आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूकीच्या तोंडावर राजकारण तापले; मोर्चे- आंदोलनांचा भडिमार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - निवडणूक जवळ आल्याने महापालिकेतील राजकारण चांगलेच तापले आहे. शासनाकडून मूलभूत सुविधांसाठी मिळालेला 20 कोटींचा निधी, तसेच रखडलेल्या विकासकामांचे भांडवल करत सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी (10 जून) होणार्‍या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा होणार आहे.

मनपाची निवडणूक सहा महिन्यांवर येऊन ठेपली असून सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उरलेल्या तीन-चार महिन्यात रखडलेली कामे मार्गी लागावी, यासाठी सत्ताधारी व विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. नगरोत्थान योजनेंतर्गत शहरात बालिकार्शमसह 39 रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे, परंतु त्यापैकी मोजक्याच रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांना आयते भांडवल मिळाले आहे. कोठी ते यश पॅलेस रस्त्याचे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी माजी महापौर संग्राम जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी साखळी उपोषण केले, तर पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने नगरसेवक संजय गाडे यांनी मनपा कार्यालयात आंदोलन केले. याशिवाय काही हौशी कार्यकर्तेही मोर्चे-आंदोलने करून प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मागील पंधरा दिवसांपासून महापालिका कार्यालय विविध आंदोलनांनी दणाणून गेले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन प्रभाग रचना करण्याचे काम सध्या सुरू आहे. यंदा प्रभागनिहाय निवडणूक होणार असल्याने नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. प्रभाग रचना जाहीर होताच विविध पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागणार आहेत. विद्यमान नगरसेवकांना मात्र सध्या तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. चालू वर्षीच्या मंजूर अंदाजपत्रकातील तरतुदींची अंमलबजावणी उशिरा झाल्याने वॉर्डांमधील अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळे अनेक नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अंदाजपत्रकातील 100 टक्के वॉर्ड विकासनिधी व पदाधिकार्‍यांच्या 75 टक्के विकासनिधी खर्चास आयुक्त विजय कुलकर्णी यांनी मान्यता दिली, परंतु शासनाकडून मूलभूत सोयी-सुविधांसाठी मिळालेल्या 20 कोटी रुपये निधीच्या मुद्दय़ावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या निधीतून कोणती कामे करायची, यावरून वाद सुरू झाल्याने प्रशासनाने मोठी कामे करण्याचा निर्णय घेतला. त्यात काही नगरसेवकांनी संशय व्यक्त केल्याने दुखावलेले शहर अभियंता कुलकर्णी तडकाफडकी रजेवर निघून गेले. मुळात 20 कोटींच्या कामाचा प्रस्ताव शासनाचे नियम डावलून तयार करण्यात आला, असा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे सोमवारी होणार्‍या सभेत या विषयावर वादळी चर्चा होणार आहे.

रखडलेली विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सत्ताधार्‍यांनी कंबर कसली आहे. आचरसंहिता लागण्यापूर्वी घरकुल योजना, बालिकार्शम रस्ता, केडगाव पाणी योजना यासारखी विकासकामे मार्गी लावण्यासाठी सत्ताधारी प्रयत्न करत आहेत. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांसह नागरिकांच्या मोर्चे-आंदोलनांमुळे सत्ताधार्‍यांसमोर काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

शहर अभियंत्यांची मनधरणी
महापौर शीला शिंदे, नगरसेवक संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी शहर अभियंता कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार लवकरच कामावर रुजू होईल, असे आश्वासन कुलकर्णी यांनी दिले असल्याची माहिती महापौरांनी दिली. शहर विकासाला चालना देण्यासाठी मनपाला कुलकर्णी यांच्यासारखा कार्यक्षम व कर्तबगार अभियंता मिळाला असल्याचेही महापौरांनी सांगितले.

प्रभाग रचनेकडे नगरसेवकांचे लक्ष
नवीन प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू झाल्याने विद्यमान नगरसेवक चांगलेच धास्तावले आहेत. मनपाच्या आतापर्यंत दोन सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या, पहिल्या निवडणुकीत तीन सदस्यीय, तर दुसर्‍या निवडणुकीत एक सदस्यीय पद्धत होती. येणारी निवडणूक मात्र द्विसदस्यीय पद्धतीने होणार आहे. नवीन प्रभाग रचनेनुसार कोणता भाग जुन्या प्रभागात राहील व कोणता नव्याने जोडला जाईल, याची शहानिशा करण्यासाठी काही नगरसेवक प्रभागरचनेच्या प्रक्रियेकडे लक्ष ठेवून आहेत.