आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन हजार व्यापार्‍यांची ‘एलबीटी’साठी नोंदणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) पहिल्या टप्प्यातील कार्यवाही जवळपास पूर्ण झाली असून, नोंदणी प्रमाणपत्राच्या वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर येत्या दोन-तीन दिवसांत दुसर्‍या टप्प्यातील कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे यांनी दिली.
जकात बंद होऊन 1 जुलैपासून महापालिका हद्दीत एलबीटी लागू करण्यात आली आहे. मनपा प्रशासनाने एलबीटीच्या अंमलबजावणीची कार्यवाही युध्दपातळीवर हाती घेतली असून पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. विक्रीकर विभागाकडून मिळालेल्या शहरातील व्यापार्‍यांच्या यादीची छाननी पूर्ण झाली असून 2 हजार 984 नोंदणी प्रमाणपत्र तयार झाली आहेत. त्यांचे वाटप सुरू करण्यात आले असल्याने प्रत्येक व्यापार्‍याला स्वत:चे एलबीटी नोंदणी प्रमाणपत्र मिळणार आहे.
दुसर्‍या टप्प्यातील कार्यवाहीची तयारीदेखील प्रशासनाने केली असून चारही झोनमध्ये एलबीटीचे कॅम्प घेण्यात येणार आहेत. या कॅम्पच्या माध्यमातून उर्वरित व्यापार्‍यांची नोंदणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक झोनमधील कर्मचारी, एलबीटी अधिकारी तसेच उपायुक्त स्वत: उपस्थित राहून व्यापार्‍यांच्या शंका दूर करणार आहेत. त्याचबरोबर सध्या एलबीटीबाबत माहिती देण्यासाठी तसेच शंका दूर करण्यासाठी व्यापार्‍यांच्या विविध संघटनांच्या बैठका घेण्यात येत आहेत.
एलबीटीबाबत व्यापार्‍यांच्या सर्व शंका दूर केल्या जाणार असून व्यापार्‍यांनी देखील नोंदणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. डोईफोडे यांनी केले आहे.
एलबीटीच्या कार्यवाहीबाबत सूचना - संत कैकाडी महाराज व्यापारी संकुल येथील एलबीटीच्या मध्यवर्ती कार्यालयास आयुक्त विजय कुलकर्णी यांनी नुकतीच भेट दिली. त्यांनी एलबीटीच्या कार्यवाहीबाबत माहिती घेतली. व्यापार्‍यांना लवकरात लवकर नोंदणी प्रमाणपत्र देण्याच्या सूचनाही संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत. एलबीटी नोंदणी प्रमाणपत्राचे वाटप सुरू झाल्याने व्यापार्‍यांच्या शंका काही प्रमाणात दूर झाल्या आहेत. प्रशासनाने एलबीटीची माहिती पुस्तिका, चर्चासत्रे, बैठका तसेच कार्यालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त व्यापार्‍यांच्या शंका दूर करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.