आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या वाऱ्या करूनही मिळेना 107 कोटींच्या कामांना मुहूर्त, राज्य समितीच्या मंजुरीची प्रतीक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - केंद्र सरकारच्या अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामांसाठी तब्बल वर्षभरानंतर १०७ कोटींची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. परंतु सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या अंतर्गत कलहामुळे वादात सापडलेल्या या निविदेला राज्य सरकार अंतिम मंजुरी देण्यास तयार नाही. सत्ताधारी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईच्या वाऱ्या करत निविदेला अंतिम मंजुरी देण्याची वारंवार विनवणी केली, परंतु सरकारने निविदेला अद्याप मंजुरी दिल्याने अमृतची ची कामे खोळंबली आहेत. 
 
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग (एमजीपी), महापालिका प्रशासन राज्य सरकारचा संबंधित विभागाने वारंवार कागदी घोडे नाचवल्याने अमृत योजनेच्या कामांना अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. महापालिकेच्या स्थायी समितीने अतिरिक्त खर्चासह मंजूर केलेली १०७ कोटी रुपयांची निविदा एमजीपीने राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या मंजुरीसाठी पाठवली. परंतु या निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेत उपमहापौर तथा खासदार दिलीप गांधी यांचे समर्थक श्रीपाद छिंदम यांनी नगरविकास विभागाकडे तक्रारअर्ज दिला. त्यामुळे या निविदेच्या अंतिम मंजुरीत अडचणी निर्माण झाल्या आहेत. 
 
केंद्र सरकारने ऑक्टोबर २०१५ मध्ये नगर शहराचा अमृत योजनेत समावेश केला. त्यानंतर योजनेंतर्गत जुलै २०१६ मध्ये पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली. पहिल्या टप्प्यातील या कामांसाठी सुरूवातीला ७२ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यानंतर डीआय पाइप वापरण्यास मंजुरी देत प्रकल्पासाठी ९४ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला गेला. परंतु या कामाची निविदा प्रक्रिया गेल्या वर्षभरापासून रखडली होती. स्थायी समितीच्या सभेत काही दिवसांपूर्वी ही निविदा मंजूर करण्यात आली. मात्र, निविदा प्रक्रिया चुकीच्या पध्दतीने राबवण्यात आली असून त्यामुळे महापालिकेवर सात कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार असल्याची तक्रार उपमहापौर छिंदम यांनी नगरविकास विभागाकडे केली. त्यामुळे निविदेची अंतिम मंजुरी लांबणीवर पडली आहे. सत्ताधारी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वारंवार विनवण्या करूनही राज्य सरकार या निविदेला मंजुरी देण्यास तयार नाही. त्यामुळे अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यातील १०७ कोटींच्या कामाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 
बातम्या आणखी आहेत...