आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marathi, Foreign Jewelleries, Gold Market, Divya Marathi

विदेशी दागिन्यांची वाढली क्रेझ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मुंबई-पुण्यातील नामांकित सराफी पेढय़ा नगरमध्ये दाखल होत असल्याने येथील सुवर्णबाजारपेठेला नवी झळाळी मिळाली आहे. नगरमधील अनेक सराफी पेढय़ांमध्ये देशी दागिन्यांबरोबर विदेशी दागिनेही उपलब्ध होऊ लागले आहेत. त्यामुळे उलाढाल वाढली आहे.
लग्नाच्या बस्त्याची बाजारपेठ म्हणून नगरची ओळख आहे. औरंगाबाद, जालना, पुणे, बीड, नाशिक, नांदेड, तसेच पुण्याकडील मंडळी लग्नात कपडे व सोनेखरेदीसाठी नगरला येतात. कापडबाजारात वर्षाकाठी सुमारे 1 हजार कोटीहून अधिक उलाढाल होते. आता सुवर्णालंकारांची बाजारपेठ म्हणून नगरचा सराफ बाजार प्रसिद्ध होत आहे. मुंबई, पुण्यातील नामंकित सराफीपेढय़ा मागील काही वर्षापासून नगरमध्ये दाखल होत आहेत. त्यात प्रामुख्याने राजमल लखीचंद ज्वेलर्स, पु. ना. गाडगीळ, वामन हरी पेढे ज्वेलर्स ही दुकाने आहेत. पूर्वीपासून शहरात असलेली पोखरणा ज्वेलर्स, कायगावकर ज्वेलर्स व देडगावकर ज्वेलर्स ही दुकानेही प्रसिद्ध आहेत. लग्नाच्या बस्त्याबरोबरच वधु-वरांसाठी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली जाते.
सोन्याची गुंतवणूक अत्यंत सुरक्षित समजली जात असल्यामुळे मागील काही वर्षांपासून सोनेखरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. पूर्वी नगरमधील उच्चभ्रू लोक दागिने खरेदी करण्यासाठी पुण्याला जात. आता मात्र नामांकित पेढय़ा नगरमध्ये आल्याने नगरमध्येच सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी होते. नगरमध्ये आता नामांकित सराफांची दालने झाल्याने या सराफी पेढय़ांमध्ये देशी दागिन्यांबरोबरच विदेशी दागिनेही उपलब्ध झाले आहेत.
नगर शहरासह केडगाव, भिंगार व सावेडी या उपनगरांमध्ये सराफांची 350 छोटी दुकाने आहेत. मध्यम दुकाने 70 हून अधिक आहेत, तर मोठी दुकाने 4-5 आहेत. सराफ बाजारात दरवर्षी सुमारे 1 हजार कोटींची उलाढाल होते. नामांकित पेढय़ा आल्यामुळे उलाढाल आणखी वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांपासून सोन्याच्या भावात सातत्याने चढ-उतार होत आहे. सोन्याचे भाव उतरल्यानंतर त्याला ग्राहकांकडून मोठी मागणी असते. तीन महिन्यांपूर्वी सोन्याला दहा ग्रॅमला 30 हजार रुपयांचा भाव होता. त्यानंतर भाव 30 हजार 500 झाला. नंतर 31 हजार 500 झाला व आता 30 हजार 500 रुपयांवर भाव स्थिर आहे.
इटालियन दागिने
खास इटलीवरून मागवलेल्या दागिन्यांचे ग्राहकांना आर्कषण आहे. यात नेकलेस, बांगड्या, कर्णफुले असून त्यांची किंमत 20 हजारांपासून 3 लाखांपर्यंत आहे. राजस्थानी व टेम्पल दागिन्यांना मागणी आहे.’’ अमित पोखरणा, संचालक, पोखरणा ज्वेलर्स
कलर कलेक्शन
आमच्याकडे कलर कलेक्शनचे दागिने आहेत. हाराची किंमत 2 ते 3 लाख आहे. या हारांमध्ये हिर्‍याचा वापर केला असल्यामुळे त्याची किंमत अधिक आहे. जान्हवी हार, नेकलेस, मोतीहार व बांगड्यांनाही मागणी आहे.’’ सुधीर डोळस, व्यवस्थापक, वामन हरी पेठे ज्वेलर्स
सिंगापूर, दुबई पॅटर्नची क्रेझ
वधू-वरांसाठी खास दागिने उपलब्ध झाले आहेत. कटक, कोलकाता येथील दागिने, जळगाव पॅटर्न, नाथद्वारा सुबक कलाकृती असलेले दागिने, तसेच अमृतसर, राजकोट व अहमदाबाद या शहरातून येणार्‍या नावीन्यपूर्ण दागिन्यांनाही चांगली मागणी आहे. सध्या सिंगापूर व दुबई पॅटर्नच्या दागिन्यांची चांगली क्रेझ आहे.’’ संतोष वर्मा, वर्मा ज्वेलर्स
फॅन्सी दागिन्यांची चलती
पूर्वी पारंपरिक दागिन्यांना चांगली मागणी होती. दिवसेंदिवस ही मागणी कमी होत आहे. चपलाहार, राणी हार, मोत्याची नथ या दागिन्यांची जागा आता फॅन्सी दागिन्यांनी घेतली आहे. कमी वजनाचे व आर्कषक नक्षीकाम असलेली फॅन्सी दागिन्यांना चांगली मागणी आहे. त्याच बरोबर पुरुषांसाठीही असलेले ब्रासलेट, चेन, अंगठी यांनाही बाजारात चांगली मागणी आहे.