आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marathi, Nagar Pune Aurangabad Railway Demand

थेट पुणे रेल्वेसाठी अण्णा भेटणार मंत्र्यांना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - औरंगाबाद-नगर-पुणे थेट रेल्वेमार्ग अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. त्यामुळे होणारे फायदे व विकास पाहता या मागणीसाठी आपण स्वत: रेल्वेमंत्र्यांना भेटू, तसेच हा मार्ग होण्यासाठी सर्व सहकार्य करू, असे आश्वासन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी औरंगाबाद-नगर-पुणे रेल्वे कृती समितीचे निमंत्रक नितीन थोरात यांना दिले.थोरात यांनी मंगळवारी राळेगणमध्ये अण्णांची भेट घेऊन त्यांना या रेल्वे प्रकल्पाची सर्व माहिती दिली. औरंगाबाद - नेवासे फाटा - नगर - सुपे - राळेगण सिद्धी - शिरूर - रांजणगाव - वाघोलीमार्गे पुणे असा हा नवा मार्ग होण्याची गरज व या रेल्वेमार्गाचे फायदे थोरात यांनी अण्णांसमोर मांडले. हा मार्ग न झाल्यास वाहतुकीचे कसे अराजक निर्माण होईल, हेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अण्णांनी त्यात रस दाखवून हा प्रकल्प होण्यासाठी नगर जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी प्रयत्न करायला हवे होते, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. केंद्रात नवीन मंत्रिमंडळ सत्तेवर येऊ द्या. त्यानंतर मी दिल्लीत असताना तुम्हीही तेथे या. आपण रेल्वेमंत्र्यांना भेटून त्यांच्यासमोर हा प्रकल्प मांडू, असे आश्वासन अण्णांनी थोरात यांना दिले.


थोरात यांनी आनंद व्यक्त करून अण्णांनी स्वत: या प्रकल्पात लक्ष घातल्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्याबद्दल कोणतीही शंका नसल्याची प्रतिक्रिया ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.


या भेटीच्या वेळी थोरात यांनी हजारे यांना या प्रकल्पाची आवश्यकता, प्रकल्प प्रत्यक्षात येण्याची शक्यता व त्यामुळे होणारा कायापालट यांची सर्वसमावेशक माहिती दिली. पुणे, नगर, औरंगाबाद या शहरांना जोडणार्‍या भागात वेगाने निर्माण होणार्‍या रोजगाराच्या संधीमुळे या परिसरात शहरीकरण वेगाने वाढत आहे. त्यामुळे चांगल्या दळवळणाच्या सुविधेसाठी रेल्वेशिवाय दुसरा विश्वसनीय व आर्थिकदृष्ट्या परवडणारा दुसरा पर्याय नाही. अतिरिक्त रस्ता वाहतुकीमुळे इंधनाचा अपव्यय मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. शिवाय भयावह वेगाने वाढणारे प्रदूषण व अपघातांची संख्या हे दुसरे परिणामही आहेच. त्यावर औरंगाबाद-नगर-शिरूर-पुणे असा थेट रेल्वेमार्ग हाच उपाय असल्याचे थोरात यांनी अण्णांसमोर प्रभावीपणे मांडले. त्याबद्दलचे एक सविस्तर निवेदनही त्यांनी अण्णांना दिले.


थेट पुणे मार्गाचे फायदे
0या मार्गामुळे सध्या औरंगाबाद - पुणे दरम्यानचा बारा - तेरा तासांचा प्रवास साडेतीन तासांवर येणार असल्याने प्रवाशांच्या वेळ व खर्चात मोठी बचत होणार.
0कमी खर्चात प्रवास होणार असल्याने प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभून रेल्वेलाही चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नातही भर पडेल.
0रेल्वे मार्गाभोवती सुनियोजित शहरीकरणास मोठा वाव मिळेल.
0तिन्ही शहरांतील किमान दोन कोटी लोकांना फायदा होईल.
0या मार्गामुळे औद्योगिक विकासाला लाभ होणार असल्याने मोठय़ा प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल.
0रस्त्यांवरील वाहनांचा अतिरिक्त ताण कमी होऊन अपघातांच्या संख्येला आळा बसणार.
0हा मार्ग विद्युतीकरणाचा केल्यास इंधनाची मोठय़ा प्रमाणावर बचत होणार.
0नगर व औरंगाबाद परिसरातील पर्यटन स्थळांकडे मोठय़ा प्रमाणावर प्रवासी पोहोचतील. त्यामुळे रोजगार उपलब्ध होऊन जीवनमान उंचावेल.
0पुण्यात काम करणार्‍या नगरकरांना दररोज ये - जा करणे शक्य होईल. त्यामुळे पुण्यात राहण्याचीही गरज उरणार नाही. परिणामी त्यांच्या मासिक खर्चात बचत होईल.


रेल्वेमार्ग न झाल्यास होणारे तोटे
0वाढणार्‍या वाहनांच्या संख्येमुळे वाहतुकीचे अराजक
0खासगी वाहने वापरणार्‍यांत वाढच होत जाणार
0मोठय़ा प्रमाणावरील अपघात व त्यातून होणारी जीवित हानी
0टोलच्या रकमेत सतत वाढ होणार
0वाहनांच्या संख्येमुळे टोलनाक्यांवर वाहतूक ठप्प होण्याने प्रवासाचा वेळ वाढणार
0इंजिन चालू वाहने थांबल्याने इंधनाचा अपव्यय व त्यामुळे इंधनावरील परकीय चलनाचा बोजा वाढून राष्ट्रीय संपत्तीचे मोठे नुकसान होणार
0वाढत्या वाहनसंख्येमुळे पार्किंगचा प्रश्न निर्माण होणार


खासदारांना काही कळते की नाही?
नितीन थोरात यांनी या रेल्वेमार्गाचे सर्व फायदे अण्णांसमोर मांडल्यावर त्यांनी इतका फायद्याचा व भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मार्गासाठी जिल्ह्यातील दोन खासदारांनी आतापर्यंत प्रयत्न का केले नाहीत? त्यांना विकासाची काही दृष्टी आहे की नाही ? हा मार्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरणार असताना खासदारांनी तो होण्यासाठी हालचाली का केल्या नाहीत, असे प्रश्न यावेळी विचारून जिल्ह्यातील दोन्ही खासदारांच्या एकूण विकासाबाबतच्या दृष्टिकोनावरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

अण्णांमुळे लढय़ाला बळ मिळाले
रेल्वेच्या अंतरिम अर्थसंकल्पात नगर-काष्टी-केडगाव-पुणे अशा मार्गाचे सर्व्हेक्षण करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले असले, तरी आमचा आग्रह ‘दिव्य मराठी’ने सर्व प्रथम समोर आणलेल्या औरंगाबाद-नगर-शिरूर-पुणे अशा थेट मार्गासाठीच असणार आहे. हा मार्ग झाल्यास औरंगाबाद-पुणे हे अंतर अवघे साडेतीन तासांचे होणार असल्याने तिन्ही जिल्ह्यांना त्याचा मोठा फायदा होऊन या शहरांच्या विकासाची परिभाषाच बदलणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या प्रश्नात लक्ष घालण्याचे ठरवल्याने या रेल्वेमार्गासाठी सुरू असलेल्या लढय़ाला मोठे बळ मिळणार आहे व हा मार्ग आता अस्तित्वात येण्याची शक्यता वाढली आहे. या रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी सर्व पक्षीय नेते, विविध स्तरातील मान्यवर व विविध मार्गांनी लढा तीव्र करण्यात येणार आहे.’’ नितीन थोरात, निमंत्रक, औरंगाबाद-नगर-पुणे रेल्वे कृती समिती