आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकबाकी वसुलीस "शास्ती'चा अडसर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहरातीलमालमत्ताधारकांकडे महापालिकेची तब्बल १३१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात दंडाची रक्कम (शास्ती) ५० कोटींपेक्षा अधिक आहे. दंडाची रक्कम आज ना उद्या माफ होईल, या आशेवर बसलेल्या मालमत्ताधारकांनी थकबाकी भरण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे मनपाची मालमत्ता कर वसुली गेल्या अनेक दिवसांपासून थंड बस्त्यात आहे. शास्ती माफ व्हावी, ही वसुली कर्मचाऱ्यांची देखील अपेक्षा आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने मनपाच्या वसुली कर्मचाऱ्यांना मतदार नोंदणीच्या कामात गुंतवल्याने मनपाची वसुली सध्या ठप्प आहे. वसुलीसाठी कर्मचारी नसल्याने प्रभाग अधिकारी हवालदिल झाले आहेत.
महापालिकेकडे सुमारे ९२ हजार मालमत्ताधारकांची नोंद आहे, त्यापैकी हजारो मालमत्ताधारकांकडे १३१ कोटींंचा मालमत्ता कर थकीत आहे. त्यावर मनपाने दोन टक्के शास्ती लावली आहे. त्यामुळे थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस फुगत चालला आहे. मागील तीन वर्षांत मनपाने वेळोवेळी शास्ती माफ केली आहे. यावर्षी देखील पन्नास टक्के शास्ती माफ करण्यात आली आहे. त्यासाठी जूनपर्यंत मुदतवाढ देऊन मनपाने वेळोवेळी थकबाकी भरण्याचे आवाहन केले होते.
शास्ती माफ झाल्याने अनेक थकबाकीदारांनी प्रभाग कार्यालयांमध्ये रांगा लावून थकबाकी भरली. परंतु जूननंतर शास्ती माफीची मुदत संपल्याने मालमत्ताधारकांनी पुन्हा थकबाकी भरण्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे मनपाने हजारो थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसा बजावल्या आहेत. त्यांची मुदत संपली, तरी थकबाकीदार मनपाकडे फिरकायला तयार नाहीत. आज ना उद्या पुन्हा शास्ती माफीचा निर्णय होईल, या आशेवर थकबाकीदार बसले आहेत. त्यात बड्या थकबाकीदारांची संख्या जास्त आहे. काही मालमत्ताधारकांकडील थकीत रक्कम कोटींच्या घरात आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन उपायुक्त स्मिता झगडे यांनी धडकेबाज जप्ती मोहीम राबवून मोठी थकबाकी वसूल केली होती. परंतु त्यानंतर एकाही अधिकाऱ्याला असे धाडस दाखवता आलेले नाही. काही महिन्यांपूर्वी उपायुक्तपदी रुजू झालेले भालचंद्र बेहेरे यांच्याकडून वसुलीबाबत मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु त्यांनाही अातापर्यंत आपला करिष्मा दाखवता आलेला नाही. त्यात मनपाचे वसुली कर्मचारी जिल्हा प्रशासनाच्या मतदार नोंदणी कामात व्यग्र आहेत. त्यामुळे वसुली करणार तरी कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रभाग अधिकारीही हातावर हात धरून बसले आहेत. वसुलीसाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने त्यांचाही आता नाइलाज झाला आहे.

शास्ती माफीसाठी प्रयत्न
महापौरसंग्राम जगताप यांच्यासह काही नगरसेवक शास्ती माफ करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी शंभर टक्के शास्ती माफीची मागणी केली होती. परंतु प्रशासनाने त्यास नकार दिला. पन्नास टक्के शास्ती माफ करण्यास प्रशासनाने तयारी दाखवली. आता पुन्हा एकदा शास्ती माफीची मागणी पुढे आली आहे.
सावेडीत सर्वाधिक वसुली
सावेडीप्रभाग समिती कार्यालयाने एप्रिल २०१४ ते आतापर्यंत सुमारे दहा कोटींची थकबाकी वसूल केली आहे. प्रभाग अधिकारी एस. बी. तडवी यांनी प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात वसुली करून सावेडी प्रभाग क्रमांक एकवर ठेवला आहे. सावेडी पाठोपाठ वसुलीसाठी बुरूडगाव प्रभागाचा दुसरा क्रमांक आहे. झेंडीगेट शहर हे प्रभाग मात्र नेहमीच पिछाडीवर आहेत.