आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवण ओ पी नय्यर यांच्या भेटीची..

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ‘‘ये फोटोग्राफ तुम्हारे पास कैसे आए? ये तो मेरे पास भी नही है..’’ 40 वर्षांपूर्वीचा ऐन उमेदीतील पियानोसमोर सुटात बसलेला आपला फोटो पाहून संगीतकार ओ. पी. नय्यर जुन्या आठवणीत हरवले. हा फोटो घेऊन त्यांच्या भेटीला गेले होते नगरचे त्यांचे फॅन लक्ष्मीनारायण रोहिवाल.

28 जानेवारी हा दिवंगत संगीतकार ओ. पी. नय्यर यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त या ‘र्‍िहदम किंग’च्या आठवणींना रोहिवाल यांनी उजाळा दिला. ते म्हणाले, मी नय्यर यांचा मनस्वी चाहता. 1956 ते 60 या काळात माझा त्यांच्याशी बराच पत्रव्यवहार झाला. त्यांच्या संगीताविषयी मी पत्रात लिहित असे. माझ्या प्रत्येक पत्राला उत्तर देऊन सोबत एक फोटो ते पाठवत. पुढे व्यवसायात गुरफटल्यामुळे पत्रव्यवहार कमी झाला, पण त्यांची गाणी ऐकल्याशिवाय एक दिवसही गेला नाही.

नय्यर यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त 16 जानेवारी 2000 रोजी पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात गाण्यांचा कार्यक्रम होता. स्वत: ओ. पी. उपस्थित राहणार असल्याने हा दुग्धशर्करा योग चुकवायचा नाही, असे मी ठरवले. फोटो आणि पत्रव्यवहाराची फाईल घेऊन कार्यक्रमस्थळी पोहोचलो, तर समोर हाऊसफुल्लचा बोर्ड. आपल्या या आवडत्या संगीतकाराचे निदान बाहेरून ओझरते का होईना दर्शन घ्यावे, असा विचार करून विंगेच्या दरवाजाजवळ जाऊन थांबलो. तिथेही 150-200 लोक थांबलेले. एवढय़ात एक फोटोग्राफर आत जाताना दिसला. मी त्याच्याकडे फाईल दिली व ओ. पी.साहेबांना द्या, असे सांगितले. निराश होऊन मी तेथून निघणार तेवढय़ात मला आत बोलवणे आले. समोर साक्षात ओ. पी. बसले होते. मी त्यांना नमस्कार केला. मला त्यांनी विचारले, ‘‘कहाँ से आये हो?’’ मी तुमचा चाहता असून नगरहून आलो असल्याचे सांगितले. माझ्या फाइलमधील जुने फोटो पाहात ते म्हणाले, ‘‘ये फोटो तो मेरे पास भी नही हैं..’’ मी त्यांना लगेच त्यांच्या 75व्या वाढदिवसाची भेट म्हणून हे फोटो स्वीकारा अशी विनंती केली. मला शेजारी बसवून त्यांनी फोटो नीट न्याहाळले. माझ्या आत्मचरित्रात हे फोटो मी वापरेन. त्यात तुमचा उल्लेख करेन असे ते म्हणताच मी कृतकृत्य झालो. ओ पी नय्यर यांच्या समवेत राखीव खुर्चीवर बसून तो कार्यक्रम मी पाहिला. कार्यक्रम संपवून पहाटे पाच वाजता मी नगरला परतलो तो एका वेगळ्या धुंदीतच.. ही आठवण सांगतानाही रोहिवाल यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते.