आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar Municipal Corporation News In Marathi, Staff, Divya Marathi

कर्मचार्‍यानेच दिला नगर मनपाला घरचा आहेर, पाच हजार बोगस नळजोड दिल्याचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिकेच्या झेंडीगेट प्रभागात सुमारे पाच हजार बोगस नळजोड आहेत, असा आरोप या कार्यालयातील सहायक लेखाधिकारी हाफिजोद्दिन सय्यद यांनी केला आहे. विशेष म्हणजे प्रभाग कार्यालयातील लिपिक एजाज शेख व लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने हे नळजोड देण्यात आले असल्याची लेखी तक्रार सय्यद यांनी आयुक्त विजय कुलकर्णी यांच्याकडे केली आहे. याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास 21 एप्रिलपासून मनपा कार्यालयात उपोषण करण्याचा इशाराही सय्यद यांनी दिला आहे. मनपा कर्मचार्‍यानेच मनपा कर्मचार्‍याविरोधात आरोप केल्याने मनपा प्रशासनाला घरचा आहेर मिळाला आहे.


सय्यद व शेख हे दोघेही एकाच कार्यालयात काम करतात. सय्यद यांची काही दिवसांपूर्वी तात्पुरत्या स्वरूपात रेकॉर्ड विभागात बदली करण्यात आली. लिपिक शेख यांनी लोकप्रतिधींशी संगनमत करून प्रभागात सुमारे पाच हजार बोगस नळजोड दिले असल्याचा आरोप सय्यद यांनी केला आहे. याबाबत त्यांनी आयुक्तांकडे अनेकदा लेखी तक्रार दिली, परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. प्रभागातील सर्व बोगस नळजोड बंद करून शेख यांच्यासह संबंधितांवर तातडीने कारवाई न झाल्यास 21 एप्रिलपासून उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे पाच हजार नळजोड बोगस असल्याचे प्रतिज्ञापत्रच त्यांनी आयुक्तांना दिले आहे.


शहरातील मालमत्तांची संख्या दीड लाखांच्या पुढे गेली असताना महापालिकेकडे मात्र केवळ 46 हजार अधिकृत नळजोडांची नोंद आहे. त्यामुळे अनधिकृत नळजोडांची संख्या 50 हजारांपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट होते. बोगस नळजोडांकडे दुर्लक्ष केल्याने मनपाचे पाणीपट्टीचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच मालमत्ताधारक अनधिकृतपणे नळ जोडणी करतात. कोणतीही परवानगी न घेता पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचार्‍यांना हाताशी धरून परस्पर नळजोड घेण्याचा प्रकार अनेक वर्षांपासून शहरात सुरू आहे. पाणीपुरवठा विभागाकडे केवळ 46 हजार अधिकृत नळजोडांची नोंद असून उर्वरित सर्व नळजोड अनधिकृत आहेत. या अनधिकृत नळजोडांची माहिती असूनही पाणीपुरवठा विभागाकडून कोणतीच कारवाई होत नाही.


कारवाईचे अधिकार प्रभाग अधिकार्‍यांना
शहरातील प्रभाग अधिकार्‍यांना अनधिकृत नळजोडधारकांवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. एखाद्या व्यक्तीने अनधिकृत नळजोड घेतला असेल, तर त्याच्यावर महाराष्ट्र राज्य मालमत्ता विद्रुपीकरण कायदा 1995 चे कलम 3 (ब) भारतीय दंड संहिता 379 नुसार कारवाई करण्याचे अधिकार प्रभाग अधिकार्‍यांना आहेत. मात्र अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे त्यांना कारवाई करणे शक्य होत नाही. केवळ मार्च अखेर दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडून तुटपूंज्या स्वरूपाची कारवाई करण्यात येते. त्यामुळे अनधिकृत नळजोडांची संख्या वाढत आहे.

. तर 21 एप्रिलपासून उपोषण
प्रभाग समिती 3 मध्ये बोगस नळजोडांची संख्या वाढली आहे. त्याबाबत आयुक्तांकडे वेळोवेळी तक्रार केली, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. प्रभाग कार्यालयातील शेख व लोकप्रतिनीधींच्या संगनमताने हा उद्योग अनेक वर्षांपासून सुरू आहे. याप्रकरणी कारवाई झाली नाही, तर 21 एप्रिलपासून महापालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहे.’’ हाफिजोद्दिन सय्यद, तक्रारदार, मनपा कर्मचारी.


कर्मचार्‍यांचा खिसे भरू उद्योग
महापालिकेच्या माहिती सुविधा केंद्रात मिळणारा अर्ज व 500 रुपये फी भरल्यानंतर संबंधित कर्मचारी नळजोडणीच्या ठिकाणाची पहाणी करतात. त्यानंतर शंभर रुपयांचे दोन स्टॅम्प, घरपट्टी भरल्याची पावती व दिड हजार रुपये अनामत रक्कम भरल्यानंतर नवीन नळजोड मिळतो. परंतु हे सर्व सोपस्कार करण्यापेक्षा पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्‍याला हाताशी धरून कोणतीही परवानगी व शुल्क न भरता नळजोड घेण्याची अनेकांची मानसिकता आहे. कर्मचारी देखील स्वत:चे खिसे भरण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून अनधिकृतपणे नळजोड देत आहेत.