आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरमध्ये १५ फेब्रुवारीला ‘नगर मॅरेथॉन २०१५’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईडतर्फे क्लबच्या दुस-या वर्षी सर्व लायन्स क्लब व सामाजिक संस्थांना सोबत घेऊन मूकबधिर व वंचित विद्यार्थ्यांसाठी १५ फेब्रुवारीला ‘नगर मॅरेथॉन २०१५’ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष पुष्कर जंगले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या कार्यक्रमाची थीम ‘रन फॉर होप’ आहे. या मॅरेथॉनमध्ये १४ वर्षांखालील मुले-मुली, १५ ते १८ वर्षांपर्यंतच्या मुले-मुली व सर्वांसाठी खुला गट असे तीन गट आहेत. नोंदणी फी शंभर रुपये आहे. मूकबधिर मुलां-मुलींकरिता प्रवेश नि:शुल्क आहे. कार्यक्रमांचे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे.

टिळक रोडवरील मूकबधिर विद्यालयापासून स्पर्धेला सुरुवात होऊन ती होशिंग हॉस्पिटल, माणिक चौक, खंडेलवाल चौक, कापडबाजार, अप्पू चौक, रेसिडेन्शिअल शाळा, दिल्लीगेट, कोर्ट गल्ली, सबजेल चौक, टिळक रोड अशी जाणार आहे. स्पर्धा सकाळी ८.३० वाजता सुरू होईल. नगर मॅरेथॉनच्या माध्यमातून जो फंड जमा होईल, तो मूकबधिर मुलांच्या विकासासाठी वापरण्यात येईल. याप्रसंगी मॅरेथाॅनचे टी-शर्ट उपलब्ध असतील.

या कार्यक्रमाचे रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी ९१.११ आहे. या स्पर्धेसाठी यूटीआय, म्युच्युएल फंड, शहर केमिस्ट असोसिएशनने सहकार्य केले आहे. क्लबच्या सदस्यांनी या स्पर्धेसाठी आर्थिक हातभार लावला आहे. या मॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी व मुलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जंगले यांच्यासह सचिव हरमित कौर माखिजा, खजिनदार अभिजित भळगट, प्रोजेक्ट चेअरमन सनी वधवा यांनी केले.

या कार्यक्रमाच्या संयोजनात सहभाग घेऊन बक्षिसे प्रायोजक करून हातभार लावू शकता. अधिक माहितीसाठी ९९६०६०५११५, ९९६०४६१९६९ या क्रमांकांवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला रोटरीचे अध्यक्ष देवेंद्रसिंग वधवा, रिजनल चेअरमन धनंजय भंडारे, झोन चेअरमन महेश पाटील, अजितसिंग वधवा, अश्विनी भंडारे, पवन झंवर, विक्रम बोठे, सुचेता जोशी, बलजित बिलरा, डॉ. कृष्णा जाजू, डॉ. दीपाली भळगट, किरण भंडारी, धनंजय भंडारे, हरजितसिंग वधवा आदी उपस्थित होते.

५ हजार रुपयांचे विजेत्यास बक्षीस
ही मॅरेथाॅन स्पर्धा पाच आणि तीन किलोमीटरची आहे. यात पहिल्या व दुस-या गटासाठी प्रत्येकी पाच हजार, तीन हजार आणि एक रुपये,ट्रॉफी व प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. तसेच ट्रिमरनमध्ये तीन हजार, दोन हजार व एक हजार रुपये, तसेच ट्रॉफी व प्रशस्ती पत्रक देण्यात येणार आहे. मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी ही विशिष्ट बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.