शिर्डी - साकुरी शिवारात राष्ट्रीय महामार्गावरून गोमांस मालेगावकडे घेऊन जाणारा ट्रक रविवारी दुपारच्या सुमारास संतप्त जमावाने पेटवून दिला. आक्रमक जमावाने अग्निशमन दलाच्या गाड्यांवरही दगडफेक केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
शिर्डी-राहाता रस्त्यावरून रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ट्रक मालेगावच्या दिशेने जात होता. या ट्रकमधून मांसाची दुर्गंधी येत असल्याने काही लोकांनी या ट्रकचा पाठलाग केला आणि साकुरी शिवाराजवळ ट्रक अडवण्यात आला. गाडीचालक व क्लीनरला त्या लोकांनी विचारणा केली असता, त्यांचे बोलणे संशयास्पद असल्याचे लक्षात आल्याने जमावाने ट्रक तपासला. दरम्यान, ट्रकचालक व क्लीनरने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, संतप्त जमावाने गोमांस असलेला ट्रक पेटवून दिला. दरम्यान, अग्नशिमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, कुणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसलेल्या जमावाने अग्नशिमन दलाच्या गाड्यांच्याही काचा फोडल्या.
पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर अग्नशिमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, या महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर पोलिसांनी रस्त्याच्या एका बाजूने हळूहळू वाहतूक सुरू केली.