आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marathi, Divya Marathi, Shrirampur Municipal Council

श्रीरामपूर पालिकेत सत्ताधारी- विरोधकांत आरोप-प्रत्यारोपांचा गोंधळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - शहरातील जनतेला चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचा ठराव शनिवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. यावेळी सत्ताधारी व विरोधक नगरसेवकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्वसाधारण सभा पार पडली. नगराध्यक्ष राजश्री ससाणे अध्यक्षस्थानी होत्या. आठवड्यातील सातही दिवस चोवीस तास पाणीपुरवठ्याचा विषय सभेत मांडण्यात आला. विरोधी नगरसेविका मंजुश्री मुरकुटे यांनी 24 तास पाणी देण्यास किती वर्षे लागतील, असा उपरोधिक सवाल केला. त्यावर नगराध्यक्ष ससाणे यांनी चांगल्या कामाची दखल घ्या. इतर शहरांपेक्षा श्रीरामपूरचा पाणीपुरवठा खूप चांगला असल्याचे सांगितले.

मुख्याधिकारी संतोष खांडेकर म्हणाले, साठवण क्षमता, वितरण व्यवस्था, पाणी साठवणा-या टाक्या व पाणीपुरवठा करणा-या पाइपलाइन यांचे योग्य नियोजन करण्यात येणार आहे. सध्या 90 हजार लोकसंख्या असलेल्या शहराला पाणीपुरवठा होत आहे. आता 50 दिवसांची साठवण क्षमता व 10 टाक्या आहेत. 24 तासांचे नियोजन करताना 3 कोटी 20 लाख रुपये खर्च येणार असून त्यात अनेक पाइपलाइन नवीन करण्यात येतील. साधारण 5 ते 6 वर्षांत सर्व शहराचे नियोजन होईल, असे खांडेकर यांनी सांगितले.

शहरातील विविध भागातील रस्ते व गटारींच्या कामांची यादी यावेळी वाचण्यात आली. महिला दिनाच्या कार्यक्रमावर जास्त पैसा खर्च होतो, असा आक्षेप मुरकुटे यांनी घेतला. यावर ‘तुम्ही महिला असून विरोध कसा करता’ असा सवाल ससाणे यांनी केला. गोंधवणी रस्त्यावरील गाळे पाडून तेथे नव्याने बांधकाम करणाच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कामास 2015 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तलाठी कार्यालयाजवळील संकुलाच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली.

सर्व विषयांना मंजुरी
कचरा उचलणे व इतर स्वच्छतेच्या या कामाचा ठेका रद्द करण्याची मागणी मुजफ्फर शेख यांनी केली. या विषयाला मंजुरी देण्यात आली. सायरा शेख यांनी गौसिया मशिदीजवळील भुयारी रस्त्याच्या कामाला आधी निधी द्या. आम्ही या भागातील मतदार भरभरून मते देतो. त्यामुळे आधी हे काम करा, अशी मागणी केली. या विषयासह सर्व विषय सभेत मंजूर करण्यात आले.