आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेची आज मुंबईत बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 4 उमेदवारांसह स्थानिक पदाधिकार्‍यांची बैठक पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत मंगळवारी होणार आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी आघाडीला साथ द्यायची की युतीला, याचा निर्णय यावेळी होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मनसेच्या 4 उमेदवारांनी सोमवारी नाशिक येथे गटनोंदणी केली.

मनसेच्या 4 उमेदवारांनी आघाडीला पाठिंबा दिला असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे. मनसेचे विजयी उमेवार किशोर डागवाले यांनी दोन दिवसांपूर्वी आयुर्वेद कॉलेजमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयात हजेरी लावल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले. मनसेचे निवडणूक प्रमुख वसंत लोढा यांनी मात्र त्याचा इन्कार केला. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार्‍या बैठकीत कुणाला पाठिंबा द्यायचा हे ठरणार आहे. त्यामुळे आघाडीला पाठिंबा द्यायचा प्रश्न आता निर्माण होत नसल्याचे लोढा यांनी स्पष्ट केले.

मागील निवडणुकीत मनसेचे नगरसेवक किशोर डागवाले व गणेश भोसले हे कोणतेही पद न घेता प्रथम आघाडी व नंतर युतीच्या सत्तेत सहभागी झाले होते. यावेळी मनसेशिवाय सत्ता स्थापन करणे युतीला अशक्य आहे. परंतु आघाडीने अपक्षांची जुळवाजुळव करून मनसेशिवाय सत्ता स्थापन करण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे विरोधी बाकांवर बसण्याची सवय नसलेले मनसेचे नगरसेवक आघाडीच्या सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

मंगळवारी मुंबईत होणार्‍या बैठकीस नगरसेवकांसह निवडणूक प्रमुख लोढा, जिल्हा संघटक सचिन डफळ आदी उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरे जो आदेश देतील, त्याप्रमाणे पाठिंबा जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे युती-आघाडीसह सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मनसेच्या 4 नगरसेवकांनी सोमवारी नाशिक येथे गटनोंदणी केली असल्याचे किशोर डागवाले यांनी सोमवारी सांगितले.