आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये आठ दिवसांत महापौर बदल? राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचा ठाम दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापौर बदलाच्या चर्चेने शहरातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. पक्षश्रेष्ठींकडून आदेश आला, तर आपण पदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे आमदार तथा महापौर संग्राम जगताप यांनी यापूर्वी अनेकदा स्पष्ट केले आहे.
जगताप यांच्या राजीनाम्याबाबत पक्षश्रेष्ठींकडून अद्याप काहीच आदेश नाहीत, परंतु महापौर बदलाचा निर्णय येत्या आठ दिवसांत होईल, असा दावा राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याने "दिव्य मराठी'शी बोलताना केला.
आमदार झाल्यावर महापौरपदाचा राजीनामा देईल, असे आश्वासन जगताप यांनी विधानसभा निवडणुकीत संबंधितांना दिले होते. परंतु आमदार होऊन सहा महिने उलटले, तरी त्यांनी राजीनामा दिलेला नाही. जगताप यांच्या राजीनाम्यानंतर महापौरपदासाठी नगरसेवक अभिषेक कळमकर यांचे नाव निश्चित आहे. असे असले तरी जगताप यांच्या सत्तेत सहभागी झालेले मनसे अपक्ष नगरसेवक कळमकर यांना साथ देतील का, हा प्रश्न आहे. त्यामुळे महापौरपदाचा राजीनामा लांबणीवर पडला आहे.
राजीनामा दिल्यानंतर पुन्हा सत्तेचे गणित जुळणार का, त्यासाठी होणारा खर्च कोण करणार असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे पक्षपातळीवरदेखील महापौर बदलाबाबत विशेष काळजी घेण्यात येत आहे. महापौर बदलाबाबत सर्व काही ठरले आहे.
येत्या आठ दिवसांत महापौर बदलाचा निर्णय होईल, असा दावा राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याने बुधवारी केला. जगताप यांनी मात्र सुरूवातीपासूनच महापौर पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. पक्षश्रेष्ठींकडून आदेश मिळताच आपण राजीनामा देऊ, असे ते सुरूवातीपासून म्हणत आहेत. सध्या महापौर बदलाच्या चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक सहलीवर जाणार असल्याचे समजते.