आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marathi, Lok Sabha Election, Voting, Divya Marathi

निवडणुकीचा आखाडा: बहिष्काराच्या अस्त्रामुळे उमेदवार आले अडचणीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यातील प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. तथापि, मागील निवडणुकीत दिलेली आश्वासने विद्यमान खासदारांनी पूर्ण केली नसल्याने मतदार नाराज आहेत. रस्ते, पाणी, वीज आदी मूलभूत प्रश्‍नांची सोडवणूक न झाल्याने मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा अनेक गावांनी दिला आहे.
‘नोटा’चा अधिकार असतानाही मतदारांनी बहिष्काराचे अस्त्र परजल्याने उमेदवारांच्या धास्तीत भर पडली आहे.
विविध विकासकामांसाठी खासदारांना स्थानिक विकास निधी मिळतो. या निधीतून मतदारसंघातील गावांना मूलभूत सुविधा पुरवणे अपेक्षित असते. परंतु लोकप्रतिनिधींना पाच वर्षे जनतेच्या प्रश्‍नांकडे लक्ष देण्यास उसंत नसते. सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन व समाजमंदिरांशिवाय जिल्ह्यात कोणतीही ठोस विकासकामे झाली नाहीत, असे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मागील निवडणुकीत सर्व प्रमुख प्रश्‍न सोडवण्याचे आश्वासन देत शिवसेनेकडून निवडणूक लढवलेले भाऊसाहेब वाकचौरे आणि भाजपचे दिलीप गांधी यांनी निवडणूक जिंकली. परंतु पाणी, रस्ते, वीज हे प्रमुख प्रश्‍न सोडवण्यात त्यांना अपयश आल्याचे बहिष्कार टाकणार्‍या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे यावर्षी अनेक गावांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. एक वर्षापासून वीज नसल्याने पाथर्डी तालुक्यातील सांगवी येथील ग्रामस्थांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला. वर्षापूर्वी रोहित्र जळाल्यानंतर ग्रामस्थांच्या तक्रारीची कोणत्याही लोकप्रतिनिधीने दखल घेतली नसल्याने हा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. जामखेड तालुक्यातील शिऊर, कोल्हेवाडी, खुरदैठण, वाकी व सदाफुले वस्तीवरील ग्रामस्थांनी रस्त्याचे काम न झाल्याने मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी गावापर्यंत पोहोचली नसल्याने मुंजेवाडीने बहिष्काराचे अस्त्र उगारले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथील ग्रामस्थांनी मातुलठाण ते श्रीरामपूर रस्त्याच्या कामासाठी वेळोवेळी प्रशासनाला साकडे घातले. प्रश्‍न मार्गी न लागल्याने त्यांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला. खंडाच्या जमिनी नावावर करून न दिल्याचा राग व्यक्त करत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. शेती महामंडळाने त्वरित सात-बारांचे वाटप करावे, अशी मागणी तेथील शेतकर्‍यांनी केली. निवडणुकीच्या तोंडावर प्रातिनिधिक स्वरूपात एका खंडकरी शेतकर्‍याला जमिनीचा सातबारा दिला गेला. मात्र, इतर ग्रामस्थ बहिष्कारावर ठाम आहेत.
संबंधित गावांमध्ये प्रचाराला जाणार्‍या उमेदवारांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामस्थांच्या प्रश्‍नांच्या फैरींपुढे उमेदवार गप्प होतात. दरम्यान, यावेळी प्रथमच निवडणूक आयोगाने नकाराधिकारासाठी ‘नोटा’ हे बटण उपलब्ध करून दिले आहे. असे असतानाही ग्रामस्थ बहिष्काराचे ब्रrास्त्र परजण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. शहरी मतदारांच्या तुलनेत ग्रामीण मतदारांना मिळणार्‍या सुविधा अपुर्‍या ठरतात. अनेक प्रश्‍न प्रलंबित असतानाही ग्रामीण भागातच मतदानाची टक्केवारी जास्त असल्याचे मागील निवडणुकांत स्पष्ट झाले आहे.
गारपिटीची आपत्ती
फेब्रुवारीच्या शेवटच्या व मार्चच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या गारपिटीने रब्बी पिकांसह फळबागा उद्ध्वस्त झाल्या. मोहोजदेवढे (ता. पाथर्डी) येथील शेतीचे मोठे नुकसान झाले. शेतकर्‍यांच्या जखमांवर मीठ चोळत प्रशासनाने बांधावर न जाता पंचनाम्याचे सोपस्कार उरकले. त्यामुळे अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. अशा ग्रामस्थांनी भरपाई न मिळाल्याच्या निषेधार्थ मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला आहे. अकोले तालुक्यातील परखतपूर, मनोहरपूर, सुगाव, वाशेरे या गावांतील शेतकर्‍यांनीही नुकसान भरपाई न मिळाल्याने मतदान न करण्याचा निर्णय घेतला.
अद्याप भरपाई नाही
मागील महिन्यात झालेल्या गारपिटीत कांदा, डाळिंब व उसाचे मोठे नुकसान झाले. शंभर टक्के नुकसान होऊनही महसूल विभागाने कागदोपत्री पंचनामे करून आमच्या गावाला नुकसानीपासून वंचित ठेवले. त्यामुळे परखतपूर ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.’’ नंदकुमार वाकचौरे, शेतकरी, परखतपूर.
या गावांचा बहिष्कार
सांगवी, चिंचपूर-इचदे, कुत्तरवाडी व चार वाड्या (ता. पाथर्डी), परखतपूर, मनोहरपूर, सुगाव, वाशेरे (ता. अकोले), शिऊर, कोल्हेवाडी, खूरदैठणे, वाकी, जामखेड शहरातील सदाफुले वस्ती (ता. जामखेड), कान्हेगाव, मातुलठाण (ता. श्रीरामपूर).
मतदान करण्याचे आवाहन
मतदानावर बहिष्कार टाकून प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे बहिष्कार मागे घेऊन मतदान करावे. मतदारांचे मन वळण्यासाठी निवडणूक कर्मचारी व अधिकारी ग्रामस्थांना विनंती करणार आहेत. मतदारांनी मतदान करूनच आपले प्रश्‍न सोडवण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.’’ अनिल कवडे, जिल्हाधिकारी.