आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरच्या बनावट दारूचे राज्यस्तरावर रॅकेट उघड, धुळ्यातील आरोपीला नगरचे पोलिस लवकरच घेणार ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पांगरमल येथे बनावट दारूचे सेवन केल्यामुळे सात जणांचे बळी गेले. या दारूकांडानंतर नगर जिल्ह्यातील बनावट दारूनिर्मितीचे रॅकेट उजेडात आले. या रॅकेटची व्याप्ती राज्यभर पसरली असल्याची माहिती अाता पोलिस तपासात समोर आली. पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे यांनी ही बाब बुधवारी न्यायालयात सांगितली. या रॅकेटमध्ये धुळ्यातील एका कुख्यात मद्यतस्कराचा समावेश असून त्यालाही पोलिस ताब्यात घेणार आहेत. दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपींची संख्या अाता १५ वर गेली आहे.  
 
शिवसेना उमेदवारातर्फे देण्यात अालेल्या पार्टीत बनावट दारूचे सेवन केल्यामुळे सात जणांचा मृत्यू झाला हाेता. याप्रकरणी बबन आव्हाड (पांगरमल) यांच्या  फिर्यादीवरून पोलिसांनी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे, भाग्यश्री मोकाटे, मंगल महादेव आव्हाड, महादेव आव्हाड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भीमराज आव्हाड व रावसाहेब आव्हाड यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवध व इतर कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला. 
 
याप्रकरणी सुरुवातीला भीमराज आव्हाडला अटक झाली. त्याच्याकडील चाैकशीनंतर पोलिसांनी जिल्हा रुग्णालयातील कॅँटीनमध्ये सुरू असलेल्या बनावट दारूनिर्मितीच्या रॅकेटचाही पर्दाफाश केला. दरम्यान, जितू ऊर्फ जगजितसिंग गंभीर, जाकीर शेख व हमीद शेख यांना अटक करण्यात आली. 
ही कँटीन मोहन दुगलच्या नावे असल्याचे समजल्यामुळे पोलिसांनी त्याच्यासह आणखी काही जणांना अटक केली. त्यात मोहन दुगल (६०), संदीप मोहन दुगल (२८) आणि वैभव जयसिंग जाधव (३०), भरत रमेश जोशी, रावसाहेब आव्हाडचा समावेश अाहे. अाराेपींपैकी भीमराज आव्हाड, रावसाहेब आव्हाड, जितू गंभीर, जाकीर शेख, हमीद शेख यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. तर मोहन दुगल, संदीप दुगल, वैभव जाधव, भरत जोशी यांच्या पोलिस कोठडीत मात्र २५ फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात अाली. 
   
दरम्यान, आरोपींच्या वकिलांनी न्यायालयास सांगितले की, मृत्यूचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. तरीही जिल्ह्यातील मंत्री आरोपींवर खुनाचे गुन्हे नोंदवण्याचे आदेश देत आहेत.  त्यावर ‘बाहेर कोण काय वक्तव्य करते, त्याच्याशी घेणे-देणे नाही. तुम्ही तपासातील मुद्द्यांवर युक्तिवाद करा,’ अशी सूचना न्यायालयाने वकिलांना केली.
 
रॅकेटचे धुळे कनेक्शन  
या रॅकेटमध्ये धुळ्यातील शिरपूरचा कुख्यात गुन्हेगार दादा वाणी याचे नाव समोर आले. नगरमधील अाराेपी अल्कोहोल घेत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. वाणी सध्या धुळे पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. आता त्याला नगर पाेलिसांच्या ताब्यात दिले जाणार अाहे. याशिवाय याकूब शेख (नालेगाव), नन्हे शेवानी यांची नावेही समोर आली आहेत. तेही नगरमधील आरोपींना मुद्देमाल पुरवत होते.  
बातम्या आणखी आहेत...