आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आस्थापनाने धुडकावला उपायुक्त बेहेरेंचा आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेत काही अधिकारी विभागप्रमुखांची मुजोरी वाढली आहे. स्वत:चे हितसंबंध जपण्यासाठी आस्थापना प्रमुख अंबादास सोनवणे सहायक आयुक्त अशोक साबळे यांनी काही कर्मचार्‍यांच्या मनमानी पध्दतीने अंतर्गत बदल्या केल्या आहेत. एका महिला कर्मचार्‍याची बदली नियमबाह्य असून ती तत्काळ रद्द करावी, असे आदेश उपायुक्त (कर) यांनी दिले. परंतु साबळे सोनवणे यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत या महिला कर्मचार्‍याची सूड बुध्दीने बदली केली आहे. इतर काही कर्मचार्‍यांच्या बदल्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण झाली असल्याचे एका पीडित कर्मचार्‍याने "दिव्य मराठी'शी बोलताना (नाव छापण्याच्या अटीवर) सांगितले.

महापालिका प्रशासनाने फेब्रुवारी २०१५ मध्ये ११ कर्मचार्‍यांच्या अंतर्गत बदल्या केल्या. लेखा विभाग, माहिती सुविधा केंद्र, पाणीपुरवठा, बांधकाम, घनकचरा, विवाह नोंदणी, कामगार विभाग, सामान्य प्रशासन अशा विविध विभागातील कर्मचार्‍यांचा या बदल्यांमध्ये समावेश आहे. यातील निम्म्यापेक्षा अधिक कर्मचार्‍यांच्या बदल्या सूडबुद्धीने तसेच आर्थिक देवाण-घेवाण करून करण्यात आलेल्या आहेत. त्यात आस्थापना विभागप्रमुख सोनवणे सहायक आयुक्त साबळे यांची महत्त्वाची भूमिका आहे. विशेष म्हणजे या बदल्या करण्यामागचा उद्देश काय होता, याबाबत बोलण्यास हे दोन्ही अधिकारी बोलण्यास तयार नाहीत. बदल्या झालेल्या ११ पैकी तीन-चार कर्मचार्‍यांच्या सहा महिन्यांपूर्वीच बदल्या करण्यात आलेल्या होत्या. तरी देखील त्यांच्या पुन्हा नियमबाह्य बदल्या करण्यात आल्या.

एका महिला कर्मचार्‍याची सहा महिन्यांपूर्वीच बदली झालेली आहे. ज्या विभागात बदली झालेली आहे, त्या विभागास या महिला कर्मचार्‍याची गरज आहे. त्यामुळे या महिला कर्मचार्‍याची पुन्हा करण्यात आलेली बदली नियमबाह्य आहे. ती तत्काळ रद्द करावी, असे लेखी आदेश उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांनी आस्थापना विभागाला दिले. परंतु कर्मचार्‍यांची नेहमीच या-ना त्या कारणाने अडवणूक करणार्‍या या विभागाने उपायुक्तांच्या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवली. सहायक आयुक्त साबळे यांनी देखील याप्रकरणी महत्त्वाची भूमिका बजावली. उपायुक्तांचे आदेश डावलून त्यांनी या महिला कर्मचार्‍यास बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास भाग पाडले. कर्मचार्‍यांच्या बदल्यांबाबत हे दोन्ही अधिकारी नेहमीच हेकेखोर पद्धतीने वागतात. आतापर्यंत अनेक कर्मचारी त्यांच्या पिळवणुकीस बळी पडले आहेत. याप्रकरणी आयुक्त विजय कुलकर्णी, उपायुक्त चारठाणकर आमदार जगताप यांनी लक्ष घालावे, अशी मागणी कर्मचार्‍यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केली.

आस्थापनात "तो शिपाई'च अधिकारी
आस्थापनाविभागातील एक शिपाई देखील गेल्या काही वर्षांपासून कर्मचार्‍यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करत आहे. कर्मचार्‍यांची रजा, वेतन, बदल्या, कर्जप्रकरण अशी कामे या शिपायाशिवाय होत नाहीत. अर्थात त्यासाठी कर्मचार्‍यांना हा शिपाई त्याच्या वरिष्ठांचा खिसा आधी भरावा लागतो, मगच त्यांचे काम मार्गी लागते. विशेष म्हणजे आस्थापना विभागात या शिपायाचा वावर एखाद्या अधिकार्‍याप्रमाणेच असतो.

कर्मचार्‍यांवर अन्याय नाही
हे प्रकरण माझ्या कानावर आले आहे, मी रजेवर असताना हा प्रकार झालेला आहे. त्याबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करू. कोणत्याही कर्मचार्‍यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेऊनच बदल्या करण्यात येतात. येत्या आठ ते दहा दिवसांत पदोन्नती बदल्या होणार आहेत. त्याबाबतची कार्यवाही सुरू आहे.'' अजय चारठाणकर, उपायुक्त, मनपा.