आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेचा बेजबाबदारपणा; शहरातील भूखंडांची होतेय परस्पर विक्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहराची हद्दवाढ होऊन 14 वर्षे उलटली, तरी देखील महापालिकेकडे चारशेहून अधिक मोकळे भूखंड व रस्त्यांची नोंद नाही. त्यामुळे अनेक भूखंड अजूनही मूळ मालकांच्या नावे असून त्यांची परस्पर विक्री करण्याचे प्रकार शहरात सर्रास सुरू आहेत. त्यामुळे भूखंडांचे नवीन मालक अडचणीत आले आहेत.

नगरपालिका अस्तित्वात असताना 1995 पर्यंत शहरातील भूखंड व रस्त्यांचे हस्तांतरण करता येत नव्हते. परंतु, राज्य सरकारच्या नवीन धोरणानुसार मोकळे भूखंड व रस्त्यांचे हस्तांतरण करण्याचे निर्देश आहेत. दरम्यान, 1999 मध्ये शहराची हद्दवाढ झाली. त्याचवेळी नगरपालिकेने हद्दवाढीनुसार भूखंड व रस्त्यांचे हस्तांतरण करणे आवश्यक होते. मात्र, तत्कालीन अधिकार्‍यांच्या बेजबाबदारपणामुळे हस्तांतरण रखडले. पुढे 2003 मध्ये नगरपालिका बरखास्त होऊन महापालिकेची स्थापना झाली. तथापि मनपा प्रशासन व वेळोवेळी सत्तेवर आलेल्या पदाधिकार्‍यांनी देखील याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अनेक भूखंडांच्या मूळ मालकांनी गैरफायदा घेत, भूखंडाची परस्पर विक्री केली. त्यानंतरही याच मूळ मालकांनी विकलेले भूखंड पुन्हा नव्या मालकांना विकले. त्यामुळे एकाच भूखंडाचे अनेक मालक झाल्याने नेमकी मालकी कुणाची, असा वाद सुरू झाला आहे. महापालिका प्रशासन, तलाठी, तहसीलदार, सिटी सव्र्हे, नगर प्रांत अशा कार्यालयांची उंबरठे झिजवूनही भूखंडाचा वाद न मिटल्याने अनेकांनी थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

भूखंडांच्या या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने मागील दोन वर्षांपासून शहर तसेच उपनगरातील भूखंड व रस्त्यांची शोधाशोध सुरू केली आहे. यासाठी सहा निवृत्त तहसीलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी आतापर्यंत केवळ दीडशे भूखंड व रस्त्यांच्या हस्तांतरणाची कार्यवाही पूर्ण केली आहे. मात्र, अजूनही चारशेहून अधिक भूखंड व रस्ते मनपाच्या मालकीविनाच आहेत. हस्तांतरण झालेल्या मोकळ्या भूखंडांवर मालकी हक्क महापालिकेचा असला तरी त्याचा वापर करण्याचे अधिकार परिसरातील नागरिकांना आहेत. त्यांच्या मागणीनुसार सार्वजनिक हितासाठी मोकळ्या भूखंडावर दहा टक्के बांधकाम करण्याचे अधिकार मनपाला आहेत.

मनपाचा बेजबाबदारपणा
महापालिकेची भूखंड व रस्ते हस्तांतरणाची कार्यवाही संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागात काही गुंड प्रवृत्तीचे लोक भूखंडांचे गैरव्यवहार करत आहेत. याबाबत महापालिकेकडे तक्रार करूनही काहीच उपाययोजना होत नाहीत. ’’ रमेश कटारिया, नागरिक.

हस्तांतरणाची कार्यवाही सुरू
महापालिकेमार्फत रस्ते व भूखंडाच्या हस्तांतरणाची कार्यवाही सुरू आहे. मात्र, कोणी या जागांची परस्पर विक्री केल्यास खरेदी खत रद्द करण्यासाठी अपील दाखल करता येते. अशी काही प्रकरणे आली आहेत. भूखंडाच्या जागेवर महापालिकेच्या मालकीचे फलक लावण्यात आले आहेत.’’ विश्वनाथ दहे, नगररचनाकार, मनपा.

शहराच्या सिटी सव्र्हेची गरज
पालिकेडून मोजणीसाठी प्रस्ताव आल्यास आम्हाला मोजणी करता येते. मात्र, प्रस्ताव येण्याचे प्रमाण कमी आहे. सावडी गावठाणचा सिटी सव्र्हे करण्यात येणार आहे. त्यासाठी मनपाने पैसेही भरले आहेत. भूखंडांचे गैरव्यवहार रोखण्यासाठी संपूर्ण शहरात सिटी सव्र्हे करणे आवश्यक आहे.’’ भगवान शिंदे, भूमापन अधिकारी.

उपनगरांमध्ये गैरव्यवहार
केडगाव, मुकुंदनगरमध्ये व सावेडी परिसरात मोकळे भूखंड व रस्त्यांची संख्या अधिक आहेत. मात्र, त्यांचे हस्तांतरण न झाल्याने या भागात भूखंडांच्या गैरव्यवहाराचे प्रमाण अधिक आहे, याला मनपा प्रशासनाने दुजोरा दिला. वर्षभरात या भागातील सर्व भूखंड व रस्त्यांवर मनपाचा मालकी हक्क लावण्यात येईल, असा दावा नगररचना विभागाने केला आहे.