आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marathi, Lok Sabha Election, Divya Marathi, Nagar Lok Sabha Constituncy

संशयित नेत्यांच्या हालचालींवर खास स्क्वॉडची नजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - प्रचाराच्या तोफा थंडावल्या. बुधवारचा दिवस आणि रात्र उमेदवारांच्या जीवाला घोर लावणारा ठरणार आहे. कारण याच काळात फोडाफोडीला ऊत येतो. प्रमुख नेत्यांकडून दुस-या आणि तिस-या फळीतील कार्यकर्त्यांना विशिष्ट संदेश पाठवले जातात. अशा नेत्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी राष्‍ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून खास यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेतील कार्यकर्ते खबर नेत्यांपर्यंत पोहचवत आहेत.


नगर लोकसभा मतदारसंघात सुरूवातीला भाजप-राष्‍ट्रवादी यांच्यात दुरंगी वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात रंगतदार अवस्थेकडे झुकली ती अपक्ष बी. जे. कोळसे यांना मिळणा-या प्रतिसादामुळे. राष्‍ट्रवादी आणि भाजप या प्रमुख पक्षांनी नगरची लढत महाराष्‍ट्रातील प्रमुख लढत असल्याप्रमाणे लक्ष केंद्रित केले आहे. राष्‍ट्रवादीने शरद पवार, अजित पवार, आर. आर. पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड आदी प्रमुख नेत्यांच्या सभा घेत मतदारसंघ पिंजून काढला. भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांच्या सभा घेत ‘इट का जवाब पत्थरसे’ दिला. आमदार शिवाजी कर्डिले व आमदार राम शिंदे यांनीही प्रयत्नांची शर्थ केली.


प्रचाराची धामधूम संपली. आता आहे ते सांभाळण्याची वेळ आहे. येथील राष्‍ट्रवादीच्या नेत्यांना आवरण्यासाठी दस्तूरखुद्द शरद पवार आणि अजित पवार यांना लक्ष घालावे लागले. आजपर्यंत बरोबर असणारे नेते अखेरच्या टप्प्यापर्यंत जागेवरच ठेवण्यासाठी या नेत्यांवर काही खास खब-यांकरवी बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. गेल्या 4 दिवसांपासून ही यंत्रणा भाजप आणि राष्‍ट्रवादीकडून कार्यान्वित करण्यात आली आहे.


नगर शहरात आमदार अरूण जगताप व महापौर संग्राम जगताप हे राष्‍ट्रवादीचेच काम करत आहेत, पण ते भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे नातेवाईक आहेत. भाजपचे दिलीप गांधी यांचा विजय कर्डिले यांच्या राजकिय कारकिर्दीसाठी महत्त्वपूर्ण असल्याने कर्डिले-जगताप-कोतकर ‘सोधा’ पक्षाचे राजकारण करतील का? अशी शंका पूर्वीपासून अनेकांच्या मनात आहे. त्यामुळे नगर शहरात जगताप व ब-याच अंशी शांत असणा-या कोतकर कुटुंबीयांच्या हालचालीवर लक्ष आहे.


श्रीगोंदे मतदारसंघात आमदार बबनराव पाचपुते यांचे कुटुंब राजळेंच्या प्रचारात आहे. अखेरच्या टप्प्यातील त्यांच्या हालचालीकडे बारकाईने नजर ठेवली जात आहे. तीच स्थिती पारनेरमधील सुजित झावरेंची आहे. ते प्रथमपासूनच अजित पवारांच्या रडारवर आहेत. त्यांच्या हालचाली बारकाईने टिपल्या जात आहेत. कर्जत तालुका राष्‍ट्रवादीचे राजेंद्र फाळकेंसह अनेक पदाधिकारी ब-याचअंशी राजळेंच्या प्रचारापासून दूर आहेत. अजित पवारांनी खास भाषेत त्यांना समजही दिली आहे. त्यांच्याही हालचाली टिपल्या जात आहेत.


विखे गटावर करडी नजर
माजी खासदार बाळासाहेब विखे यांच्या गटाचे जामखेड तालुक्यातील अंकुश ढवळे, जगन्नाथ राळेभात, श्रीगोंदे तालुक्यातील बाळासाहेब नाहाटा, राहुल जगताप, बाळासाहेब गिरमकर, पारनेर मतदारसंघातील नंदकुमार झावरे, नगर तालुक्यातील बाळासाहेब हराळ, अरूण होळकर, राहुरी तालुक्यातील सुभाष पाटील यांच्यावर राष्‍ट्रवादी बारकाईने नजर ठेवून आहे. या नेत्यांवर मताधिक्य अवलंबून असेल.


शिवसेना रडारवर
नगर शहर शिवसेना महायुतीचे उमेदवार दिलीप गांधी यांच्या प्रचारात सक्रिय दिसत असली, तरी सेना नेत्यांकडे भाजप संशयानेच पाहत आहे. आमदार अनिल राठोड यांच्यासह त्यांचे सर्व नगरसेवक कोणाला भेटतात, त्यांना कोणकोण भेटतं, त्यांचे कार्यकर्ते काय निरोप देतात याकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. नगर तालुका शिवसेनेचे संदेश कार्लेंसह सर्व पदाधिका-यांच्या हालचालींवर भाजप कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत.