आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपाच्या गाळ्यांचे हस्तांतरण करण्याची स्थायीची शिफारस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे यांनी 2013-14 चे अंदाजपत्रक दुरुस्त्या व शिफारशींसह सोमवारी महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सादर केले. तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी मनपाच्या गाळ्यांचे हस्तांतरण करण्याची शिफारस स्थायीने केली आहे. अंदाजपत्रकाचा अभ्यास करण्यासाठी सभा बुधवारपर्यंत (20 फेब्रुवारी) तहकूब करण्यात आली.

आगामी वर्षासाठी 408.91 कोटींचे अंदाजपत्रक आयुक्तांनी 8 फेब्रुवारीला स्थायी समितीला सादर केले. स्थायीने दोन दिवस चर्चा करून दुरुस्त्या व शिफारशींसह ते सोमवारी महासभेपुढे सादर केले. यावेळी उपमहापौर गीतांजली काळे, आयुक्त विजय कुलकर्णी, उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे, प्रभारी उपायुक्त संजीव परशरामी, मुख्य लेखाधिकारी प्रदीप शेलार, प्रभारी नगरसचिव मिलिंद वैद्य उपस्थित होते.

वाकळे म्हणाले, अंदाजपत्रकात सर्वांचाच विचार करण्यात आला आहे. प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या अग्निशमन, जललाभ, मललाभ व वृक्षकरात स्थायीने कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल. मनपाची आर्थिक स्थिती पाहता उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. उत्पन्न व खर्चाचा मेळ घालून र्मयादित उत्पन्नात शहराच्या विकासाचा वेग कायम ठेवावा लागणार आहे. स्थानिक संस्था करातून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे स्थायीने पारगमन करात वाढ करून खात्रीशीर उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण केला आहे. त्यामुळे मनपाच्या उत्पन्नात 10 ते 11 कोटींची वाढ होईल. नवीन मिळकतीवर कर आकारणी केल्यास उत्पन्नात कायमची भर पडणार असून त्यामुळे कर्मचार्‍यांचे पगार व विकासकामाला मदत होणार असल्याचे वाकळे यांनी सांगितले.

तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी मनपाच्या गाळ्यांचे हस्तांतरण करण्याची शिफारस स्थायीने केली आहे. जमा होणार्‍या उत्पन्नातून सावेडीत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 2 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचे वाकळे यांनी सांगितले.

स्थायीच्या शिफारशी
पारगमन कर सरकसकट 150 रुपये
वाहनांसाठी सावेडीत स्वतंत्र वर्कशॉप
कोंडवाडा, सेप्टिक टँक विभागाचे खासगीकरण
महालक्ष्मी उद्यानाचे खासगीकरण
जाहिरात फलक जागाभाडे वाढवणे
गाळे हस्तांतरणातून शॉपिंग कॉम्प्लेक्स
नगरसेवक व वॉर्ड विकासनिधीत वाढ
उपनगरांतील रस्तेविकासासाठी 75 लाख
सावेडी उपनगरात अमरधाम