आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"रिलायन्स'च्या पैशांची उधळपट्टी, होत आहे रस्‍त्‍यावर रस्‍ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेतील भ्रष्ट कारभाराचे आणखी एक प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. रस्त्यांच्या नुकसान भरपाईपोटी रिलायन्स कंपनीकडून घेतलेल्या तब्बल साडेपाच कोटी रुपयांची उधळपट्टी सध्या प्रशासनाकडून सुरू आहे. रिलायन्सची केबललाइन टाकताना ज्या ठिकाणी रस्त्यांचे नुकसान झाले, तेथील दुरुस्तीसाठी निधी न वापरता तो भलतीकडेच मनमानी पध्दतीने खर्च करण्यात येत आहे. एकाच रस्त्यावर दोन वेळा खर्च दाखवून लाखो रुपयांची बिले ठेकेदाराला देण्यात आली आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यावरही खर्च केल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी दाखवले आहे.
मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह काही पदाधिकाऱ्यांचा या प्रकरणाशी थेट संबंध असल्याची माहिती समजली. यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली आहे.
रिलायन्स जीओ इन्फोकॉमने रस्ता खोदाईपोटी जमा केलेल्या साडेपाच कोटी रुपयांमधून शहराच्या विविध भागातील रस्त्यांचे पॅचिंग व नूतनीकरणाची कामे सध्या सुरू आहेत. मात्र, या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. प्रभाग क्रमांक ११ मध्ये गीतांजली मेडिकल ते वाघ घर या १९५ मीटर लांब व सरासरी साडेपाच मीटर रुंद रस्त्याचे दोन महिन्यांपूर्वी काम झाले. हे काम प्रभाग क्रमांक १२ मधील प्रोफेसर कॉलनी चौक ते कुष्ठधाम रस्त्यावर झालेल्या पॅचिंगच्या कामाशी सलग्न असल्याचे मनपा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुळात संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी कोणतीही मंजुरी नसताना हे काम करण्यात आले. दोन्ही कामांच्या ठिकाणांमध्ये जवळपास दीड किलोमीटरचे अंतर आहे, तसेच प्रभागही वेगवेगळे आहेत. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी रिलायन्सने केबललाइन टाकली, त्या ठिकाणी कामेच झाली नाहीत. पदाधिकारी, नगरसेवक व ठेकेदार यांच्या सोयीनुसार मनमानी पध्दतीने रस्त्यांची ही कामे करण्यात येत आहेत.
तारकपूर बसस्थानक ते पत्रकार चौक (मनमाड रस्ता) रस्त्यावरील मराठा मंदिर, तसेच मिस्किन मळा रस्त्यावरील प्रकाशपूर, महालक्ष्मी मंदिर, प्रोफेसर कॉलनी चौक, कुष्ठधाम ते पानसंबळ हॉस्पिटलपर्यंतच्या रस्त्याच्या कामाची बिले केबललाइन टाकण्यापूर्वीच ठेकेदाराला देण्यात आली. मराठा मंदिर ते तारकपूर कॉर्नरपर्यंतचा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे, तरी देखील या रस्त्याच्या कामाची बिले काढण्यात आली आहेत. एकाच मार्गावरील सर्व कामांचे तुकडे पाडून सुमारे २० लाख रुपयांची बिले ठेकेदाराला अदा करण्यात आली आहेत. ठेकेदाराने केलेल्या या सर्वच कामाचा अवघ्या तीन महिन्यांत बोजवारा उडाला आहे. प्रोफेसर कॉलनी चौक ते कुष्ठधामपर्यंतच्या रस्त्यावर करण्यात आलेले संपूर्ण पॅचिंग उखडले असून आता या रस्त्यावर सर्वत्र खड्डे दिसत आहेत. या रस्त्यावरील पॅचिंगच्या कामाचे शेवटचे आठ लाख रुपयांचे बिल अदा करण्याची तयारीदेखील प्रशासनाने सुरू केली आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कोणत्‍या कामावर झाली उधळपट्टी.