आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marathi, Deepali Sayyad,Rajiv Rajale, Dilip Gandhi, AAP

राजळे, गांधी व सय्यद यांच्यात होणार तिरंगी लढत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे. आम आदमी पक्षाच्या उमेदवार अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यामुळे निवडणुकीतील रंगत आणि ग्लॅमर वाढले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी आणि महायुतीच्या दिग्गज उमेदवारांसमोर राजकारणात नवख्या असलेल्या दीपाली सय्यद यांचे आव्हान असेल.


मागील निवडणुकीत नगर मतदारसंघात पंधरा उमेदवार रिंगणात होते. तथापि, भारतीय जनता पक्षाचे दिलीप गांधी, राष्ट्रवादीचे शिवाजी कर्डिले व काँग्रेसचे बंडखोर राजीव राजळे यांच्यात तिरंगी लढत झाली होती. तत्कालीन राष्ट्रवादीचे खासदार तुकाराम गडाखही रिंगणात होते. मात्र, त्यांना अनामत रक्कमही वाचवता आली नाही. आघाडीची मते कर्डिले, राजळे व गडाख यांच्यात विभागली गेली व भाजपचे गांधी विजयी झाले. आता या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. राष्ट्रवादीचे राजळे, भाजपचे गांधी असा आतापर्यंतचा दुरंगी सामना आता तिरंगी झाला आहे. आम आदमी पक्षाच्या उमेदवार म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री दीपाली सय्यद रिंगणात उतरल्या आहेत.


खरी लढत राजळे विरुद्ध गांधी अशीच होणार असली, तरी ‘आप’च्या नवख्या उमेदवार दीपाली सय्यद यांच्यामुळे दोन्ही उमेदवारांच्या मतांवर परिणाम होणार आहे. ग्रामीण व नगरसारख्या ठिकाणी राहणार्‍या शहरी मतदारांना चित्रपटांचे असणारे आकर्षण सय्यद यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते. युवा मतदारांना साद घालण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार असून या मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. गांधी व राजळे यांच्यासमोर सय्यद अगदीच नवख्या आहेत. मात्र, ‘आप’च्या उद्यास कारणीभूत ठरणार्‍या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याच जिल्ह्यात त्यांच्याकडून आव्हान निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चित्रपटसृष्टीतील नट, नट्या यांचा प्रचारापुरता वापर करण्याचा राजकीय पक्षांचा फंडा ‘आप’ने हेरला अन् अण्णांच्याच जिल्ह्यात सय्यद यांना उमेदवारी दिली. त्या मतदारांना कशी भुरळ घालतात, याकडे प्रबळ उमेदवारांबरोबरच नगरकरांचेही लक्ष लागले आहे.


राष्ट्रवादी व भाजपच्या उमेदवारांकडे प्रचाराची स्वतंत्र व प्रभावी यंत्रणा आहे. मतदारसंघात चांगला संपर्क आहे. सय्यद यांच्यासमोर ही यंत्रणा उभारण्याचे आव्हान असेल. युवा वर्गाकडून मिळणारा प्रतिसाद आणि चित्रपटांचे ग्लॅमर यामुळे निवडणुकीतील चुरस वाढणार आहे.


आव्हान म्हणूनच उमेदवारी स्वीकारली
मतदार आता जागरूक झाले आहेत. कुणाला मते द्यायची, कुणाला नाही, हे त्यांना चांगले कळते. कुणी काय काम केले हेही लोकांना माहिती आहे. कलाकार म्हणून जसे मी मनापासून काम करते, तसेच काम देशासाठी व नगरसाठी करेन. राजकारणात स्वच्छ चारित्र्याचे लोक आले पाहिजेत. त्यातून नक्कीच चांगले काम होईल. या मतदारसंघातील युवा मतदार निश्चितपणे माझ्या मागे उभे राहतील. महिन्याभरापूर्वी ‘आप’ उमेदवारीचा प्रस्ताव आला होता. राजकारणाच्या भीतीपोटी नकार देण्याचा निर्णय घेतला; पण विचाराअंती तीन दिवसांपूर्वी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. ही निवडणूक मी आव्हान म्हणूनच स्वीकारली आहे. चित्रपटसृष्टीतील मित्र व सहकारी माझ्या प्रचारासाठी निश्चितच येतील.’’


अंतर्गत बंडाळी अजूनही खदखदते आहे..
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील बंडखोरीचा फायदा घेत गांधी मागच्या वेळी संसदेत गेले. या वेळी फासे उलटे पडले. निवडणुकीच्या सुरुवातीला गांधी यांनाच मोठय़ा बंडाळीचा सामना करावा लागत आहे. त्यांची उमेदवारी जाहीर होताच नाराज झालेले जिल्हाध्यक्ष अँड. प्रताप ढाकणे यांनी पदाचा राजीनामा देऊन गांधी यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका घेतली. पक्षाचे नेते विनोद तावडे यांनी केलेली शिष्टाईही अयशस्वी ठरली. ढाकणे अजून आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. यापूर्वी उमेदवारीच्या शर्यतीत असलेले आमदार राम शिंदे, शिवाजी कर्डिले यांच्याकडून पुरेसे सहकार्य मिळण्याबाबत भाजप कार्यकर्ते साशंक आहेत. नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहारांचा मुद्दा पुढे करून आघाडीकडून आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्याचाही गांधी यांना सामना करावा लागणार आहे.


पाचपुते सर्मथकांची नाराजी
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजीव राजळे यांनाही आपल्या पक्षातील नाराजांचा सामना सध्या करावा लागतो आहे. नगरची जागा मिळालीच पाहिजे, असा आदेश पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या नगरमधील सर्व वरिष्ठ नेत्यांना दिला आहे. असे असले तरी राष्ट्रवादीतील रुसवे-फुगवे काढण्यासाठी राजळे सध्या पक्षातील नेत्यांबरोबर बैठका घेत आहेत. आमदार बबनराव पाचपुते यांनी वाळकी येथे झालेल्या सभेत राजळेंशी वाद नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, पोस्टरवर पाचपुते यांचा फोटो वगळल्याने त्यांचे सर्मथक राजळे यांच्यावर नाराज आहेत. सोशल मीडियातून हा वाद चव्हाट्यावर मांडला जात आहे. जिल्हा परिषदेच्या सत्तेतील दुरुस्तीचा विषय पुढे करून काँग्रेसमधील नाराजीला खतपाणी घातले जात आहे.


पक्ष उमेदवार मिळालेली मते
0भाजप दिलीप गांधी 3 लाख 12 हजार 47
0राष्ट्रवादी शिवाजी कर्डिले 2 लाख 65 हजार 316
0अपक्ष राजीव राजळे 1 लाख 52 हजार 795
0सीपीआय के. व्ही. शिरसाठ 11 हजार 853
0बसपा तुकाराम गडाख 11 हजार 508