नगर - नगर शहर व जिल्ह्यातील रिक्षांचे नवे दर निश्चित करण्यात आले आहेत. पहिल्या 1.6 किलोमीटरसाठी 15 रुपये भाडे असेल. पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 9 रुपये दराने भाडेवाढ मंजूर करण्यात आली आहे. हकीम समितीने सादर केलेल्या प्रस्तावानुसार ही भाडेवाढ करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सर्व इलेक्ट्रॉनिक्स मीटरचे कॅलिब्रेशन 45 दिवसांच्या आत करुन घेण्याची सूचना बैठकीत देण्यात आली. या मुदतीत कॅलिब्रेशन न केल्यास विलंबाच्या प्रत्येक दिवसाकरिता परवाना निलंबित करण्यात येईल. अवैध गौण खनिजाची वाहतूक करणा-या वाहनांवरही कारवाई करण्यात येण्यात येईल, असे सांगण्यात आले. नगर शहरातील बहुसंख्य रिक्षा मीटरप्रमाणे भाडे आकारत नाहीत. त्याबाबत काहीच निर्णय बैठकीत झाला नाही.