आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेहरू मार्केटचा प्रस्ताव महासभेला सादर करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नेहरू मार्केटप्रश्नी 20 फेब्रुवारीपर्यंत महासभेला प्रस्ताव सादर करण्याचे लेखी आश्वासन महापालिका प्रशासनाने दिल्यानंतर कृती समिती व भाजीविक्रेते संघटनेने शनिवारी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले.

नेहरू मार्केटची वास्तू पाडून तीन वर्षे उलटली, परंतु प्रशासनाने भाजीमंडई व व्यापारी संकुल उभारण्यासाठी निविदा प्रसिध्द करण्यापलिकडे काहीच कार्यवाही केली नाही. त्याच्या निषेधार्थ कृती समितीचे अध्यक्ष वसंत लोढा व भाजीविक्रेते संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे यांच्या नेतृत्त्वाखाली चितळे रस्त्यावरील नेहरू मार्केटच्या मोकळ्या जागेत शुक्रवारपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. माजी महापौर संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, उपमहापौर गीतांजली काळे, नगरसेवक किशोर डागवाले, शिवाजी लोंढे, ब्रिजलाल सारडा, शंकरराव घुले, सतीश मैड, अशोक बाबर, मधूसुदन मुळे, दीपक सूळ, उबेद शेख यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपोषणाला पाठिंबा दिला होता. चितळे रस्त्यावरील भाजीविक्रेते व व्यापार्‍यांनी कडकडीत बंद पाळून सहभाग नोंदवल्याने उपोषणाची तीव्रता वाढली होती.

नगर रचनाकार विश्वनाथ दिघे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी करून नेहरू मार्केटप्रश्नी लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याची भूमिका कृती समितीने घेतली होती. प्रशासनाकडून उपोषणाची दखल घेतली जात नसल्याने उबेद शेख यांनी शनिवारी दुपारी थेट उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे यांच्या दालनात लोटांगण आंदोलन केले. त्यानंतर डोईफोडे यांनी तातडीने उपोषणस्थळी जाऊन 20 फेब्रुवारीपर्यंत महासभेला प्रस्ताव सादर करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेलार यांनी उपोषणस्थळी केलेल्या भाषणात शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांच्यावर जोरदार टीका केली. आंदोलकांनीच भाजीमंडई व व्यापारी संकुल उभारण्याचा ठेका घ्यावा, असे वक्तव्य राठोड यांनी केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना शेलार म्हणाले, गेल्या 25 वर्षांत शहराची वाट लावणार्‍या लोकप्रतिनिधींनी आंदोलकांची अवहेलना केली आहे. जिल्हाधिकारी, तसेच नगरविकास राज्यमंत्र्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून नेहरू मार्केटप्रश्नी तोडगा काढण्याची विनंती शेलार यांनी यावेळी केली. दरम्यान, पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनीही उपोषणाची दखल घेतली. नेहरू मार्केटप्रश्नी त्यांनी 18 ला जिल्हाधिकार्‍यांसह संयुक्त बैठक बोलावली आहे.

निविदांना प्रतिसाद नाही
नेहरू मार्केटच्या जागेवर भाजीमंडई व व्यापारी संकुल उभारण्यासाठी पूर्वीच्या सत्ताधार्‍यांनी 5 कोटींचा प्रीमियम निश्चित केला होता. परंतु निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने आम्ही ही रक्कम अडीच कोटी केली. तरीही निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. आता प्रशासनाकडून प्रस्ताव आल्यानंतर नेहरू मार्केटप्रश्नी महासभेत तातडीने योग्य निर्णय घेऊ.’’ शीला शिंदे, महापौर

श्रेय तुम्हाला..
महापौर शीला शिंदे योग्य निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे. आम्ही उपोषण केले, तरी नेहरू मार्केटचा प्रश्न सुटल्यास त्याचे श्रेय महापौरांनाच मिळेल. त्यांनी राजकारण बाजूला ठेवून तातडीने योग्य निर्णय घ्यावा. भाजीविक्रेत्यांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न महापौर नक्की सोडवतील, अशी अपेक्षा आहे. तसे न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.’’ संजय झिंजे, अध्यक्ष, हातगाडी व भाजीविक्रेता संघटना.