आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये महावितरण कार्यालयात राष्ट्रवादीचे आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गणेशोत्सवात भारनियमन करु नये, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. भारनियमन रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठवण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. गणेशोत्सवात भारनियमन झाले, तर महावितरणला टाळे ठोकण्याचा इशारा शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप व शहर कार्यकारिणी कार्याध्यक्ष अविनाश घुले यांनी दिला.

दुपारी बाराच्या सुमारास राष्ट्रवादीचे सुमारे दोनशे कार्यकर्ते महावितरण कार्यालयासमोर जमले. गेल्या महिन्यापासून शहरात फीडरनिहाय भारनियमन सुरु झाले आहे. या भारनियमनाच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. नंतर जगताप व घुले यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी अधीक्षक अभियंता प्रभाकर हजारे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरु केले. हजारे तेथे उपस्थित नसल्यामुळे पुन्हा घोषणाबाजी सुरु झाली. त्यामुळे शहर अभियंता धनंजय भांबरे कार्यकर्त्यांना सामोरे आले.

घुले म्हणाले, गणेशोत्सवात शहरातील भारनियमन पूर्णपणे बंद करावे. या काळात घरोघरी, तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये धार्मिक कार्यक्रम, पूजापाठ, सांस्कृतिक कार्यक्रम व देखावे सादर केले जातात. देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते. त्यामुळे या कालावधीत भारनियमन पूर्णपणे बंद करावे.

त्यावर भांबरे म्हणाले, शहरातील भारनियमन वीज गळती व वीजबील वसुली यावर अवलंबून आहे. ज्या भागात भारनियमन आहे, त्या भागातील गळती कमी करण्यासाठी व वसुली वाढवण्यासाठी विशेष मोहिम राबवली जात आहे. गणेशोत्सवात भारनियमन रद्द करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसा आदेश येताच भारनियमन रद्द केले जाईल. एमआयडीसी उपकेंद्रातील नादुरुस्त रोहित्र आठ दिवसांत दुरुस्त केले जाईल, जेणेकरुन मुळा धरण, जलशुद्धीकरण केंद्र व नागापूर येथील वीजपुरवठा योग्य दाबाने होईल, असे त्यांनी सांगितले.

भांबरे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तथापि, गणेशोत्सव सुरु होईपर्यंत भारनियमन बंद झाले नाही, तर महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले जाईल, असा इशारा राष्ट्रवादीतर्फे देण्यात आला. या आंदोलनात नगरसेवक पोपट बारस्कर, दत्ता सप्रे, विजय गव्हाळे, समद खान, आरिफ शेख, अरविंद शिंदे, अभिषेक कळमकर, जितू गंभीर, अजय चितळे, समीर खान, रमेश जोशी यांच्यासह सुमारे दोनशे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

चौदा फीडरवर भारनियमन
वसंतटेकडी, फकीरवाडा, लालटाकी, गणेश, दिल्लीगेट, बालिकार्शम, बोल्हेगाव, सिव्हील, नवनागापूर, अशोका, गंजबाजार, भिंगार, माळीवाडा, बुर्‍हाणनगर या चौदा फीडरवर सध्या भारनियमन सुरु आहे. या फीडरअंतर्गत गळतीचे प्रमाण 42 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. वसुलीही कमी झाली आहे. उर्वरित आठ फीडर सध्या भारनियमनातून मुक्त आहेत.

प्रामाणिक ग्राहकांवर अन्याय
वसुली व गळतीचे प्रमाण वाढल्यामुळे फीडरनिहाय भारनियमन सुरु केले असल्याचे महावितरणच्या अधिकार्‍यांनी सांगितले. ते ऐकताच कार्यकर्ते चांगलेच संतापले. ज्यांची वीजबिले थकली आहेत, त्यांची वीज तोडा. पण, जे ग्राहक प्रामाणिकपणे वीजबील भरतात, त्यांच्यावर भारनियमनाचा अन्याय कशासाठी? असा सवाल त्यांनी केला. त्यावर मात्र अधिकारी निरुत्तर झाले.

..तर महावितरण कार्यालयाला टाळे ठोकू
सततच्या भारनियमनामुळे गणेशोत्सवात मंगळसूत्र चोरी व पाकिटमारीच्या घटना वाढण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठय़ावरही याचा परिणाम झाला आहे. उपनगरांतील पाण्याच्या टाक्या भरण्यात अडचण येत आहे. त्यामुळे पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक कोलमडले आहे. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी भारनियमन बंद करावे; अन्यथा महावितरणला टाळे ठोकू.’’ संग्राम जगताप, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी.