आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लूट न थांबल्यास ठेका रद्द करणार; पालिका आयुक्त कुलकर्णी यांचा ‘मॅक्स लिंक’ला इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पारगमन नाक्यांवर होणार्‍या ट्रकचालकांच्या लुटीबाबत आयुक्त विजय कुलकर्णी व महापौर शीला शिंदे यांनी बुधवारी कठोर भूमिका घेतली. ट्रकचालकांची लूट न थांबल्यास संबंधित ठेकेदार संस्थेचा ठेका रद्द करण्यात येईल, तसेच नाक्यांवरील मनपा कर्मचार्‍यांना तातडीने निलंबित करण्यात येईल, असा इशारा आयुक्त व महापौरांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिला.

पारगमन शुल्क वसुलीचा ठेका 1 जानेवारीपासून ‘मॅक्स लिंक’ला देण्यात आला आहे. या संस्थेचे कर्मचारी नियमापेक्षा जास्त शुल्क वसूल करून ट्रकचालकांची पिळवणूक करीत असल्याच्या अनेक तक्रारी मनपाकडे आल्या आहेत. ठेका घेऊन एकच महिना उलटला असताना ठेकेदाराच्या कर्मचार्‍यांनी सुरू केलेली ही लूट मनपाच्या अधिकार्‍यांना माहिती असूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, नाक्यांवरील वास्तव ‘दिव्य मराठी’ने सलग दोन दिवस प्रसिद्ध करताच आयुक्तांसह अन्य अधिकारीही खडबडून जागे झाले. जकात अधीक्षक अशोक साबळे यांच्यापासून नाक्यांवरील पर्यवेक्षकांपर्यंत सर्वांनी ‘दिव्य मराठी’च्या वृत्ताचा धसका घेतला.

ट्रकचालकांच्या लुटीबाबत प्रशासकीय पातळीवर काय कार्यवाही करण्यात आली, अशी विचारणा ‘दिव्य मराठी’ने बुधवारी आयुक्त व महापौरांकडे केली असता आयुक्त कुलकर्णी म्हणाले, नियमबाह्य वसुलीबाबत संबंधित ठेकेदाराला समज देण्यात आली आहे. तसेच, नाक्यावरील मनपा कर्मचार्‍यांनाही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. समज देऊनही गैरप्रकार थांबले नाहीत, तर संबंधित संस्थेचा ठेका रद्द करण्यात येईल.

महापौर शिंदे म्हणाल्या, याबाबत जकात अधीक्षकांसह अन्य संबंधित कर्मचार्‍यांना ताकीद देण्यात आली आहे. गुरुवारी (7 फेब्रुवारी) सर्व नाक्यांवरील पर्यवेक्षकांना बोलवून समज देण्यात येणार आहे. या कर्मचार्‍यांनी कर्तव्यात कसूर केल्यास त्यांना निलंबित करण्यात येईल. मी स्वत: नाक्यांवर जाऊन अचानक पाहणी करणार आहे. वेळप्रसंगी ठेकेदारावर कारवाई करण्यासही मागे-पुढे पाहणार नाही, असे महापौरांनी सांगितले.

उपमहापौरांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

गेल्या वर्षी पारगमन वसुलीचा ठेका विपुल ऑक्ट्रॉय एजन्सीकडे होता. या संस्थेनेही ट्रकचालकांची मोठय़ा प्रमाणात लूट केली. नाक्यांवरील गैरप्रकार थांबवण्यासाठी मॅक्स लिंकशी करारनामा करताना सीसीटीव्ही बसवण्याची अट घालावी, छायाचित्रण आयुक्त, महापौर व उपमहापौरांच्या दालनात दिसेल, अशी व्यवस्था करण्यात यावी, तसेच नाक्यांवर संगणकीय नोंद घेऊन वसुली शुल्काची पावती देण्यात यावी, नाक्यावरील सर्व कर्मचार्‍यांना ओळखपत्र व ड्रेसकोड द्यावा, सर्व कर्मचार्‍यांची यादी मनपाकडे द्यावी, नाक्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम जकात अधीक्षक अधिकार्‍याची नेमणूक करावी, नियमापेक्षा जास्त वसुली झाल्यास जकात अधीक्षकास जबाबदार धरावे अशा अटी-शर्तींचा समावेश करावा, अशी मागणी उपमहापौर गीतांजली काळे यांनी प्रशासनाकडे केली होती. मात्र, प्रशासनाने यापैकी एकाही अटी-शर्तीचा करारनाम्यात समावेश केलेला नाही.

पिळवणुकीस प्रशासनच जबाबदार

नाक्यांवरील पिळवणुकीबाबत प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या. एक-दोनदा पुरावेही दिले. परंतु प्रशासनाने कारवाई, तर सोडाच, तक्रारीची साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे ठेकेदाराला पाठबळ मिळत आहे. वेळीच कारवाई केली असती, तसेच काही अटी-शर्तींचा करारनाम्यात समावेश केला असता, तर ट्रकचालकांची लूट नक्कीच थांबली असती. सध्या सुरू असलेल्या गैरप्रकारांना प्रशासनाचा ढिसाळ कारभारच जबाबदार आहे.’’ गीतांजली काळे, उपमहापौर.

‘दिव्य मराठी’ला धन्यवाद

पारगमन नाक्यांवरील वास्तव परखडपणे मांडल्याबद्दल नगरकरांनी ‘दिव्य मराठी’ला मनापासून धन्यवाद दिले. अनेकांनी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात दूरध्वनी करून आपल्या प्रतिक्रिया कळवल्या. आमदार अनिल राठोड यांनी थेट आयुक्तांना जाब विचारून नाक्यांवरील गैरप्रकार तातडीने थांबवण्याच्या सूचना दिल्या. महापालिकेच्या काही कर्मचार्‍यांनीही ‘दिव्य मराठी’चे कौतुक केले.

कँटोन्मेंट नाक्यांवर लूट सुरूच

भिंगार छावणी मंडळाच्या प्रवेशकर वसुली नाक्यांवर ट्रकचालकांची लूट सुरूच आहे. पाच, दहा व पंधरा रुपये कर वसूल करण्याचा ठेका मिळालेल्या ओंकारा कन्स्ट्रक्शनचे कर्मचारी दहापट रक्कम वसूल करून ट्रकचालकांची लूट करत आहेत. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने सविस्तर वृत्त देऊनही भिंगार छावणी मंडळ ढिम्म आहे. बुधवारी दिवसभरात कोणतीही कारवाई किंवा पाहणीही छावणी मंडळ प्रशासनाने केली नाही.

विविध संघटना गप्प का?

पारगमन नाक्यांवरील गैरप्रकारांबाबत ठेकेदाराच्या विरोधात शहरातील अनेक संघटनांनी दंड थोपटले होते. काही संघटनांनी, तर आयुक्त व महापौरांना निवेदने दिली व पारगमन नाक्यावर आंदोलनेही केली. पण सुरुवातीला आक्रमक असलेल्या संघटनांचा उत्साह नंतर अचानक कसा काय मावळला, तसेच ट्रकचालकांविषयी त्यांना असलेला कळवळा आता कुठे गेला, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.