आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयडीसीच्या जलवाहिनीला दीड महिन्यापासून गळती, लाखो लिटर पाण्याची नासाडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - सुपा एमआयडीसी, छावणी परिषद व काही ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणार्‍या नागापूर एमआयडीसीच्या जलवाहिनीला शिंगवे नाईक गावाजवळ मागील दीड महिन्यापासून मोठी गळती लागल्याने रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. विशेष म्हणजे स्थानिक शेतकर्‍यांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकारी या गळतीकडे दुर्लक्ष करत आहेत. ऐन दुष्काळात वाया जाणारे हे पाणी पाहून रस्त्यावरून जाणारे प्रवासीही हळहळ व्यक्त करत आहेत.

मुळानगर येथून नगर शहर व नागापूर एमआयडीसीला दोन स्वतंत्र जलवाहिन्यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येतो. नागापूर एमआयडीसीच्या जलवाहिनीवरून सुपा एमआयडीसी, छावणी परिषद व काही ग्रामपंचायतींना पाणी पुरवले जाते. ही जलवाहिनी जमिनीच्या वर असून तिला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. नगर-मनमाड रस्त्यावरील शिंगवे नाईक गावाजवळ अशीच मोठी गळती मागील दीड महिन्यापासून सुरू आहे. नऊशे एम. एम. बटरफ्लाय व्हॉल्व लिकेज झाल्याने या ठिकाणी रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. वाया जाणार्‍या पाण्याचा फवारा सुमारे 10 ते 15 फूट उंच उडत असतो. त्यामुळे शेजारी असलेल्या पोपट बोरुडे या शेतकर्‍याच्या कुक्कुटपालन व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. बोरुडे यांच्यासह काही स्थानिक शेतकर्‍यांनी एमआयडीसीच्या अधिकार्‍यांकडे जाऊन पाणी गळती थांबवण्याची मागणी केली. परंतु अधिकार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष करून ही गळती रोखण्यासाठी आतापर्यंत कोणतीही कार्यवाही केली नाही. अखेर बोरूडे यांना त्यांच्या कुक्कुटपालन व्यवसायाचे स्थलांतर करावे लागले.

एमआयडीसीची ही जलवाहिनी सुमारे 35 वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे गळतीची दुरूस्ती करताना एमआयडीसीच्या अधिकार्‍यांच्या अक्षरश: नाकीनऊ येतात. मागील दीड वर्षात या जलवाहिनीवर 200 ठिकाणी दुरूस्ती करण्यात आली आहे. केवळ एका ठिकाणी पंम्पिंग स्टेशन असल्याने जलवाहिनीवर मोठय़ा प्रमाणात दाब येतो. त्यामुळे गळतीचे प्रमाण जास्त आहे. जलवाहिनी बदलण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असला, तरी तो अजून मंजूर झालेला नाही. त्यामुळे वारंवार होणारी गळती सुरूच राहण्याची शक्यता आहे.

या जलवाहिनीतून छावणी परिषदेसाठी रोज 18 एमएलटी पाणी देण्यात येते. एमआयडीसी व छावणी परिषदेत तसा करारनामा झालेला आहे. पहिला 25 वर्षांचा करारनामा सहा वर्षांपूर्वी संपल्याने पुन्हा 25 वर्षांचा करारनामा करण्यात आला आहे. जलवाहिनी नागापूर एमआयडीसीच्या ताब्यात असली, तरी सर्वांत जास्त पाणी छावणी परिषदेला द्यावे लागते.