आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर: धार्मिक स्थळांवर कारवाईमुळे मनपा आवारात देवीचा तांदळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांवरील दुसऱ्या टप्प्यातील कारवाईला महापालिका प्रशासनाने गती दिली आहे. दरम्यान, अनधिकृत स्थळांचे सर्वेक्षणच चुकीचे असल्याचा मुद्दा शिवसेनेने लावून धरला आहे. मनपाने आतापर्यंत गुरुवारी रात्री आणखी पाच मंदिरे हटवली आहेत. त्यामुळे विविध पक्ष संघटनांनी महापालिकेत आंदोलन केले. महापालिकेच्या आवारातच देवीचा तांदळा मांडून आरतीही करण्यात आली. एकाचवेळी विविध पक्ष संघटनांनी मंदिरांसह शास्तीच्या मुद्द्यावर आंदोलन पुकारल्याने मनपाचे कार्यालय घोषणाबाजीने दणाणून गेले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाल्याने मनपा प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
 
रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या तसेच फुटपाथवरील १९६० नंतरच्या ६८ धार्मिक स्थळांवर महापालिका प्रशासनाने गुरुवारी पहाटे तीन वाजल्यापासून कारवाईला सुरुवात केली. त्यात कल्याण रस्त्यावरील दोन मंदिरांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर रात्री पुन्हा साडेअकराच्या सुमारास पुढील कारवाई सुरू करण्यात आली. साहाय्यक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त राजेंद्र चव्हाण, तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख सुरेश इथापे आदींसह नगररचना विभागाचे अभियंता कल्याण बल्लाळ, प्रभाग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांच्या पथकाने कल्याण रोडवरील अर्धवट पाडलेले बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर बालिकाश्रम रस्त्यावरील शितळादेवी मंदिर, ओबेरॉय हॉटेलशेजारील हनुमान मंदिर, हुंडेकरी शोरुमसमोरील लक्ष्मीआई मंदिर, भिस्तबाग चौकातील म्हसोबा मंदिर प्रोफेसर कॉलनीतील शिवमंदिर अशा पाच मंदिरांवर कारवाई करण्यात आली. यावेळी दंगल नियंत्रण पथकासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे कारवाई शांततेत पार पडली.
 
शिवसेनेने आयुक्तांसमवेत चर्चा करून फेरसर्वेक्षण तसेच मूर्तीच्या फेरसर्वेक्षणाचीही मागणी केली. महापालिकेमार्फत शहरातील १९६० नंतरची मंदिरे पाडण्याची कार्यवाही सुरू आहे. पण कार्यालयाने घोषित केलेल्या यादीत केवळ हिंदुंचीच मंदिरे आहेत. मनपाने केलेले सर्वेक्षण चुकीचे आहे. ही मंदिरे १९६० पूर्वीची आहेत किंवा नाही, हे तपासण्यासाठी मूर्तीचा फॉरेन्सिक अहवाल तयार करावा त्यानंतर मंदिराचा कालावधी ठरवावा. आैरंगाबाद रस्त्यावरील लक्ष्मीमाता मंदिर हे फार पूर्वीचे असून त्याचे जुने पुरावे उपलब्ध नाहीत. या मंदिराचाही अहवाल तयार करूनच कारवाई करावी, अशी मागणीही युवासेनेने केली आहे. यावेळी नगरसेवक योगीराज गाडे, विक्रम राठोड आदी उपस्थित होते. मनपा कार्यालयाच्या आवारात आंदोलकांनी देवीचा तांदळा मांडून आरती केली. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यानंतर हा तांदळाही काढण्यात आला.
 
हे तर बेजबाबदारपणाचे कृत्य
कोणत्याहीस्थळाचे निरीक्षण किंवा सर्वेक्षण करता महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी जाहीर केली, हे बेजबाबदारपणाचे कृत्य आहे. यास जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी इंद्रायणी प्रतिष्ठानचे डॉ. योगेश चिपाडे यांनी केली अाहे.
 
विहिंप,बजरंग दलाचा ठिय्या
मनपाने मंदिरांवर कारवाई सुरुवात केल्याने विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दलाने महापालिकेत ठिय्या आंदोलन केले. या व्यतिरिक्त अन्य संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
 
आज मुख्यमंत्री शहरात
शनिवारी(४ नोव्हेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार अाहेत. त्यामुळे शुक्रवारी रात्री बंदोबस्त उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. बंदोबस्त उपलब्ध झाला, तरच शुक्रवारी रात्री पुन्हा अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
 
मनपाला आले पोलिस ठाण्याचे स्वरूप
महापालिकेत एकाचवेळी विविध पक्ष संघटनांचे आंदोलन सुरू झाल्याने परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तीन पिंजरा गाड्यांसह बंदुकधारी पोलिसांचा ताफा तैनात होता. त्यामुळे मनपा कार्यालयाला पोलिस ठाण्याचे स्वरूप आले होते.
बातम्या आणखी आहेत...