आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar Municipal Corporation Election Bjp Sena Alliance

प्रतीक्षा युती आणि आघाडीच्या निर्णयाची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांकडे सुमारे 726 उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत, परंतु युती व आघाडीबाबत अद्याप कोणताच निर्णय न झाल्याने इच्छुकांत अस्वस्थता आहे. शनिवारी सायंकाळी युतीसाठी दोन्ही पक्षांत प्राथमिक स्तरावर चर्चा झाली, तर आघाडीच्या निर्णयाचा चेंडू स्थानिक पदाधिकार्‍यांनी प्रदेशच्या कोर्टात ढकलला आहे. त्यामुळे युती, आघाडीच्या निर्णयासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी 15 डिसेंबरला मतदान होणार आहे. 68 जागांसाठी ही निवडणूक आहे. यातील 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. निवडणुकीसाठी सेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादीसह मनसेनेही जोरदार तयारी केली आहे. सर्वच पक्षांकडे इच्छुकांची गर्दी वाढली आहे. प्रमुख पक्षांकडे 150 हून अधिकजणांनी मुलाखती दिल्या आहेत. मात्र, आघाडी-युतीच्या जागावाटपाचे गुर्‍हाळ अजून सुरूच आहे. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, रिपाइं, शिवराज्य पक्ष, आरपीआय व अपक्षांनीही निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

शिवसेनेकडून 38 व 30 असा जागावाटपाचा आग्रह धरला जात आहे, तर भाजपची 34-34 अशी समसमान जागावाटपाची मागणी आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेने 36 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 18 जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले होते. भाजपने 28 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 12 जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले होते.

यंदाच्या निवडणुकीत मात्र युती व आघाडीसमोर मनसेसह अपक्ष उमेदवारांचे मोठे आव्हान उभे राहणार आहे. उमेदवारी नाकारण्यावरून सर्वच पक्षांत मोठय़ा प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. त्याचा मोठा फटका सर्वच प्रमुख पक्षांना बसणार आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कराव जाधव मंगळवारी (19 नोव्हेंबर) नगरमध्ये येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी भवन येथे जिल्हा मेळावा होणार आहे. पालकमंत्री मधुकर पिचड, पक्ष निरीक्षक अंकुश काकडे आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी दिली.


जागावाटप व युतीचा निर्णय आज होणार?
शनिवारी रात्री शिवसेना-भाजपच्या पदाधिकार्‍यांची युतीबाबत यश ग्रँड येथे बैठक झाली. भाजपकडून 34-34 चा प्रस्ताव देण्यात आला आहे. भाजपचे सरचिटणीस अनंत देसाई, सुनील रामदासी व शिवसेनेकडून दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहराध्यक्ष संभाजी कदम, अनिल शिंदे, सुनील साळवे व सुधीर पगारिया यांनी चर्चेत भाग घेतला. सोमवारी (18 नोव्हेंबर) पुन्हा दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटप व युतीचा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे.’’ अभय आगरकर, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप

महायुती होणार यात शंका नाही
महायुती होणार यात काही शंकाच नाही. स्थानिक पातळीवर महायुतीबाबत प्राथमिक चर्चा होईल.चर्चेत जागावाटपावरून काही पेच निर्माण झाला, तर मुंबईत भाजप व आरपीआयच्या पदाधिकार्‍यांसमवेत वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्यात येईल. महायुतीसाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. भाजपकडून सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे. ’’ गजानन कीर्तीकर, शिवसेना नेते

चार दिवसांत निर्णय अपेक्षित
रविवारी (17 नोव्हेंबर) रात्री आघाडी व जागावाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा होणार आहे. ही चर्चा प्राथमिक स्तरावर आहे. आम्ही त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहोत. आघाडी व जागावाटपाचा निर्णय लगेचच होणार नाही. येत्या चार दिवसांत आघाडी व जागावाटपाबाबतचा निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.’’ ब्रिजलाल सारडा, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

सेना, भाजपला आरपीआयला द्याव्या लागणार 12 जागा
भारतीय जनता पक्षाने जागावाटपाबाबत 34-34 चा प्रस्ताव शिवसेनेला दिला आहे. शिवसेनेने मात्र 30-38 प्रस्ताव भाजपला दिला आहे. दोन्ही पक्षांतील पदाधिकारी आपल्या प्रस्तावावर ठाम आहेत. मात्र, यातून 32-38 तोडगा निघण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्ष आरपीआयला काही जागा देणार आहेत.आरपीआयने 12 जागांची मागणी केली आहे.