आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar Municipal Corporation Not Get Apropriate LBT Collection

नगर महानगरपालिका क्षेत्रात एलबीटीचा ‘फ्लॉप शो’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - स्थानिक संस्था करातून (एलबीटी) जकातीएवढेच उत्पन्न मिळेल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने वर्षभरापूर्वी व्यक्त केला होता. मात्र, एलबीटीतून फक्त 35 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. नोंदणी झालेल्या सात हजारांपैकी अवघ्या अडीच हजार व्यापार्‍यांनीच एलबीटीचे वार्षिक विवरणपत्र सादर केले. त्यामुळे महापालिकेसाठी एलबीटी ‘फ्लॉप शो’ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

एलबीटी लागू होऊन वर्ष पूर्ण झाले, तरी मनपाच्या तिजोरीत अपेक्षित उत्पन्न जमा झालेले नाही. आतापर्यंत केवळ 35 कोटींचा एलबीटी जमा झाला आहे. जकातीच्या तुलनेत हे उत्पन्न तोकडे आहे. त्यामुळे मनपासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. एलबीटीतून मनपाची तिजोरी निश्चित भरेल, असा विश्वास प्रशासनाला होता. परंतु दर महिन्याला सरासरी अडीच कोटींचाच एलबीटी जमा झाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

जुलै 2012 पासून एलबीटीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने एक लाखापेक्षा अधिक उलाढाल असलेल्या शहरातील 7 हजार व्यापार्‍यांची नोंदणी केली. परंतु त्यापैकी निम्म्या व्यापार्‍यांनीच आतापर्यंत एलबीटी भरला. केवळ अडीच हजार व्यापार्‍यांनी वार्षिक विवरणपत्र सादर केले आहे. सर्व व्यापार्‍यांनी विवरणपत्र सादर करणे आवश्यक होते. त्यासाठी प्रशासनाने आवाहन करून वेळोवेळी मुदतवाढही दिली.

चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात एलबीटीतून 48 कोटींचे उत्पन्न गृहित धरण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत केवळ 35 कोटींच जमा झाल्याने मनपाचे गणित कोलमडणार आहे. प्रशासनाने प्रभावीपणे वसुली केल्यास एलबीटीच्या उत्पन्नात वाढ होईल, असे पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे. मात्र, एलबीटी विभागातील कर्मचार्‍यांची संख्या फक्त 18 असल्याने प्रभावीपणे अंमलबजावणी कशी होणार, असा प्रश्न आहे.

एलबीटीपूर्वी जकात व पारगमनच्या माध्यमातून मनपाला दर महिन्याला सुमारे साडेसात कोटींचे उत्पन्न मिळत होते. एलबीटीनंतर उत्पन्न निम्म्याने घटले आहे.


आतापर्यंत मिळालेला एलबीटी
जुलै - 2 कोटी 3 लाख, ऑगस्ट - 1 कोटी 83 लाख, सप्टेंबर - 2 कोटी 54 लाख, ऑक्टोबर - 3 कोटी 23 लाख, नोव्हेंबर - 3 कोटी 15 लाख, डिसेंबर - 3 कोटी 24 लाख, जानेवारी - 3 कोटी 75 लाख, फेब्रुवारी - 2 कोटी 74 लाख, मार्च - 2 कोटी 75 लाख, एप्रिल - 2 कोटी 58 लाख, मे - 2 कोटी 90 लाख, जून-जुलै - 4 कोटी 25 लाख.


भरणा आता 20 तारखेपर्यंत
एलबीटी लागू झाल्यापासून प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत एलबीटीचा भरणा करणे आवश्यक होते. परंतु आता सुधारित शासन निर्णयानुसार महिन्याच्या 20 तारखेपर्यंत भरणा करता येईल. याआधी सहामाही व वार्षिक अशी दोन विवरणपत्रे सादर करणे आवश्यक होते. परंतु आता सहामाही विवरणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही.


आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करणार
वार्षिक विवरणपत्र सादर न करणार्‍या व्यापार्‍यांना नोटिसा बजावणार असून दंडात्मक कारवाईसाठी आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. कारवाई टाळण्यासाठी व्यापार्‍यांनी लवकरात लवकर विवरणपत्र सादर करावे.’’ दिनेश गांधी, एलबीटी अधिकारी.