आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar Municipal Corporation Increase Tax News In Marathi

यंदा ५ ते २०% करवाढ नगरकरांवर लादणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मागील वर्षी अंदाजपत्रक सादर करण्यास उशीर झाल्याने करवाढीचे संकट टळले होते. यंदा मात्र महापालिका प्रशासन अंदाजपत्रक वेळेत सादर करणार आहे. त्यासाठी प्रशासकीय स्तरावर बैठका सुरू आहेत. २०१५-१६ या वर्षात सर्व करांमध्ये ५ ते २० टक्क्यांपर्यंत करवाढ प्रशासनाला अपेक्षित असल्याची खात्रीशीर माहिती "दिव्य मराठी'ला मिळाली.

मनपा प्रशासनाने मागील वर्षी तब्बल ५९३ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. परंतु महापालिका निवडणूक व त्यानंतर लगेच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अंदाजपत्रक सादर करण्यास उशीर झाला. त्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारची करवाढ करता आली नाही. यंदा मात्र २० फेब्रुवारीपर्यंत अंदाजपत्रक मंजूर करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. येत्या आठ-दहा दिवसांत अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करण्यात येईल. अंदाजपत्रकाबाबत चर्चा करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर बैठका सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी आयुक्त विजय कुलकर्णी यांनी अंदाजपत्रकीय बैठकीत सविस्तर चर्चा केली. त्यात अग्निशमन कर, मलनिस्सारण कर, वृक्ष कर, घनकचरा कर अशा विविध प्रकारच्या चौदा करांमध्ये प्रत्येकी पाच ते वीस टक्क्यांपर्यंत करवाढ सुचवण्यात आली आहे.

प्रशासनाने सुचवलेल्या या करवाढीस स्थायी समिती व महासभेची मंजुरी घ्यावी लागणार आहे. करवाढ सुचवली असल्यास अंदाजपत्रकाला २० फेब्रुवारीपूर्वी महासभेची मंजुरी घ्यावी लागते. अंदाजपत्रक वेळेत सादर करण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. त्यामुळे २०१५-१६ वर्षाच्या अंदाजपत्रकास २० फेब्रुवारीपूर्वी मंजुरी मिळेल. त्यामुळे नगरकरांवरील करवाढ अटळ आहे.

प्रशासनाने मागील वर्षीच्या अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ न करता रखडलेल्या विकासकामांवर भर दिला होता. त्यात पाणी योजना, नगरोत्थान, घरकुल, नाट्यगृह, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अग्निशमन सेवा तसेच घनकचरा प्रक्रिया प्रकल्पांतून शहरविकासाला चालना देण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु घरकुल योजना वगळता अन्य विकासकामांची परिस्थिती वर्षभरानंतरही "जैसे थे' आहे. आगामी अंदाजपत्रकात या कामांसाठी पुन्हा भरीव तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे अंदाजपत्रकाचा आकडा एक हजार कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
असे होते अंदाजपत्रक
५९३
कोटी शिलकी अंदाजपत्रक
१८४
कोटी महसूली उत्पन्न
२९९
कोटी भांडवली उत्पन्न
४८८ कोटी खर्च
थकबाकीचा आकडा फुगणार
महापालिका नागरिकांकडून चौदा प्रकारचे संकलित कर वसूल करते. मात्र, बदल्यात एकही चांगली सुविधा मिळत नसल्याने कर न भरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे थकबाकीचा आकडा सव्वा कोटीपेक्षा अधिक झाला आहे. असे असतानाही प्रशासनाने या वर्षी मोठ्या प्रमाणात करवाढ सुचवली असून त्यामुळे थकबाकीचा हा आकडा आणखी फुगणार आहे.
रखडलेल्या या कामांसाठी पुन्हा िनधीची तरतूद होणार
सावेडी उपनगरासाठी स्वतंत्र कचरा डेपो
विळद येथे पाणी पुनर्वापर प्रकल्प
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र प्रकल्प
शहराबाहेर आधुनिक कत्तलखाना
पाणी योजनांसाठी स्वतंत्र आराखडा
शहर स्वच्छता आराखडा
शहरासाठी भुयारी गटार योजना
शहर विकासातील रस्त्यांचा विकास
सावेडी उपनगरातील नाट्यगृह
नगर शहराचा पर्यटनविकास