आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marathi, Lok Sabha Election, Divya Marathi, Voting

शहरातील अडीच लाख मतदान ठरणार निर्णायक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मागील लोकसभा निवडणुकीप्रमाणे या वेळीही नगर शहरातील सुमारे अडीच लाखांचे मतदान निर्णायक ठरणार आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या 13 उमेदवारांपैकी कोणाला नगरकर कौल देतात, हे पाहावे लागेल.नगर लोकसभा मतदारसंघात सात विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे उमेदवारांची भिस्त या विधानसभा मतदारसंघातील आमदारांवर आहे. आघाडीचे उमेदवार राजीव राजळे यांच्यासाठी शेवगाव-पाथर्डीचे आमदार चंद्रशेखर घुले व श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी, तर महायुतीचे उमेदवार दिलीप गांधी यांच्यासाठी शहराचे आमदार अनिल राठोड, राहुरीचे शिवाजी कर्डिले, कर्जत-जामखेडचे राम शिंदे, पारनेरचे विजय औटी यांनी प्रचार केला. असे असले तरी फोडाफोडीच्या राजकारणात या आमदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.


नगर शहरातून गांधी यांच्यासाठी आमदार राठोड यांची, तर राजळेंसाठी महापौर संग्राम जगताप व विधान परिषद सदस्य अरुण जगताप यांचे भूमिका निर्णायक ठरणार आहे. शहरात राठोड यांना मानणार्‍यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. राठोड यांनी गांधी यांच्या सर्व प्रचारसभांना हजेरी लावून महायुतीचा धर्म पाळला, परंतु महापालिका निवडणुकीत गांधी यांच्याशी झालेल्या वादामुळे ते शेवटपर्यंत महायुतीचा धर्म पाळतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील निवडणुकीत गांधी यांना शहरातून सुमारे 47 हजार, तर राजळे यांना सुमारे 20 हजार मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवाजी कर्डिले यांनीही शहरातून 29 हजारांचा टप्पा गाठला होता.


या वेळी ग्रामीण भागाच्या तुलनेत सर्वाधिक मतदान शहरातून होण्याची शक्यता आहे. त्यात युवा वर्गाची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे गांधी व राजळे यांच्यासह तिसर्‍या आघाडीचे बी. जी. कोळसे व आम आदमीच्या दीपाली सय्यद यांनी शहरातील प्रचाराकडे अधिक लक्ष दिले. येथील मतदार कुणाच्या पारड्यात किती मते टाकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


डिसेंबरमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मतदारांनी आघाडीचे 29, तर शिवसेना-भाजप युतीचे 26 नगरसेवक निवडून दिले. राजळे व गांधी यांनी नगरसेवकांकडे प्रभागनिहाय जबाबदारी सोपवली आहे. प्रत्येक प्रभागात आठ ते पंधरा हजार मतदार आहेत. त्यामुळे आपल्या उमेदवाराला मते कशी मिळतील, याची काळजी नगरसेवकांनी घेतली आहे. राजळे व गांधी यांच्यासाठी झालेल्या प्रचारसभांनी शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. चौकाचौकांत राजकीय गप्पांचे फड रंगले असून जो-तो आपल्या सोयीनुसार तर्कवितर्क लावत आहे.