आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आचार, विचार आणि राहणीतही लोकमान्यांचे अनुकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - देशात लोकशाही नांदते आहे, पण प्रत्येकजण सरकारला दोष देतो आहे. प्रजासत्ताक असताना आपण सरकारला नाही, तर आपल्यालाच दोष देत असतो. त्यामुळे व्यथित झालेल्या सावेडी येथील बाळ धोंडिबा लांडे यांना लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रभावीत केले. टिळकांचे विचार युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आचार, विचारांबरोबरच पगडीसह त्यांचा पेहरावही स्वीकारला.

लांडे यांचे प्राथमिक शिक्षण नगरच्या दादा चौधरी विद्यालयात झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी औरंगाबाद येथे स्थापत्य शाखेची पदविका घेतली. 1980 मध्ये पाटबंधारे खात्यात कनिष्ठ अभियंता या पदावर ते रूजू झाले. शेतकर्‍यांना शेतीसाठी पाणी देताना अनेकजण नाराज व्हायचे. त्यामुळे लांडे यांना कामात आनंद मिळत नव्हता.

जगाला स्वास्थ्याची शिकवण देणारे रामदेवबाबा, तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर उपोषण करण्याची वेळ आली. आपण देशात लोकशाही आहे असे म्हणतो, मग आंदोलनांची वेळ का येते? याला लोकशाही म्हणायचे का ? अशा अनेक प्रश्नांचे काहूर लांडे यांच्या डोक्यात होते. या संदर्भात ते म्हणाले, मी टिळकांचे विचार वाचले, आत्मचिंतनही केले. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे..’ या त्यांच्या उद्गारांनी मी प्रेरित झालो. त्यांचे विचार युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मी 2011 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. या निर्णयाला कुटुंबातून विरोध होता, पण माझे विचार मित्रपरिवाराला पटायचे. त्यांच्या आग्रहामुळे 31 मे 2013 या घोषणादिनी टिळकांच्या पुतळ्याला त्यांच्यासारखाच पेहराव परिधान करून अभिवादन केले. तेव्हापासून ठरवले टिळकांचा पेहराव घालून तासाभराचे ढोंग करण्यापेक्षा कायमस्वरुपी हाच पेहराव परिधान करायचा. देशात लोकशाही आणण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे या कार्याला लगेच सुरुवात केली. युवकांना, तसेच नेत्यांनाही टिळकांचा विसर पडला आहे. त्यांच्यापर्यंत हे विचार पोहोचवण्यासाठी माझा प्रयत्न सुरू असल्याचे लांडे यांनी सांगितले. लांडे दररोज टिळकांचा पेहराव परिधान करतात. विविध शाळांमध्ये जाऊन ते विद्यार्थ्यांना टिळकांचे विचार सांगतात. टिळकच आपल्या भेटीला आल्याचा आनंद मुलांना होतो.

उदंड इच्छाशक्तीसमोर मी हरले..
माझ्या पतीचे विचार, आचार चांगले आहेत, पण जग चांगले नाही. त्यांनी वेशभूषा बदलू नये, असा माझा आग्रह होता. तोंडावर स्तुती करून पाठीमागे हसण्याची लोकांची प्रवृत्ती आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय अयोग्य आहे. मी त्यांना समजावून सांगितले, पण समाज बदलण्याच्या त्यांच्या उदंड इच्छाशक्तीसमोर मी हरले.’’ शैलेजा लांडे, बाळ लांडे यांची पत्नी

मतदानात पसंती क्रमांक हवा
निवडणुकीत एका उमेदवाराला 30 ते 40 टक्के मते मिळतात. उर्वरित उमेदवारांना 60 ते 70 टक्के मतदान होते. पण 30 ते 40 टक्के मते मिळवणार्‍याला विजयी घोषित केले जाते. वास्तविक उर्वरित 60 टक्के जनतेने त्या उमेदवाराला नाकारलेले असते, हे आपण विसरतो. त्यामुळे पसंती क्रमाने मतदानाची पद्धत राबवावी यासाठी लढा सुरू केल्याचे लांडे यांनी सांगितले.