आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar Municipal Corporation Commissioner House Work Delayed

45 हजारांसाठी रखडले नगर महापालिका आयुक्तांचे घर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहरविकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवणारे महापालिका आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या निवासस्थानासमोरील उद्यानाचे काम अवघ्या 45 हजार रुपयांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून रखडले आहे. महापालिकेकडे पैसे नसल्याने संबंधित ठेकेदाराने हे काम केले नाही.


जकातीच्या उत्पन्नातून महापालिकेने दीड वर्षापूर्वी बांधलेले आयुक्तांचे निवासस्थान अजून अडगळीतच आहे. वसंत टेकडी येथील प्रवेश निषिध्द असलेल्या जागेतील हे निवासस्थान तसे शहरापासून अलिप्त आहे. आजूबाजूला वाढलेल्या झुडपांमुळे या परिसराकडे फारसे कुणी फिरकत नाही. या आधीचे आयुक्त संजय काकडे यांच्या कार्यकाळात सुरू झालेले निवासस्थानाचे बांधकाम दीड वर्षापूर्वी पूर्ण झाले. दरम्यान, काकडे यांची बदली होऊन आयुक्त कुलकर्णी यांनी पदभार स्वीकारला. कुलकर्णी यांनी आहे त्या परिस्थितीत या निवासस्थानात बि-हाड थाटले. निवासस्थानाचे काम पूर्ण झाले असले, तरी आजूबाजूची सफाई, लेव्हलिंग, उद्यान, संरक्षक भिंत आदी कामे अजून अपूर्ण आहेत. निवासस्थानासमोर निदान उद्यान तरी व्हावे, यासाठी त्यांनी उद्यान विभागाच्या कर्मचा-यांना सूचना दिल्या. त्यानंतर या विभागाने 45 हजार रुपये खर्चाच्या उद्यानाचा प्रस्ताव तयार करून त्यासाठी लागणारे मुरूम, माती आदी साहित्य निवासस्थानासमोर आणून टाकले. रोपांची खरेदी व लागवड करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला कार्यारंभ आदेशही देण्यात आला. परंतु यापूर्वीची लाखो रुपयांची बिले महापालिकेने न दिल्याने 45 हजार रुपयांचे हे उद्याने विकसित करण्यास संबंधित ठेकेदाराकडून टाळाटाळ करण्यात येत आहे.


उद्यानाच्या कामाचे काय झाले, अशी विचारणा आयुक्तांनी उद्यान विभागाच्या कर्मचा-यांना केली, तर त्यांच्याकडून केवळ अडचणींचा पाढा वाचला जातो. स्वत:च्या घरचेच काम असल्याने आयुक्तांनाही याबाबत फारसे काही बोलता येत नाही. मात्र, निवासस्थानाच्या परिसराची दुरवस्था पाहता जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ यांच्यासारख्या वरिष्ठ अधिका-यांना घरी येण्याचे निमंत्रण देताना आयुक्तांची कुचंबणा होते.


ठेकेदाराकडून टाळाटाळ
आयुक्तांच्या निवासस्थानासमोर उद्यान विकसित करण्यासाठी ठेकेदाराला दोन महिन्यांपूर्वीच कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. परंतु यापूर्वीचे बिले न मिळाल्याने ठेकेदाराकडून काम करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. मुरूम व माती टाकली आहे, पण रोपांची खरेदी होणे बाकी आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू.’’ किसन गोयल, विद्यान विभागप्रमुख.


‘एमजीपी’कडून हरकत नाही
निवासस्थान परिसरात महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरण विभागाची (एमजीपी) मोठी जागा आहे, परंतु ती विकसित होत नाही. जागा लेव्हल करून चांगली झाडे लावता येतील. त्यासाठी जीवन प्राधिकरण विभागाची काहीच हरकत नाही. परंतु त्यासाठी मनपा कर्मचा-यांचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे.’’
विजय कुलकर्णी, आयुक्त.