आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marathi, Nagar Lok Sabha Seat, Rajiv Rajale, Lok Sabha Election

निवडणुकीचा आखाडा: राजीव राजळे, गांधींसमोर आव्हान अंतर्गत विरोधकांचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजीव राजळे - Divya Marathi
राजीव राजळे

नगर - राजकारण आणि सहकारात ‘किंगमेकर’ म्हणून ओळखला जाणारा नगर जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, गेल्या काही वर्षांत आघाडीच्या वर्चस्वाला तडा गेला. उत्तरेत शिवसेना आणि दक्षिणेत भाजपने खासदारकी मिळवली. काँग्रेस आघाडीतील अंतर्गत बंडाळीमुळे युती हे यश मिळवू शकली. या वेळी हे चित्र कायम राहणार की बदलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


खासदार दिलीप गांधी यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली, तर राष्ट्रवादीने राजीव राजळे यांना संधी दिली. मागील वेळीही गांधी व राजळे एकमेकांविरुद्ध लढले, पण तेव्हा आमदार शिवाजी कर्डिले यांच्यामुळे मतविभागणी होऊन गांधींचा फायदा झाला होता.


भाजपमधून जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे आणि आमदार राम शिंदे, कर्डिले हेही यंदा उत्सुक होते. गांधी यांना उमेदवारी मिळू नये म्हणून विरोधी गटाने प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, त्यांना यश आले नाही. सरळ लढत झाली तर भाजपला फायदा मिळत नाही हे ओळखून मतविभागणी कोणामुळे होईल, याची गणिते आखली जात आहेत. सरळ लढत झाली तरीही गांधी किंवा राजळे यांना पक्षांतर्गत विरोधकांचेच मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.


राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी आपले चिरंजीव विक्रमसिंह यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले. पण त्याचा उपयोग झाला नाही. बबनरावांच्या नावाचा पक्षाने विचार केला होता, मात्र स्वत: ते लोकसभेसाठी इच्छूक नव्हते. त्यामुळे बंडखोरीचा धोका टाळण्यासाठी पक्षाने अखेर राजळेंनाच उमेदवारी दिली. राजळे यांना उमेदवारी जाहीर होताच अजित पवार यांनी नगरला येऊन असंतुष्टांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तथापि, मुलाला उमेदवारी नाकारल्यामुळे पाचपुते राजळेंना कितपत मदत करतात हे पाहावे लागेल. दक्षिण नगरमधील अनेक काँग्रेसजन बाळासाहेब विखे यांना मानणारे आहेत. विखे यांनी आदेश दिला तर काँग्रेसची मदत राजळेंना होऊ शकेल. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी खासदार यशवंतराव गडाख, आमदार चंद्रशेखर घुले व नरेंद्र घुले यांचे पाठबळ राजळेंकडे आहे. सहा महिन्यांनी होणा-या विधानसभेच्या निवडणुकीचा विचारही त्यामागे असेल.


गांधींना ‘मोदीं’चे बळ : गांधी यांचा पहिल्या टर्ममध्ये चांगला जनसंपर्क होता, मात्र मागील दोन-तीन वर्षांत त्यात खंड पडल्याचे कार्यकर्तेच सांगतात. समाजमंदिरे, सभामंडप व रस्त्यांसाठी त्यांनी केंद्रातून मोठा निधी आणला. पण कार्यकर्त्यांना अपेक्षित असलेली कामे झाली नाहीत. नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहार तसेच महापालिका निवडणुकीत मुलासाठी शिवसेनेला दुखावण्याची फळेही त्यांना भोगावी लागतील. गेल्या काही वर्षांत भाजपतील हेवेदावे, गटबाजी प्रचंड वाढली. त्याचा फटका गांधींना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, या वेळी त्यांच्या मदतीला नरेंद्र मोदींची लाट येईल. कारण गांधी यांच्यापेक्षा मोदी आणि भाजपसाठी मत देणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. मराठा आणि मराठेतर मतांची समीकरणेही निकालावर प्रभाव टाकू शकतील.


राजीव राजळे यांची बलस्थाने
* उच्च्शिक्षित आर्किटेक्ट
* मंत्री थोरातांचे भाचे
* जिल्ह्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांत सक्रिय
* सहकारी साखर कारखानदारीचा पाठिंबा
* विधानसभेत
अभ्यासू भाषणे
उणिवा
* स्पष्टवक्तेपणा, फटकळ स्वभाव
* हायप्रोफाइल वागणुकीमुळे दुरावा
* याआधी दोन वेळा बंडखोरीमुळे नाराजी
* संस्थांतर्गत राजकारण, असंतोषाचे कारण


दिलीप गांधी यांची बलस्थाने
* समाजमंदिरे, ग्राम सडक योजनेची अंमलबजावणी
* अडवाणी, सुषमा स्वराज लॉबीशी जवळीक
* नरेंद्र मोदी फॅक्टरचा मोठा फायदा
* जिल्ह्यातील ग्रामीण भागाशी चांगली नाळ
उणिवा
* ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी मतभेद
* नगर अर्बन बँकेतील वादग्रस्त व्यवहार
* शिवसेना आमदार राठोड यांच्याशी वाद
* प्रकृती अस्वास्थ्यामुळे कमी झालेला संपर्क


अण्णा हजारे फॅक्टर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या भूमिकेकडे देशाचे लक्ष लागले आहे. अनेक उमेदवार अण्णांचा आशीर्वाद घेण्यासाठी राळेगणचे उंबरे झिजवत आहेत. मात्र, आपल्याच जिल्ह्यात ते कोणाला पाठिंबा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे राजीव राजळे यांनी नुकतीच अण्णांची भेट घेतली.