आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar Municipal Corporation : Freestyle For The BJP Candidature

नगर मनपा निवडणूक: भाजपच्या उमेदवारीसाठी ‘फ्रीस्टाईल’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात सुरू असलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमात गुरुवारी चांगलाच राडा झाला. प्रभाग 18 मधील उमेदवारीवरून नगरसेवक जसपालसिंग पंजाबी व इच्छुक उमेदवार बंटी डापसे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांत फ्रीस्टाईल मारामारी झाली. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली नाही.

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पक्षांकडून उमेदवारी जाहीर झाली नसली, अनेक इच्छुक उमेदवार आतापासूनच निवडणूक रिंगणात उतरले आहेत. भाजपच्या लक्ष्मीकारंजा येथील कार्यालयात दोन दिवसांपासून उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. अनेकांनी शक्तिप्रदर्शन करत मुलाखती दिल्या. या शक्तिप्रदर्शनामुळे गुरूवारी मुलाखतीच्या कार्यक्रमाला गालबोट लागले. प्रभाग 18 मधील इच्छुक उमेदवार बंटी डापसे सकाळी 11 वाजता मिरवणुकीने मुलाखतीसाठी आले. याच दरम्यान नगरसेवक जसपालसिंग पंजाबी यांनी ढोलताशांसह मिरवणूक काढली.

लक्ष्मीकारंजा येथे दोन्ही मिरवणूक आल्यानंतर पंजाबी व डापसे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. भाजप कार्यालयासमोर त्याचे रुपांतर मारामारीत झाले. शिवीगाळ व खुच्र्यांची फेकाफेक झाली. त्यामुळे एकच गोंधळ उडला. मुलाखती घेणारे खासदार दिलीप गांधी, जिल्हाध्यक्ष अँड. प्रताप ढाकणे, शहर जिल्हाध्यक्ष अँड. अभय आगरकर यांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना शांत केले. नंतर पुन्हा मुलाखतींचा कार्यक्रम सुरू झाला.

पंजाबी हे शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक आहेत, तर डापसे हे खासदारपुत्र सुवेंद्र गांधी यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांपासून डापसे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. पंजाबी यांनी मात्र आतापर्यंत अनेक पक्ष बदलले आहेत. त्यामुळे प्रभाग 18 मधील भाजपच्या उमेदवारीवर डापसे हक्क सांगत आहेत. त्यासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. पंजाबी यांना उमेदवारी मिळाल्यास आपली अडचण होईल, अशी भीती डापसे यांना आहे. पंजाबी यांनी भाजपकडून उमेदवारी मिळो अथवा न मिळो, प्रभाग 18 मधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दोघांमध्ये काही दिवसांपासून शीतयुध्द सुरू आहे.

कार्यकर्त्यांच्या वादाशी पक्षाचा संबंध नाही
डापसे व पंजाबी मुलाखत देण्यासाठी आले होते. त्यांच्यात झालेल्या मारामारीशी पक्षाचा कोणताही संबंध नाही. त्यांच्या आपसातील वादातून हा प्रकार घडला असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी गुरूवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डीले, शहर जिल्हाध्यक्ष अँड. अभय आगरकर आदी उपस्थित होते. दोन दिवसांत 127 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. येत्या दोन दिवसांत बैठक घेऊन उमेदवारीबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
मालन ढोणे व सुवेंद्र गांधी यांचेही शक्तिप्रदर्शन

पहिल्या दिवशी काँग्रेसचे श्रीकांत छिंदम व राष्ट्रवादीच्या आशा कराळे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाजपच्या मुलाखतीला हजेरी लावली. दुसर्‍या दिवशी त्याचीच पुनरावृत्ती झाली. महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती मालन ढोणे व खासदारपुत्र सुवेंद्र गांधी यांनी शक्तिप्रदर्शन करत मुलाखतीला हजेरी लावली. गांधी यांच्या मिरवणुकीत ढोल बडवणार्‍यांना चिअरअप देण्यासाठी चक्क पन्नास आणि शंभरच्या नोटा उधळण्यात आल्या. ढोणे यांच्या मिरवणुकीत बालगोपाळांच्या हातात पक्षाचे झेंडे देण्यात आले होते.
‘त्यांनी‘ शिवीगाळ केली
प्रभाग 18 मधून निवडणूक लढवण्याची मी पूर्ण तयारी केली आहे. पंजाबींनी याच प्रभागातून उमेदवारी मागितली असून त्यास माझा विरोध आहे. ते सर्व पक्ष फिरून आले आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना पैसे वाटून मिरवणूक काढली. लक्ष्मीकारंजा येथे मिरवणूक आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी खुन्नस दिली. भाजप कार्यालयासमोर गेल्यानंतर त्यांच्या महिला कार्यकर्त्यांनी शिवीगाळ सुरू केली. मी माझ्या कार्यकर्त्यांना शांत राहण्यास सांगत होतो. पंजाबी यांच्या कार्यकर्त्यांनीच मारामारी सुरू केली.’’ बंटी डापसे, इच्छुक उमेदवार
ही तर डापसे यांची दादागिरी

निवडणूक न लढवण्यासाठी डापसेंकडून दादागिरी करण्यात येत आहे. मी लोकशाही मार्गाने उमेदवारी मागण्यासाठी गेलो होतो. डापसे यांनी कार्यकर्त्यांकरवी दगडफेक केली. त्यांचे कार्यकर्ते अचानक अंगावर धावून आले. मला उमेदवारी द्यायची की नाही हा पक्षाचा प्रश्न आहे. डापसे यांनी अशाप्रकारे दडपशाही करणे चुकीचे आहे. हिंमत असेल, तर त्यांनी निवडणूक लढवावी. माझ्याबरोबर मतदार आहेत. त्यामुळे डापसेसारख्यांना मी कधीच भीक घालणार नाही.’’ जसपालसिंग पंजाबी, विद्यमान नगरसेवक