आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माळढोक आणि तणमोराच्या पुनस्र्थापनेसाठी ‘अँक्शन प्लॅन’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - माळढोक व तणमोरासारखे माळावरचे भूषण असणारे पक्षी माळावर बागडताना पुन्हा दिसण्यासाठी केंद्र सरकारने ‘स्पिशिज रिकव्हरी प्लॅन’ तयार करण्याचे आदेश संबंधित राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्राचा प्लॅन तयार करण्यासाठी माळढोक संरक्षणासाठी कार्यरत असणारे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (बीएनएचएस) संचालक डॉ. असद रेहमानी व माळढोकावर संशोधन करणारे सुजय नरवडे यांनी शनिवारी सोलापूर जिल्ह्यातील नान्नज अभयारण्य व व रविवारी नगर जिल्ह्यातील रेहकुरी अभयारण्याला भेट देऊन वनअधिकार्‍यांशी संवाद साधला.

नगरच्या माळरानांवर विपुल सापडणार्‍या माळढोक पक्ष्याची अस्तित्वासाठी शेवटची लढाई सुरू आहे. माळावरचा राजा, माळरानाचे भूषण, अशी बिरुदावली लावणार्‍या व माळरानांच्या समृद्ध जैवसंपदेचे प्रतिक असलेल्या या पक्ष्याची संख्या खूप प्रयत्न करूनही घटत असल्याने राज्यात पुढील दोन-तीन वर्षानंतर त्याचे अस्तित्व राहील का, याची पर्यावरण तज्ज्ञांना चिंता वाटत आहे. शेतीस मोठा उपद्रव देणारे टोळ (नाकतोडे) व इतर उपद्रवी किड्यांचा शत्रू असलेला माळढोक खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांचा मित्र आहे. प्रचंड भूक असलेला हा पक्षी एका दिवसात शेकडो टोळ व किडे फस्त करतो. चोरटी शिकार व निवासस्थाने नष्ट होत असल्याने त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सध्या राज्यात फक्त 20 ते 25 माळढोक उरले आहेत. साधारणत: हा तीस वर्षांपूर्वी नगर, र्शीगोंदे, कर्जत, जामखेड तालुक्यांत मोठय़ा संख्येने दिसायचा. मात्र, गेल्या 12 वर्षांपासून नगर जिल्ह्यात माळढोकाची एकही नोंद झालेली नाही. तणमोराची स्थिती तर याहूनही वाईट आहे.

फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभर हे दोन पक्षी संकटात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने त्याची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. माळढोक व तणमोर वाचवण्यासाठी व त्यांची त्यांच्या अधिवासात पुनस्र्थापना करण्यासाठी माळढोक आढळणार्‍या महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, आंध्रप्रदेशच्या सरकारांना कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.