आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंधरा दिवस घर बंद; तरीही गेल्या महिन्यापेक्षा जास्त बिल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - बंगला बंद. त्यात राहणारे पंधरा दिवस बाहेरगावी गेलेले, तरीही मीटर गरगर फिरून नेहमीपेक्षा जास्त बिल आले. विशेष म्हणजे नेमक्या याच बिलावर मीटरचा फोटो नाही. ठेकेदाराच्या माणसाने रीडिंग न पाहताच बिल दिले. याबाबत महावितरणच्या कार्यालयात चकरा मारल्या, तरीही काहीही कारवाई होत नसल्याने संबंधित वीजग्राहक आता ग्राहक मंचाकडे जाण्याच्या तयारीत आहेत.


ज्योतिष सल्लागार अतुल खिस्ती यांना हा अनुभव आला. महालक्ष्मी उद्यानाजवळच्या साई कॉलनीत प्रा. अशोक जाधव यांच्या बंगल्यात ते भाड्याने राहतात. खिस्ती 1 जानेवारी ते 2 फेब्रुवारीदरम्यान 15 दिवस नाशिकला गेले होते. फेब्रुवारीत वीजबिल आल्यावर त्यांना धक्का बसला. जानेवारीत खिस्ती यांनी 1680 रुपयांचे बिल भरले. फेब्रुवारीत त्यांना 2918 रुपये बिल आले.


खिस्ती यांनी याबाबत तातडीने महावितरणच्या सावेडी कार्यालयातील उपअभियंता एल. आर. खामकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही. कारण त्यांच्याकडे दोन ठिकाणचा कार्यभार असल्याची माहिती खिस्ती यांना मिळाली. फक्त सकाळी 9 ते 11 दरम्यानच भेटा, असा सल्ला तेथील सहायक सुनील देशमुख यांनी त्यांना दिला. तुमचे मीटर खराब झाले असेल, तुम्ही तसा अर्ज करा, असे सल्लाही खिस्ती यांना देण्यात आला.


खिस्ती यांनी संबंधित ठेकेदाराच्या माणसांनी हा प्रकार केल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. ते 15 दिवस कोठे होते, याचा पुरावा म्हणजे नाशिकच्या हॉटेलमधील व्हिडिओ चित्रीकरणही देण्याची तयारी दाखवली. मात्र, कोणीही त्यांना दाद दिली नाही. त्यामुळे आपण ग्राहक मंचाकडे तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


11 फेब्रुवारीच्या अंकात ‘दिव्य मराठी’ने 11 महिने नियमित बिल भरूनही महावितरणने पुन्हा 74 हजारांचे बिल ग्राहक अनिस शेख यांच्या माथी मारल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. विशेष म्हणजे संबंधित अधिकार्‍यांनी चूक दुरुस्त करण्याऐवजी बिलातील सात हजार रुपये कमी करून उर्वरित रक्कम हप्त्यांनी भरा, असा उलट सल्ला शेख यांना दिला होता. त्यामुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. शहरात सुमारे एक लाख वीजग्राहक आहेत. त्यापैकी हजारो ग्राहकांना कोणत्या ना कोणत्या कारणाने मनस्ताप सहन करावा लागतो. मीटर रीडींग घेण्यासाठी महावितरणने खासगी ठेकेदाराची नेमणूक केली आहे. रीडींग न घेताच अंदाजे बिले देण्याचा प्रकार उघडकीस आल्याने महावितरणने तीन महिन्यांपूर्वी नवीन ठेकेदाराची नेमणूक केली. परंतु या ठेकेदारानेदेखील मागच्याची पुनरावृत्ती करत पुन्हा अंदाजे बिले देण्याचा उद्योग सुरू केला आहे.


चूक असल्यास दुरूस्त करू..
ही रीडिंगची चूक असू शकते. मीटरचे पुन्हा रीडिंग घेण्यात येईल. रीडिंगमध्ये चूक असल्यास ती दुरूस्त केली जाईल. रीडिंग इलेक्ट्रॉनिक्स डाटाने घेतले असल्याने आता बिलांवर मीटरचे फोटो येत नाहीत. ’’ एल. एम. खामकर, कनिष्ठ अभियंता, महावितरण.


महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
बिले देणारी व्यक्ती पुढच्या महिन्यात तुमचे बिल कमी करून देतो, असे आमिष दाखवतो. ही बाब महावितरणच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उभे करणारी आहे.अधिकार्‍यांशी ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्याने ठेकेदाराला पाठीशी घातले जात आहे.’’ अतुल खिस्ती, तक्रारदार ग्राहक.