आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिचारिका संपावर; ‘आयसीयू’ वार्‍यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - परिचारिका संपावर..डॉक्टर मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यावर.. तर रुग्ण वार्‍यावर अशी अवस्था सोमवारी जिल्हा रुग्णालयात झाली होती. त्यामुळे अतिदक्षता विभागातील (आयसीयू) रुग्णांच्या नातेवाईकांनाच आपल्या रुग्णांची काळजी घ्यावी लागली. या सर्व त्रांगड्यात रुग्णांचे चांगलेच हाल झाले.


विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा रुग्णालयातील परिचारिका सध्या संपावर आहेत. सोमवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर येथे आयोजित कार्यक्रमासाठी डॉक्टरांचे पथक तेथे रवाना झाले होते. त्यामुळे अतिदक्षता विभागात डॉक्टरच नव्हते. सकाळी नऊ वाजता फिजिशियन येऊन गेले, मात्र त्यानंतर या रुग्णांकडे कोणीही फिरकले नाही.


अतिदक्षता विभागात गंभीर अवस्थेतील रुग्ण ठेवले जातात. याठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर कायम उपस्थित असणे आवश्यक असते. मात्र, सोमवारी सकाळी नऊनंतर सायंकाळी सहापर्यंत डॉक्टर फिरकलेच नसल्याचे तेथील रुग्णांचे म्हणणे आहे.


रुग्णांबरोबर असलेल्या नातेवाईकांनाच रुग्णांची काळजी घ्यावी लागली. प्रशिक्षणार्थी परिचारिकांनीही बघ्याची भूमिका घेत नातेवाईकांच्या भरवशावर रुग्णांना सोडले. काहीही तांत्रिक माहिती नसताना रुग्णांचे नातेवाईक अतिदक्षता विभागातील साहित्याचा रुग्णांवर प्रयोग करत होते. एनआरएचएमच्या काही परिचारिकांना जिल्हा रुग्णालयात पाचारण करण्यात आले. मात्र, त्यांची संख्या तोकडी असल्याने प्रशिक्षणार्थी परिचारिकांची भूमिका महत्त्वाची होती. पण, प्रशिक्षणार्थी परिचारिकांही रुग्णांना दिलासा देऊ शकल्या नाहीत. अतिदक्षता विभागासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी ही स्थिती होती. इतर विभागांमध्येही यापेक्षा बिकट परिस्थिती होती. किमान रुग्णांची हेळसांड रुग्णालय प्रशासनाने टाळायला हवी होती, अशी प्रतिक्रिया काही रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.


डॉक्टर फिरकलेच नाहीत
पर्यायी व्यवस्था केली..

परिचारिकांचा संप सुरू आहे. मात्र, पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. एनआरएचएमच्या दहा-बारा परिचारिका जिल्हा रुग्णालयात नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्यासमवेत प्रशिक्षणार्थी परिचारिका आहेत. अतिदक्षता विभागात डॉ. डौले होते. याशिवाय आणखी एक डॉक्टर ऑन-कॉल होते. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होण्याचा प्रश्‍न नाही.’’ डॉ. पी. एस. कांबळे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक.


सकाळी पावणेसात वाजता आईला आयसीयूमध्ये दाखल केले. नऊ वाजता डॉक्टर येऊन गेले. त्यानंतर मात्र सायंकाळी सहापर्यंत एकही डॉक्टर इकडे फिरकला नाही. रुग्णांची तब्येत कमी-जास्त होत होती. मात्र, डॉक्टर नसल्याने कोणाला दाखवावे असा प्रश्‍न पडला. परिचारिका नसल्याने सर्व कामे आम्हालाच करावी लागली.’’ हरिष बागडे, रुग्णाचे नातेवाईक.