आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marathi, Lok Sabha Election, Ghule, Dhakane, Divya Marathi

‘घुले-ढाकणे-राजळे’ यांच्या सहमती एक्स्प्रेसपासून कार्यकर्ते जाताहेत दूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव - शेवगाव-पाथर्डीच्या राजकारणात घुले-ढाकणे-राजळे यांच्यात सहमती एक्स्प्रेस होऊन ते केवळ लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. ते जरी एकत्र आले असले, तरी सामान्य कार्यकर्ते मात्र त्यांच्यापासून दूर जात आहेत.
नेत्यांचे सूत जुळले असले, तरी ग्रामीण भागात वेगळे चित्र पहावयास मिळत आहे. एकमेकांविरोधात गेल्या दोन-तीन पिढय़ांपासून लढणारे घुले-ढाकणे-राजळे एकत्र आल्याने किंमतच राहिली नसल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनात तयार झाली आहे. निवडणूक अखेरच्या टप्प्यात असताना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह नाही. कार्यकर्ते बोलत नसले, तरी मतदानयंत्रात आपली नाराजी व्यक्त करून सहमती एक्स्प्रेसला सुरूंग लावणार की हिरवा कंदील दाखवणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.


मारुतराव घुले, अप्पासाहेब राजळे आणि बबनराव ढाकणे यांच्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण राज्याला माहीत आहे. सत्तासंघर्षात यापूर्वी अनेकवेळा घुले-ढाकणे-राजळे यांच्या मनोमिलनाचे प्रयोग झाले आहेत. त्याचे परिणाम अद्यापही शेवगाव-पाथर्डीच्या राजकीय पटलावर दिसत आहेत.


सहकारात राजकारण नको या गोंडस नावाखाली घुले-राजळे-ढाकणे यांनी आपापले सहकारी साखर कारखाने कार्यकर्त्यांना अंधारात ठेवून स्वत:च्या ताब्यात ठेवण्यासाठी सहमतीचे राजकारण सुरू ठेवले.कारखान्याच्या निवडणुकीत घुले-राजळे-ढाकणे यांनी कधीही नवीन कार्यकर्त्यांना ताकद दिली नाही. नवीन विरोधकच तयार झाला नाही पाहिजे अशा पद्धतीचे राजकारण करून विरोध करणार्‍याला नाउमेद करण्याचाच प्रयत्न केला. आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत ही सहमती एक्स्प्रेस धावेल. मात्र, आजच विधानसभेच्या विजयाची चिंता घुले बंधूंना भेडसावत आहे. नगर मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजीव राजळे अद्याप शेवगावच्या दौर्‍यावर आले नाहीत. त्यांच्या प्रचाराची धुरा आमदार घुले सांभाळत आहेत. काँग्रेसमधील विखे गटाचे कार्यकर्ते राजळेंच्या प्रचारात दिसत नाहीत. प्रताप ढाकणे शेवगाव तालुक्यात राजळेंसाठी बैठका घेत आहेत.


भाजपचे वेगळे गणित
महायुतीचे उमेदवार दिलीप गांधी यांनी तालुक्याचा दौरा करून मतदारांच्या भेटीगाठी, प्रचारफेर्‍या, प्रचारसभा घेऊन मतदारांशी संपर्क साधला. राष्ट्रवादीमधील नाराजांना आपलेसे करून, तसेच नवतरुण, भाजपचे हक्काचे मतदान, मोदी लाट यावर भाजप कार्यकर्ते गांधींच्या विजयाचे गणित मांडत आहेत.