आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marath, World Womens Day, School Girl, Divya Marathi

जागतिक महिलादिनीच शाळकरी मुलींची छेड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जागतिक महिला दिन साजरा होत असतानाच शनिवारी (8 मार्च) शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिंनीची छेड काढण्याचा संतापजनक प्रकार घडला. एमआयडीसी पोलिसांनी मात्र हे प्रकरण गांभीर्याने घेतलेले नाही. यासंदर्भात रविवारी रात्री उशिरापर्यंत केवळ गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत होते.


एमआयडीसी परिसरातील माध्यमिक विद्यालयात शिकणार्‍या पाच विद्यार्थिनी शाळेच्या बाहेर बसची वाट पाहत थांबल्या होत्या. दुपारी साडेतीनच्या सुमारास काळ्या रंगाच्या मोटारसायकलीवरून आलेल्या तिघांनी अश्लील भाषेत शेरे मारत त्यांची छेड काढली. मोटारसायकली विद्यार्थिनींच्या भोवती फिरवत त्यांनी अश्लाघ्य शिवीगाळही केली. याचा जाब विचारणार्‍या विद्यार्थिनीशी लगट करण्याचा प्रयत्न या टारगटांनी केला. त्यांना समजावण्याचा प्रयत्न करणार्‍यांना त्यांनी मारहाण केली. विरोध करणार्‍यांची संख्या वाढल्यानंतर आरोपींनी फोन करून त्यांच्या साथीदारांना बोलावून घेतले. आरोपी व त्यांच्या साथीदारांनी विद्यार्थिनींसह समजावणार्‍यानाही चोप दिला.


एमआयडीसी पोलिसांना ही माहिती देण्यात आली. मात्र, पोलिस नेहमीप्रमाणे वेळेवर पोहोचले नाहीत. दरम्यान, स्नेहालय व चाइल्डलाइनचे कार्यकर्ते घटनास्थळी आले. विद्यार्थिनींना बरोबर घेऊन त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले. मात्र, पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल न करताच त्यांची बोळवण केली. रविवारी सकाळी विद्यार्थिनी पुन्हा पोलिस ठाण्यात आल्या. दुपारी त्यांची लेखी फिर्याद घेण्यात आली. मात्र, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. पोलिसांच्या भूमिकेचा कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला.


स्वयंसेवी संस्थांकडून निषेध
महिलादिनी दिवसाढवळ्या विद्यार्थिनींची छेड काढून मारहाण करण्याची घटना झाल्यानंतरही पोलिसांनी गांभीर्य दाखवले नाही. तातडीने गुन्हा दाखल करून आरोपींना अटक होण्याची आवश्यकता होती. छेड काढणारे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून झालेली दिरंगाई अक्षम्य आहे. पोलिसांच्या निष्काळजीपणाचा स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाकडून निषेध करण्यात आला असून तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे.