आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोध झुगारून मनपाचा धार्मिक स्थळांवर हातोडा, कारवाई सुरूच राहणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अनधिकृत धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण चुकीचे झाल्याचा आक्षेप नगरसेवकांसह विविध पक्षांनी घेतला होता. पाहणी करून दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे आयुक्त घनश्याम मंगळे यांनीही जाहीर केले होते. पण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांवरील दुसऱ्या टप्प्याच्या कारवाईला गुरुवारी पहाटे सुरुवात झाली.
 
पहिल्या टप्प्यात २९ सप्टेंबर २००९ नंतरची धार्मिक स्थळे ३१ डिसेंबर २०१६ पूर्वी हटवण्यात आली होती. गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील कारवाईला सुरुवात झाली. त्यात रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या तसेच फूटपाथवरील १९६० नंतरच्या ६८ धार्मिक स्थळांचा समावेश आहे. कल्याण रस्त्यावरील दिनेश हॉटेल जाधव पेट्रोल पंपाजवळ असलेली लक्ष्मीमाता मोहटादेवी मंदिर मनपाच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात काढले. विरोध करण्यासाठी आलेल्या १०-१२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मनपा उपायुक्त विक्रम दराडे, अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख सुरेश इथापे आदींसह नगररचनाचे अभियंता कल्याण बल्लाळ यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांच्या पथकाने लक्ष्मीमाता मोहटादेवी ही छोटी मंदिरे हटवली. मूर्ती विधिवत ताब्यात घेऊन जेसीबीने मंदिरे पाडण्यात आली. यावेळी सहायक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे, तोफखाना ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग पवार, कोतवालीचे अभय परमार, दंगल नियंत्रण पथक आदींसह सुमारे १०० पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
 
रात्री १० पासूनच कारवाईची तयारी सुरू केली होती. पहाटे दोननंतर प्रत्यक्ष बंदोबस्त उपलब्ध झाल्यानंतर पथके कारवाईसाठी रवाना झाली. कारवाईला विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन विरोध होण्यापूर्वीच काहींना ताब्यात घेण्यात आले. धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण चुकीचे झाल्याचा आक्षेप यापूर्वीच राष्ट्रवादी, तसेच भाजप, शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतला होता. विरोधानंतर महापौरांनी बैठक बोलावली होती. त्यात आयुक्तांनी दोन दिवसांत पाहणी करून समिती निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. पण अनधिकृत स्थळांच्या यादीला असलेला विरोध झुगारून कारवाई सुरु झाली.
 
न्यायालयाचा अवमान
न्यायालयाच्याआदेशानुसार संबंधितांना लेखी सूचना दिल्याशिवाय अनधिकृत बांधकाम पाडताना सकाळी सायंकाळी पाच वाजेनंतर पाडू नये किंवा नष्ट करू नये, असे आदेश आहेत. त्यानुसार नगर विकास खात्याने २२ डिसेंबर २००९ रोजी सर्व मनपा आयुक्तांना आदेश दिले आहेत. मनपाने कारवाई केल्याप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी शाकीर शेख यांनी केली.
 
शिवसेनेचे निवेदन
महापौरांच्याअध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आयुक्तांनी स्थळ पाहणी करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कारवाई सुरू केली. याप्रकरणी दोषींवर कारवाई होणार का? रात्री मंदिरे पाडल्याने निर्माण होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाला आयुक्तांना जबाबदार धरावे, अशी मागणी शिवसेनेने प्रशासनाकडे केली आहे.
 
आक्षेप नसलेल्या स्थळांवर कारवाई
आक्षेप नसलेल्या स्थळांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. स्थळांची पाहणी करून पुरावा जमा करण्यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांना पाठवले होते. त्यांच्या पाहणीनंतर महापालिकास्तरीय समितीची बैठक होईल. पोलिस बंदोबस्त घेऊन पुढील कारवाई सुरू राहील.
- घनश्याम मंगळे, आयुक्त. महानगरपालिका, नगर.
 
तांत्रिक बिघाडामुळे अडचणी
पहाटे पोलिस बंदोबस्त उपलब्ध झाल्यानंतर पथके कारवाईसाठी रवाना झाली. प्रत्यक्ष कारवाईवेळी मनपाच्या ताफ्यातील वाहनात झालेला बिघाड, जेसीबीवरील चालक बदलावा लागला. त्यामुळे दोनच स्थळांवर कारवाई होऊ शकली. प्रत्यक्षात नियोजन तीन ते चार ठिकाणी कारवाईचे होते, असे सूत्रांकडून समजले.
 
बातम्या आणखी आहेत...