आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगतापांच्या उमेदवारीची सोशल मीडियावर चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर मतदारसंघात महापौर संग्राम जगताप यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा व्हॅटस् अॅप या सोशल नेटवर्किंग साईट्सवर सुरू आहे. याला खुद्द महापौर जगताप यांनीही दुजोरा दिला.

दोन्ही काँग्रेसची आघाडी झाल्यास नगरची जागा काँग्रेसकडे येईल. तथापि, राष्ट्रवादीकडून महापौर जगताप इच्छुक आहेत. काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे नगरची जागा राष्ट्रवादीकडे जाईल की, काँग्रेसकडेच राहील याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार नगर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी नगर मतदारसंघातील आमचा उमेदवार प्रबळ असल्याचे सांगून जगताप यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. परंतु काँग्रेसकडून तांबे यांनी उमेदवारीसाठी दावा केला गेल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात होते. मात्र, सोमवारी दिवसभर व्हॅटस् अॅपवर जगताप यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळाल्याचा मेसेज शेअर केला जात होता.

यासंदर्भात "दिव्य मराठी'ने जगताप यांना विचारले असता, त्यांनी याला दुजोरा देऊन पवार यांनी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले. त्यामुळे नगरची जागा राष्ट्रवादीकडे जाण्याची चिन्हे आहेत. मंगळवारी (१६ सप्टेंबर) राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत ते काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सत्यजित तांबे यांनीही आपल्या उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली असून, त्यांचे नगरमधील वास्तव्य वाढले आहे.