आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marathi, Mahavitran Officer, Mula Pravara Worker

महावितरणचे अधिकारीच झारीतील शुक्राचार्य - राधाकृष्‍ण विखे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर - मुळा-प्रवरा कामगारांची देणी देण्यासाठी आम्ही सर्व जण प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघेही अनुकूल आहेत. मात्र, महावितरणचे अधिकारी झारीतील शुक्राचार्य बनून अडथळे निर्माण करत आहेत. सभा उधळून लावण्याचा प्रयत्न करणार्‍यांच्या सभा भविष्यात होणार आहेत. त्या वेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दोष देऊ नका, असा स्पष्ट इशारा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिला.


इच्छामणी मंगल कार्यालयात आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री मधुकर पिचड, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश, प्रभारी स्वराज वाल्मक, खासदार वाकचौरे, माजी खासदार बाळासाहेब विखे, आमदार भाऊसाहेब कांबळे व डॉ. सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष जयंत ससाणो, प्रेमानंद रूपवते, कैलास कोते, दीपक पटारे, नगराध्यक्ष रार्जशी ससाणे आदी आदिंसह काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
अण्णासाहेब म्हस्के यांचे भाषण सुरू असताना ‘मुळा-प्रवरा’च्या महिला कर्मचार्‍यांनी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली. पोलिसांनी या वेळी चार महिलांना ताब्यात घेतले.


सभेनंतर प्रेमानंद रूपवते यांच्या सर्मथकांनी सभागृहात व सभागृहाबाहेर ‘निष्ठावंतांना न्याय द्या’ अशा घोषणा दिल्या. यासंदर्भात रूपवते यांना पत्रकारांनी छेडले असता ‘जय महाराष्ट्र’ म्हणत त्यांनी सूचक इशारा दिला.
मुख्यमंत्री चव्हाण यांच्या आगमनानंतर सभेच्या बाहेरील बाजूस अशोकनगर फाट्यावर शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, अभय शेळके, सचिन बडदे आदी कार्यकत्यांनी वाकचौरे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. बरोबर आणलेल्या पेट्रोलने भरलेल्या बाटलीचा या वेळी स्फोट झाल्याने एका कार्यकर्त्याच्या कपड्यांनी पेट घेतला. मात्र, आग वेळीच शमवल्याने अनर्थ टळला. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले.


रिपाइं व शिवसेना कार्यकर्त्यांची रेल्वेस्थानकानजीक डॉ. आंबेडकर स्मारकासमोर निषेध सभा झाली. खासदार वाकचौरे व बाळासाहेब विखे यांच्या निषेधाच्या घोषणा या वेळी देण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले.


वाकचौरे प्रथमपासून काँग्रेसचेच
वाकचौरे हे प्रथमपासून काँग्रेसचेच होते. जनतेच्या समस्या घेऊन ते माझ्याकडे येत. आज सन्मानाने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांची ओळख ही नेहमी जनतेचा सेवक म्हणून होती. - सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय गृहमंत्री.


शिवबंधनाचा धागाच कच्चा
आघाडी सरकारला धर्मांध आणि जातीयवादी पक्षांविरुद्ध लढा द्यायचा असल्याने केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी कार्यक्रमास जाण्याचे आदेश मला दिले. वाकचौरे यांनी हातात बांधलेला शिवबंधनाचा धागाच कच्चा होता. तो तुटला हे बरेच झाले. निवडणुकीतही हा धागा टिकणार नाही. वाकचौरे हे चुकीच्या कळपात होते. ते आता चांगल्या प्रवाहात आले. - मधुकर पिचड, पालकमंत्री.


मतदारसंघाच्या विकासासाठीच काँग्रेसमध्ये
मी शिवसेनेत असलो, तरी मनाने काँग्रेसचाच होतो. माझ्याकडे आलेल्या सर्वसामान्य माणसाचा धर्म, पक्ष, जात याचा कधी विचार केला नाही. मतदारसंघाच्या विकासासाठीच मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आमच्या हक्काचे पाणी खाली जाऊ नये, यासाठी समन्यायी पाणी वाटपाच्या 2005च्या कायद्यात दुरुस्ती व्हावी. - भाऊसाहेब वाकचौरे, खासदार.