आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या तूर डाळीला मिळेना स्वस्ताईची फोडणी, स्वस्त डाळ देण्याचा सरकारचा दावा फोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शंभर रुपयांत एक किलो तूर डाळ देण्याचा भाजपने दावा केला होता, दिवाळी आटोपून देखील बाजारात अजूनही तूर डाळ १८० रुपये किलो दराने विकली जात असल्याने स्वस्त डाळ देण्याचा भाजपचा फोल ठरला आहे. तूर डाळीचे भाव गगनाला भिडल्याने जेवणात तूर डाळीऐवजी मूग डाळीचा वापर वाढला आहे.

नगरसह विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, गोंदिया यासह राज्याच्या अन्य जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात तुरीचे पीक घेतले जाते. मात्र गेल्या वर्षी या जिल्ह्यांमध्ये कमी अवेळी झालेल्या पावसामुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यामुळे बाजारात तुरीची आवक मोठ्या प्रमाणात मंदावली होती. आवक घटली असतानाच बाजारातून मागणी वाढल्याने तूर डाळीचे भाव गगनाला भिडले होते. किरकोळ बाजारात तूर डाळीचे भाव १८० ते २०० रुपये किलोवर जाऊन पोहोचले होते. डाळीचे भाव कडाडल्याने राज्य सरकारने १४ ऑक्टोबरला तूर डाळीचे भाव नियंत्रित करण्यासाठी डाळीच्या साठ्यावर मर्यादा घातली होती. त्यासाठी महापालिका, नगरपालिका, नगर परिषद या क्षेत्रासाठी तूर डाळीचा किती साठा ठेवायचा हे निश्चित करण्यात आले होते.

भाव कडाडल्यानंतर शिवसेनेनेही आक्रमक भूमिका घेऊन भाव कमी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अन्न-नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी स्वत: शंभर रुपये किलो दराने तूर डाळ देण्याचे जाहीर केले होते. मात्र अजूनही बाजारात तूर डाळ भाव कडाडलेलेच अाहेत. किरकोळ बाजारात १७० ते १८० रुपये किलो दरानेच तूर डाळींची विक्री केली जात आहे. नगर शहरासह जिल्ह्यात बहुतेक ठिकाणीचा तूरडाळीचा भाव हा सारखाच आहे. दिवाळीच्या कालावधीतही नागरिकांना याच दराने तूर डाळ घ्यावी लागली. दिवाळीचा सण अाटोपल्यानंतर डाळीचे भाव नियंत्रणात येतील, अशी अपेक्षा होती मात्र ती ही फोल ठरत आहे.

तूर डाळींचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी तूर डाळीऐवजी मूग डाळीचा पर्याय समोर ठेवला आहे. तुरडाळीबरोबरच तुरीचे भावही गगनाला भिडले आहेत. उडीदाच्या डाळीचेही भाव वाढले असून किरकोळ बाजारात १६० रुपये किलो दराने उडीदाच्या डाळीची विक्री केली जात आहे.

नियंत्रण कुणाचे ?
किरकोळबाजारात तूर डाळीचे भाव वाढल्यानंतर नगर जिल्ह्यात पुरवठा विभागाने अनेक भागात शेकडो छापे मारले मात्र प्रत्यक्षात किलोभरही अतिरिक्त तूर डाळ या विभागाच्या हाती लागली नाही. अनेक किरकोळ विक्रेते ग्राहकांना १७० ते १८० रुपये किलो दराने तुरीच्या डाळीची विक्री करत आहेत.या विक्रेत्यांवर नियंत्रण कुणाचेच नसल्यामुळे ग्राहक मेटाकुटीस आले आहेत.