आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका - नव्या मुख्यालयाच्या बांधकामाबाबत अनेक तक्रारी ; चौकशीत दिरंगाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिकेच्या नवीन मुख्यालयाच्या बांधकामाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी सात महिन्यांपूर्वी प्रशासनाला दिले होते. परंतु प्रशासनाने टोलवाटोलवी करून या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
नगर-औरंगाबाद महामार्गावर सन 2008 मध्ये उभारण्यात आलेल्या महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून संबंधित अधिकारी व ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. विभागीय आयुक्तांनी 19 डिसेंबर 2011 रोजी मनपा प्रशासनाला पत्र पाठवून बांधकामाची चौकशी करून अहवाल जिल्हाधिकार्‍यांमार्फत सादर करण्याचे आदेश दिले होते. तत्कालीन आयुक्त संजय काकडे यांनी 23 जानेवारीला उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे, स्मिता झगडे व मुख्य लेखाधिकारी प्रदीप शेलार यांची समिती स्थापन करून पंधरा दिवसांत चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या अधिकार्‍यांनी टाळाटाळ करून बांधकामाची चौकशी तांत्रिक अधिकार्‍यांमार्फत करावी, असा प्रस्ताव पंधरा दिवसांपूर्वी दिला. या वेळकाढूपणामुळे चौकशी रखडली आहे. याबाबत शेख यांनी वारंवार पाठपुरावा करूनही उपयोग झाला नाही.

तत्कालीन आयुक्त काकडे यांची बदली झाल्याने चौकशीबाबत पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे. शेख यांनी नवे आयुक्त विजय कुलकर्णी यांच्याकडेही पाठपुरावा सुरू ठेवला आहे. बांधकामाचा कार्यारंभ आदेश निविदा दरापेक्षा 15.51 टक्के वाढीव दराने देण्यात आला. अंदाजपत्रक तयार करताना सार्वजनिक बांधकामच्या प्रमाणित दरांप्रमाणे सिमेंट व लोखंडाचे दर निश्चित केले. प्रत्यक्षात मात्र ठेकेदाराला बाजारभावाप्रमाणे दर देण्यात आले. फर्निचरच्या कामाचे दर बाजारभावापेक्षा अवाजवी ठेवण्यात आले. इलेक्ट्रीक कामे करताना तांत्रिक मान्यता, कार्यारंभ आदेश, बिल रेकॉर्ड, प्रशासकीय मान्यता यांच्या तारखांमध्ये मोठय़ा प्रमाणात तफावत आहे. अंदाजपत्रकाव्यतिरिक्त कोटेशन पध्दतीने करण्यात येणार्‍या कामांची निविदा न काढता ते मजूर संस्थेमार्फत तुकडे पाडून करण्यात आले. ठेकेदाराने ज्या दिवशी बिले सादर केली, त्याच दिवशी कामाची रक्कम देण्यात आली. इमारत परिसरातील खडीकरणाच्या कामाची नोंदवही तयार करण्यात आली नाही. इलेक्ट्रीक कामासाठी हलक्या दर्जाचे साहित्य वापरले, यासारख्या तक्रारी शेख यांनी केल्या आहेत. महापालिकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
यांच्या विरोधात आहे तक्रार

तत्कालीन शहर अभियंता विष्णू पालवे, प्रभारी शहर अभियंता एन. बी. मगर, उपशहर अभियंता आर. जी. सातपुते, इलेक्ट्रीक सुपरवायझर बाळासाहेब सावळे, तत्कालीन मुख्य लेखाधिकारी पी. बी. कर्डिले, आर्किटेक्ट किरण कांकरिया, ठेकेदार अभय मुथ्था, बेस्ट कन्स्ट्रक्शन व आर. आर. कपूर.
पाठपुरावा सुरूच ठेवणार - मनपा प्रशासनान विभागीय आयुक्तांच्या आदेशालाही जुमानत नाही. जोपर्यंत चौकशी होत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. ’’ शाकीर शेख, सामाजिक कार्यकर्ता.
लवकरच बैठक - अगोदरच्या आयुक्तांनी दिलेल्या सूचना, तसेच शेख यांनी केलेल्या तक्रारीबाबत माहिती घेण्यासाठी लवकरच बैठक घेणार आहे. त्यानंतरच चौकशीबाबत निर्णय घेण्यात येईल.’’ विजय कुलकर्णी, आयुक्त.