदोलकांनी चर्चेसाठी बाहेर बोलावून मला काळे फासले. माझा काहीही दोष नसताना पोलिसांसमोर हे कृत्य करण्यात आले, असे भोईर यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

काळे फासल्याच्या निषेधार्थ आज कर्मचार्‍यांची सभा
अधिकारी व कर्मचार्‍यांना काळे फासून मारहाण करणार्‍यांनी लोकशाहीचे विडंबन केले. आंदोलन करणार्‍यांना रस्ता व जनतेची किती काळजी आहे, हा प्रश्न आहे. केवळ स्टंटबाजी करण्याच्या हेतूने अधिकार्‍याला काळे फासले. राजकारण्यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना प्यादे समजू नयेत. कायदा हातात घेण्याची काहीही गरज नसल्याने आम्ही काम बंद करून या कृत्याचा निषेध करीत आहोत. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर निषेधसभा घेण्यात येईल.’’ योगिराज खोंडे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटना.

छायाचित्र - आंदोलकांच्या भेटीस आलेल्या उपअभियंता प्रभाकर भोईर यांच्या तोंडाला शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी काळे फासले.